सध्या युरोपीय युनियन हे द्राक्षनिर्यातीचे प्रमुख ठिकाण आहे. परंतु ही निर्यात प्रामुख्याने फेब्रुवारी ते एप्रिल या काळापर्यंत (विंडो) मर्यादित आहे. अलीकडील काही वर्षांपासून चिली, दक्षिण आफ्रिका, पेरू या देशांतील द्राक्षेही या काळात बाजारात येत आहेत. त्यामुळे भारताने निर्यातीत चीन, कोरिया, अगदी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या बाजारपेठांमध्ये पोहोचणे आवश्यक आहे.
यासाठी डिसेंबर-जानेवारीपर्यंत माल तयार करावा लागेल. याचा अर्थ पावसाळ्याच्या काळात जुलै-सप्टेंबरपासून लवकर बागांची छाटणी करावी लागेल. अशा परिस्थितीत प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर एक चांगला पर्याय आहे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात थॉम्पसन सीडलेस या वाणात तीन वर्षे केलेल्या अभ्यासानुसार त्याचा वापर अनुकूल असल्याचे आढळले आहे.
प्लॅस्टिक आच्छादनाचे फायदे
1. फुलगळ, घडकुज व केवडा रोगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण केले जाते.
2. हे आच्छादन द्राक्षवेलींचे भाग (ओलांडे, खोड आणि काड्या) यांचे गारांपासून नुकसान होण्यापासून संरक्षण करते.
3. बिगरहंगामी पावसामुळे मणी फुटण्याच्या घटना कमी करते.
4. वेलींच्या वाढीवर तापमानाचा प्रभाव कमी होतो.
5. फळछाटणीच्या हंगामात आच्छादनाखालील पानांमधून बाष्पोत्सर्जन कमी झाल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची गरज कमी होते.
6. चांगल्या प्रतीचे द्राक्ष उत्पादन मिळते.
प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रकार
1. उष्णकटिबंधीय परिस्थितीसाठी प्लॅस्टिक आच्छादन ‘लॅमिनेटेड’ फिल्मचे व विणलेले असावे.
2. अतिनील किरणांना (UV 580 kLy (भारतीय वातावरण) स्थिर व उष्णताविरोधी गुणधर्मांचे (25 टक्के उष्णता) असावे.
3. हिवाळ्याच्या हंगामात ‘इन्फ्रारेड रेडिएशन’ आतून बाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी आणि मण्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकते.
4. आच्छादन 85 ते 99 टक्के प्रकाश पारदर्शक व सुमारे 65 टक्क्याच्या आसपास प्रकाश प्रसारासह 140 च्या आसपास जीएसएम असावे.
5. बागेत भुरी आणि लाल कोळी नियंत्रणासाठी सल्फरचा वापर होतो. त्यासाठी दोन हजार पीपीएम फवारण्यांमध्ये टिकून राहावे यासाठी फिल्ममध्ये सल्फर विरोधी गुणधर्म असणे आवश्यक आहे.
6. पाण्याची वाफ प्लॅस्टिकच्या खाली घनीभूत होण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे आच्छादनात ठिबकविरोधी गुणधर्म असणे आवश्यक आहे. ज्यामुळे पाणी थेट पानांवर न पडता वाहून जाऊ शकते. धूळविरोधी गुणधर्मही असणे आवश्यक आहे.
7. इटली, स्पेन आणि इस्राईलमधील कंपन्या भारतात अशा प्लॅस्टिकची विक्री करीत आहेत. किंमत, बागेतील संरचनेवर खर्च अवलंबून आहे.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)