मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये हवामानात बदल झाल्याचे दिसून येत आहे. याआधीही झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ नुकसान झालं होत. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 15 ते 17 मार्च या दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच डॉ. के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट देखील केलं आहे. त्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह हलका-मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असं देखील ट्विट करत राज्याच्या अंतर्गत गारपिटीचीही शक्यता डॉ. होसाळीकर यांनी वर्तवली आहे.
जळगावात तुरळक पाऊस
बुधवार (दि. 14) रोजी सकाळपासून जळगाव जिल्ह्यात पावसाचे वातावरण असून काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी खरिपाच्या हंगामात पाऊस लांबल्याने शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेला होता. रब्बीचा हंगाम तरी हाती येईल या आशेवर शेतकरी होता. रब्बीच्या हंगामात पेरणीपासून ते पीक काढण्याच्या अवस्थेत येई पर्यंत निर्सगाने साथ दिली आणि पीक काढणीच्या अवस्थेत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने हे पीक हातून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या जिल्ह्याना येलो अलर्ट
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून बुधवार (दि. 15) रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अमरावती, अकोला, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, सोलापूर, सातारा, छ. संभाजीनगर, वसीम, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच गुरुवार (दि. 16) रोजी पालघर, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, नांदेड, परभणी, जालना, छ. संभाजीनगर, बुलढाणा, वाशीम, हिंगोली, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्र्पुर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार तर शुक्रवार (दि. 17) रोजी अहमदनगर, बीड, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना दिलासा
बुधवार (दि. 15) रोजी रायगड, ठाणे, पालघर, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना तर गुरुवार (दि. 16) रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग तर शुक्रवार (दि. 17) रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे.