मुंबई : अमेरिकन हवामान विभागाने एलनिनो बाबत दुसऱ्यांदा अहवाल सादर केला आहे. या अमेरिकन विभागाने यावर्षी एलनिनोमुळे भारतासमवेतच आशिया खंडातील काही देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती भासवू शकते असा अंदाज बांधला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये देखील एक गोंधळाचे वातावरण असून नेमका यावर्षी पाऊस कमी पडेल की काय? याबद्दलची चिंता आहे. परंतु, या बाबतीत जर विचार केला तर भारतीय हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
होसाळीकर यांच्या मते, यंदाच्या पावसावर एलनिनोचा प्रभाव राहणार नाही. यंदा चांगला पाऊस पडेल. तसेच त्यांनी केवळ एलनिनो हा एकच घटक पावसावर परिणाम करत नाही असं मत व्यक्त केल आहे. मान्सूनसाठी इतरही अनेक महत्त्वाचे घटक असतात. यामुळे एलनिनो बाबत तूर्तास तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
PMFME योजनेअंतर्गत मिळवा एक कोटींपर्यंत कर्ज – संचालक सुभाष नागरे
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/se5VHhhNHKU
काय म्हणालेत डॉ. कृष्णानंद होसाळीकर?
होसाळीकर एका कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हटले की, भारतीय मौसमी पावसावर अनेक घटक परिणाम करत असतात. असाच एक घटक आहे युरेशियातील बर्फाचे आवरण. हा घटक मात्र यंदा भारतीय मोसमी पावसाला प्रभावित करणार नसल्याचे चित्र असून यामुळे चांगला पाऊस होणार आहे. त्यांच्या मते, सध्या युरेशियामध्ये बर्फाचे आवरण खूपच कमी आहे. अर्थातच ही स्थिती भारतीय मान्सूनसाठी आगामी काळात पूरक राहणार आहे यामुळे चांगला पाऊस यावर्षी पडणार आहे.
यासोबतच आणखी एक परिस्थिती भारतीय मान्सूनसाठी चांगली तयार झाली आहे. प्रशांत महासागराच्या विषुवृत्तीय प्रदेशावर सध्या ला-निना ही परिस्थिती कार्यरत आहे. ही देखील परिस्थिती भारतात मान्सून काळात चांगला पाऊस पाडण्यासाठी पोषक राहणार आहे. ऑक्टोबर पासून ही ला-निनाची परिस्थिती न्यूट्रलच्या दिशेने जाईल आणि यामुळे पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल असं मत कृष्णानंद यांनी व्यक्त केले आहे. निश्चितच डॉक्टर कृष्णानंद यांनी दिलेली ही माहिती शेतकऱ्यांची चिंता दूर करणारी राहणार आहे. सोबतच कृष्णानंद होसाळीकर यांनी एप्रिल महिन्याच्या मध्यावर भारतीय हवामान विभाग आपला यंदाच्या मान्सून बाबतचा सविस्तर अंदाज जाहीर करणार असल्याची माहिती दिली आहे.
एलनिनो म्हणजे काय?, कसा होतो परिणाम?
याबाबत तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागात ज्यावेळी हवेचा दाब वाढतो त्यावेळी पश्चिम भागातून पूर्वेकडे वारे वाहत जातात. केवळ वारायचं नाही तर यासोबत बाष्पाने भरलेले ढग देखील वाहतात. याचा परिणाम म्हणून पूर्वेकडे अतिवृष्टी सारखी परिस्थिती तयार होते आणि पश्चिमेकडे दुष्काळाची परिस्थिती तयार होते.
म्हणजेच बाष्पयुक्त ढग पूर्वेकडे गेल्याने त्या ठिकाणी अतिवृष्टी होते आणि ज्या ठिकाणाहून बाष्पयुक्त ढग वाहतात तेथून पूर्वेकडे दुष्काळ असतो. म्हणजेच जर ही परिस्थिती तयार झाली तर भारतासह आशिया खंडातील काही देशात दुष्काळ राहील. मात्र, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना इत्यादी देशात यामुळे अतिवृष्टी सारखी परिस्थिती तयार होईल. मात्र याबाबत आतापासूनच अंदाज बांधणे चुकीचे असल्याचे मत काही भारतीय हवामान तज्ञांनी व्यक्त केले आहे.