शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देशात प्रथमच एखाद्या राज्याकडून ॲग्रीकल्चर एआय चॅटबॉट विकसित करण्यात आला आहे. हा एआय चॅटबॉट म्हणजे शेतकऱ्यांसाठी अल्लादीन का चिराग ठरणार आहे. विशेष म्हणजे, हा चॅटबॉट शेतकऱ्यांना त्यांच्या मातृभाषेत मार्गदर्शन आणि मदत करणार आहे.
शेतकऱ्यांना कृषी संबंधित माहिती 24 तास अहोरात्र मिळत राहावी म्हणून ओडिशा सरकारने हे ॲग्रीकल्चर एआय चॅटबॉट ॲप लाँच केले आहे. त्यातून शेतक-यांना घरबसल्या शेतीशी संबंधित सर्व माहिती मिळणार आहे.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
टाईप करण्याची गरज नाही, बोलून सांगा समस्या
या Agriculture AI Chatbot ॲपमध्ये शेतकऱ्यांना अनेक वैशिष्ट्ये मिळतील. शेतकऱ्याला या कृषी ॲपमध्ये टाईप करण्याचीही गरज भासणार नाही. शेतकरी या ॲपमध्ये बोलून व्हॉईस टायपिंगद्वारे त्यांच्या समस्या सहज सोडवू शकतात. देशात अनेक असे शेतकरी आहेत, ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, त्यांना त्याची मोठी मदत होणार आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्याची आणि ऑडिओद्वारे उत्तरे मिळविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
शेतीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी
शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व माहिती वेळेवर मिळावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून नवीन सेवा सुरू करण्यात येत आहेत. या संदर्भात, ओडिशा कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी AI चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
सरकारी कार्यालयात खेटे मारण्याची गरज नाही
हे ॲप ओडिशा सरकारने विकसित केले असल्याने, शेतकरी ओडिया भाषेत टाइप करून किंवा बोलून त्यांच्या शेतीशी संबंधित समस्यांचे निराकरण सहजपणे करू शकतात. हे ॲप अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे, त्यामुळे वेळ जाईल तसे ते अपडेट केले जाईल. चॅटबॉटच्या डेव्हलपरच्या म्हणण्यानुसार, या ॲपमध्ये फोटो अपलोड सुविधेसह इतर अनेक सेवांचाही समावेश केला जाईल. ही सेवा सुरू झाल्यानंतर, ओडिशातील शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयात खेटे मारण्याची गरज भासणार नाही.
एआय ॲग्री चॅटबॉट ॲप कसे डाउनलोड कराल?
ज्या शेतकऱ्यांना एआय ॲग्री चॅटबॉट ॲप वापरणे सुरू करायचे आहे, त्यांना गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘Ama Krushi AI Chatbot’ हे सर्च करून ॲप इन्स्टॉल करावे लागेल. आवश्यक माहिती भरल्यानंतर त्याचा वापर करता येईल.