गावातून महामार्ग गेला. त्यातच शेतीलगत कंपन्या उभ्या राहिल्यामुळे जमिनीला चांगला दर मिळाल्याने गहुंजे येथील रमेश कुलकर्णी यांनी वडिलोपार्जित 18 एकर शेतीपैकी 13 एकर जमीन विकून टाकली व उर्वरित पाच एकरमध्ये राहण्यासाठी घर, एक गोडाऊन बांधून उर्वरीत जागेत शेती केली. मात्र, वडीलांनी शेती विकल्याने मुलगा राहुल कुलकर्णी हताश झाले. पून्हा शेतजमीन घ्यायचीच व करायची तर शेतीच या जिद्दीने पेटत राहुल यांनी 2009 साली वडिलांकडून पैसा घेऊन सातारा जिल्ह्यातील करंजखोप येथे पडिक, मुरमाड, पाण्याचा मागमूस नसलेली 26 एकर जमीन खरेदी केली. राहत्या गावापासून ही शेत जमीन 70 कि.मी. दूर असतांना होती. मात्र, राहुल कुलकर्णी यांना असलेल्या शेतीच्या आवडीमुळे त्यांनी रात्री आपल्या गाडीत मुक्काम करुन दिवसा शेती केली. या शेतीसाठी त्यांनी फ्लॅट स्किपिंग काढण्याचा भागीदारीतला व्यवसाय बंद केला. आज त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर या पडिक, मुरमाड जमिनीवर फळबाग फुलविली आहे. त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या या जिद्दीच्या प्रवासाची कहाणी या यशोगाथेच्या माध्यमातून जाणून घेवू या.
मुंबई-बेंगलोर महामार्गालगत असलेले गहुंजे हे गाव तेथील क्रिकेट स्टेडियममुळे सर्वांना माहीत झाले आहे. याच गावात रमेश कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ राहत होते. त्यांना एक मुलगा व दोन मुली. त्यांच्याकडे महामार्गाला लागूनच वडिलोपार्जित 18 एकर शेती होती. गावातूनच महामार्ग गेल्यामुळे गावातील जमिनीला कधी नव्हते एवढे भाव आले. त्यातच त्यांच्या शेतालगत काही कंपन्या उभ्या राहिल्याने जमिनीला अधिकच मागणी वाढली. या कंपन्यांनी केलेल्या मागणीमुळे रमेश कुलकर्णी यांनी त्यांची 18 पैकी 13 एकर शेतजमीन विकून टाकली. उरलेल्या 5 एकरमध्ये त्यांनी घर व एक गोडाऊन बांधले व उरलेल्या भागामध्ये शेती केली. त्यांचा मुलगा भागीदारीतला राहुल कुलकर्णी हे त्यावेळेस वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होते. वडीलांनी जमीन विकल्याचे त्यांना दुःख झाले. त्यांनी वडिलांकडून पैसे घेऊन 2009 साली पडिक माळरान, मुरमाड व पाण्याचा मागमूस नसलेली 26 एकर जमीन सव्वातीन लाख रुपये एकर याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील वाठार तालुक्यातील करंजखोप यागावी खरेदी केली. गहुंजे गावापासून ही जमीन सुमारे 70 किलोमीटर दूर आहे. तरी देखील राहुल हे स्वत: गाडीने त्याठिकाणी जावून मुक्कामाची वेळ आली तर गाडीतच मुक्काम करून जमिन कसून त्यात सुधारणा करायला सुरुवात केली. 2010-11 मध्ये त्यांनी खरीप हंगामात सोयाबीन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमिनीची प्रतवारी अत्यंत हलकी असल्यामुळे त्यांनी केलेला खर्च सुद्धा निघाला नाही. त्यानंतर त्यांनी सलग एक वर्ष विविध ठिकाणी भेटी देवून आपल्या शेतात कोणते पीक घेता येईल, याची माहिती घेवून अभ्यास केला.
उदरनिर्वाहासाठी करायचे व्यवसाय
या मुरमाड जमिनीतून उत्पादन येईलच, याची शाश्वती नसल्याने कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी राहुल कुलकर्णी हे भागीदारीत फ्लॅट स्किपिंग काढणे याची कामे करत असत. हे करीत असतांना त्यांनी हळूहळू शेतीमध्ये विविध प्रयोग करणे सुरू ठेपले. शेतात पाणी नसल्यामुळे त्यांनी 150 ु 150 ु 50 फूट आकाराचे शेततळे खोदले. या शेततळ्यात पाणी राहावे म्हणून त्यांनी शेतापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदवळ गावाजवळील बंधार्याजवळ एक एकर जमीन खरेदी केली. याठिकाणी त्यांनी विहीर खोदली व या विहिरीचे पाणी त्यांनी शेततळ्यापर्यंत आणून ते भरायला सुरुवात केली. पाणी उपलब्ध झाल्याने त्यांनी शेतीत विविध प्रयोग सुरू केले.
2015 पर्यंत अडीच कोटींची गुंतवणूक
शेतीचा परिसर निसर्गरम्य असला तरी झाडे फारशी नाहीत. दोन्ही-तिन्ही बाजूला डोंगर. त्यातच पाचगणी-महाबळेश्वर या भागात पाऊस पडून वर येणारे ढग हे कोरडेच असतात. त्यामुळे परिसरात पावसाची सरासरी ही 400 ते 500 मिलिमीटरच्या जवळपास आहे. त्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी. थंडी मात्र चांगली असल्यामुळे कुलकर्णी कुटूंबियांचे मन शेतामध्ये रमू लागले. 2012-13 मध्ये त्यांनी वाटाणा गोल्डन या वाणाची पाच एकरवर लागवड केली. यापासून त्यांना 40 ते 50 गोणी उत्पादन मिळाले. वाटाणासोबत त्यांनी काकडी, वांगी, केळी आदी पिके सुद्धा घेणे सुरू केले. 2015 पर्यंत राहुल यांनी या शेतामध्ये अडीच कोटी रुपये खर्च केला. त्या तुलनेत उत्पादन काहीच नव्हते. त्यामुळे खर्च करावा का नाही? अशी संभ्रमावस्था होती. कोणीही सल्लागार किंवा तज्ज्ञ व्यक्तीची सोबत नव्हती. त्यातच शेतीचा व्याप वाढत असल्याने त्यांनी भागीदारीमध्ये सुरु केलेला व्यवसाय बंद करुन पूर्णवेळ शेतीमध्ये लक्ष केंद्रित केले.
खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी, तरिही सोडली नाही जिद्द
जमिनीत गुंतवला जाणारा पैसा व त्यातून मिळणारे उत्पन्न यांचा कुठेच ताळमेळ जमत नव्हता. जवळपास साडेतीन ते चार कोटी रुपये पाच वर्षात खर्च झाले होते. शेतीमध्ये काहीही पिकत नव्हते तरी देखील राहुल यांनी हार न मानता काहीतरी वेगळे करण्याची जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी यामुळे त्यांनी शेतात राबणे सुरुच ठेवले. त्यांनी शेतामध्ये चांगले बांध तयार केले. काही ठिकाणची माती शेतात आणून टाकली आणि मग जमिनीची विभागणी करून 2000 सीताफळाची, 400 रोपे माणगाव बांबू, 200 रोपे कडीपत्ताची, विविध जातीच्या आंब्यांची 100 रोपे, शेवगाची 50, पेरूची 50, सागवानची 100, मोहगणीची 300 अशा 3 हजारावंर रोपांची लागवड केली. त्या रोपांना पाणी देण्यापासून ते सर्व कामे त्यांनी त्यांनी स्वतः केली. त्यामुळे हळूहळू या भागात हिरवाई नटू लागली. आता हा परिसर मवन ट्री हिलफ या नावाने ओळखला जावू लागला आहे.
सरीवरंबावर केली डाळींबाची लागवड
या परिसरात खरीप हंगाम वगळता इतर कोणत्याच हंगामातील पिके येत नसल्यामुळे या गावातील लोक खरीप हंगाम आटोपल्यानंतर रोजंदारीसाठी पुणे शहराचा रस्ता धरतात. परंतु, राहुल यांनी पैसा खर्च करणे सुरूच ठेवले होते. याच काळात कोरोनाचा प्रसार झाला. त्यामुळे शेतावर जाणेसुद्धा अवघड बनले होते. अशा परिस्थितही त्यांनी गोल्डन भगवा या जातीची डाळींबाची रोपे खरेदी करून 9 ु 12 फूट अंतरावर लागवड केली. रोप लागवडीवेळी मोठे खड्डे न करता फक्त सरीवरंबा केला. कारण जमीन अत्यंत हलकी व पाण्याचा पूर्ण निचरा होणारी होती. या जमिनीवर पाणी थांबून राहत नसल्याने त्यांनी संपूर्ण पंचवीस एकर क्षेत्रावर त्यांनी जैन व नेटाफिम कंपनीचे 16 एमएमचे ड्रीप अंथरून संपूर्ण क्षेत्र दोन सीजन पुरते लागवडीखाली आणले. त्यांचा मुख्य उद्देश लावलेली झाडे जगवणे हाच होता.
डाळींबाला मिळाला 80 रुपये प्रति किलो भाव
त्यांना डाळींब लागवडीसाठी त्यांना सर्कलवाडी येथील डाळींब उत्पादक शेतकरी प्रवीण नगर यांचे मार्गदर्शन लाभले. कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता ते सेंद्रिय पद्धतीने शेती करुन उत्पादन घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या शेतातील डाळींबाला यावर्षी जागेवर 80 रुपये प्रति किलोचा भाव मिळाला. पहिला तोडा हा पंधरा टनाचा मिळाला तर दुसरा बहार त्यांनी तोडून टाकला. या डाळींबाच्या पहिल्या उत्पन्नातून त्यांना खर्च वजा जाता वीस लाख रुपये उत्पन्न मिळाले.
स्थानिकांना मिळाला रोजगार
इतर शेतकर्यांप्रमाणे राहुल यांना देखील मजूर टंचाई या समस्येचा सामना करावा लागला. याला पर्याय म्हणून त्यांनी ट्रॅक्टर, पॉवर टिलर तसेच शेतीसाठी लागणारी अवजारे खरेदी केली. तसेच शेतात मुक्कामासाठी स्वतःसाठी तीन व मजुरांसाठी दोन खोल्या बांधल्या. शेतीमुळे त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध होवू लागल्याने अनेक मजूर त्यांच्याकडे येवू लागले. पुरुष मजूराला चारशे तर महिला मजूरास तिनशे रुपये प्रति दिवस मजूरी ते देतात. त्यातच त्यांचा व्यवहार चोख असल्यामुळे त्यांच्याकडे कामगार येण्यास सदैव तत्पर असतात. सध्या त्यांच्याकडे दोन कायमस्वरूपी कर्मचारी असून एका गड्याला निवासी ठेवण्यात आले असून दुसरा सालकरी आहे. शेतात मजूर राबत असले तरी राहुल कुलकर्णी हे मजूरांवर अवलंबून न राहता स्वतः ट्रॅक्टर चालवतात, शेतामधील मशागतीची कामे करतात. शेती करण्यासाठी ज्या-ज्या गोष्टींची गरज आहे. त्यानुसार राहुल कुलकर्णी हे नियोजन करीत असतात. म्हणून त्यांना चांगला दर मिळतो. आता त्यांच्याकडे बालानगरी व फुले पुरंदर या जातीची सीताफळ तोडणी झाली असून त्यालाही चांगला भाव मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. फार फायदा मिळाला नाही तरी किमान खर्च तरी यावर्षी निघण्यास सुरुवात होईल व किमान 20 लाख रुपयांचे उत्पन्न होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुढील वर्षी मात्र अनेक फळांचे उत्पादन सुरू होणार असून दरवर्षी किमान 50 ते 60 लाख रुपये खर्च वजा जाता मिळतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
वन ट्री हिल या नावाने ओळख
राहुल कुळकर्णी यांचा परिसर हा मवन ट्री हिलफ या नावाने ओळखला जात असून याच नावाने तो गुगलवर सर्च देखील करता येतो. ते शेतीमध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक मूलद्रव्य किंवा औषधे न वापरता जीवामृत फिल्टरचा वापर करतात. तर खत म्हणून स्लरीचा वापर करतात. त्यासाठी त्यांच्याकडे चार देशी गाई व दोन बैल आहेत. विविध प्रकारच्या वनस्पतींचा ते जिवामृतमध्ये वापर करतात.
मुरूम, दगड काढून तयार केला मातीचा थर
कधीकाळी मुरमाड असलेली जमीन आता पिकू लागली आहे. राहुल त्यांनी मशिनरीचा वापर करून शेतातील मुरुम, दगड काढून घेतले. त्यामुळे जमिनीवर चार इंचाचा मातीचा थर तयार झाला आहे. त्यामध्ये ते पिके घेत आहेत. मात्र पडणारा पाऊस हा झिरपून खालच्या बाजूला जात असल्यामुळे जमिनीच्या उताराला लागून त्यांनी नवीन शेततळे बांधण्यास सुरुवात केली आहे. डोक्यामध्ये कल्पना तर भरपूर आहेत. परंतु, अंमलबजावणीस वेळ लागतो. प्रत्येक पाऊल टाकताना भविष्याचा विचार करूनच निर्णय घ्यावे लागतात. त्यातही सल्लागार म्हणून कोणीही नाही. सगळं काही स्वतःच्या जीवावर सुरू आहे. परिसर सगळा निसर्गरम्य आहे. गावातील लोक हे खरे हितचिंतक आहेत. त्यामुळे या लोकांना घेऊन कार्य करावे लागते. यांना विश्वासात घेतल्यानंतर प्रत्येक निर्णय हा योग्य ठरत चालला आहे, असे राहुल कुलकर्णी सांगतात.
शेण, गोमूत्र, पालापाचोळापासून जीवामृत
सध्यातरी डाळींबावर पूर्ण लक्ष केंद्रित केले असून पुढील पिकाची तयारी सुरू आहे. जीवामृत फिल्टर व त्याच्या अवजारांसाठी 35 हजार रुपये खर्च करून वाया जाणारे वेस्टेज जसे की, शेण, गोमूत्र, हिरवा पालापाचोळा याच्यापासून जीवामृत व स्लरी तयार केले जाते आहे. स्लरी देण्यासाठी सुद्धा ट्रॅक्टरला स्प्रेयर व फिल्टर असे दोन्ही बसवले आहेत. त्याद्वारे प्रत्येक झाडाची योग्य निगा राखली जाते. त्यामुळे झाडे चांगल्याप्रकारे वाढीस लागली असून सर्वत्र फुटवा दिसत आहे. सातारा जिल्हा बँकेचे संचालक डॉ. राजेंद्र सरकाळे हे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करतात, असेही राहुल कुलकर्णी सांगतात.
22 एकर क्षेत्र येणार ओलीताखाली…
राहुल कुलकर्णी यांनी लावलेली सर्वच झाडे आता वाढीस लागलेली असून डाळिंबाचे व सिताफळाचे यावर्षीपासून उत्पादन देखील सुरू झाले आहे. मात्र, पाण्याची टंचाई जाणवू लागली असल्याने त्यांनी स्वखर्चाने 180 ु 360 ु 25 फूट आकाराचे शेततळे खोदणे सुरू केले आहे. या शेततळ्यात बाजूच्या नाल्यातून व चार किलोमीटर अंतरावरील स्वतः च्या विहिरीमधून पाणी आणून त्याची साठवणूक करण्यात येणार आहे. हे शेततळे पूर्ण झाल्यानंतर राहुल यांचे संपूर्ण 20 ते 22 एकर क्षेत्र बारा महिने ओलीताखाली येणार आहे.
अॅग्रो टुरिझम उभारण्याचा मानस
वडिलोपार्जित शेती गेली, त्यामुळे ही शेती विकत घेतली. सासू-सासरे तसेच नवरा अत्यंत मेहनती असून त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आम्हाला दोन मुले आहेत. आमचे जीवन मात्र अत्यंत आनंददायी आहे. निसर्गाच्या सानिध्यात मन रमून जाते. या परिसरात भविष्यामध्ये अॅग्रो टुरिझम उभारण्याचा आमचा मानस असून हा परिसर वन ट्री हिल या नावाने गुगलवर सुद्धा सर्च करता येतो. याचा मला विशेष आनंद वाटतो. माझ्या प्रमाणेच माझे सासू-सासरे माझ्या नवर्याच्या मताशी नेहमी सहमत राहून त्यांच्या पाठीशी आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. निसर्ग आम्हाला भरभरून देतच पण शेतीशी प्रामाणिक राहणार्या शेतकर्यांना सुद्धा फुलसंपन्न जीवन लाभो या सदिच्छा.
दिपांजली कुलकर्णी,
राहुल यांच्या पत्नी.
युवकांनी शेतीकडे वळावे
शेती सारखे सुख आणि शेती सारखे समृद्ध जीवन दुसरे कुठेही मिळणार नाही. झगमगटाच्या जगात थोडे काही मनाविरुद्ध झाले की मानसिक संतुलन बिघडते. आणि यातून सावरण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. नवीन पिढी शहरीकरणाच्या आनंदात व तात्काळ उत्पन्न मिळविण्याच्या नादात आनंद हरवून बसली आहे. यासोबतच आपले आरोग्य देखील डॉक्टरांच्या स्वाधीन करुन बसले आहेत. शेतीमध्ये कर्म करत राहील्यास तसेच पैसा गुंतवल्यास त्यापासून निश्चित चांगले उत्पादन मिळते. परंतु, त्यासाठी निसर्गाबरोबर समरस होऊन वेळ द्यावा लागतो. त्यानंतर मिळणारा फायदा व आनंद दुसरीकडे कोठेही मिळणार नाही. कोणत्याही उद्योगामध्ये पैसा गुंतवताना परतफेडीची सुरुवात उशिरा होत असते. शेतीमध्ये सुद्धा तसेच आहे. उलट शेतीला निसर्गाची जोड असते. त्यामुळे केलेली गुंतवणूक ही ठराविक कालावधीनंतर चांगल्या प्रकारे परत मिळते. शेतीत केलेली गुंतवणूक ही अत्यंत आनंददायी व निरोगी ठेवणारी आहे. त्यामुळे युवकांनी शेतीकडे वळावे, त्याकडे लक्ष द्यावे. शेती करतांना मात्र संयम बाळगणे गरजेचे आहे. झगमगाटामागे न जाता कर्म करा. त्यातून मिळणारा आनंद व पैसा या स्त्रोताचे वर्णन कोणत्याच शब्दात करता येत नाही.
राहुल कुलकर्णी, प्रगतिशील शेतकरी
मो. नं. 9960641233
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- खुशखबर ! 15 दिवसात शेती उत्पादन डबल, “विद्युत वाहक माती” विकसित करून शास्त्रज्ञांनी केली कमाल!!
- मुंबईत नऊ जानेवारीला शाश्वत पर्यावरण विकास परिषद