बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. आजही शेतकऱ्याला बळीराजा असे म्हंटले जाते. ग्रामीण भागात दर दिवाळी-दसऱ्याला आमच्या माता-बहिणी “इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो” असे म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात. चार हजार वर्षापूर्वी बळीराजाचे राज्य संपूर्ण आशिया खंडात होते. वामन-बळीराजा युद्ध भाद्रपद महिन्यात झाले म्हणून भाद्रपद महिन्याच्या पित्तरपाटामध्ये श्राद्ध घालून श्रद्धांजली वाहिली जाते. शेणाचा भालदेव बसवतात. 15 दिवस सुतक पळून बळीराजाच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. भालदेव म्हणजे बळीराजा. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मार्तंड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील हुशार व कार्यक्षम मंत्री होत.
बळीराजाचे राज्य होते नऊखंडी
बळीराजाचे राज्य नऊखंडी होते. आजच्या अफगाणिस्तानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत बळीराजाचे साम्राज्य पसरलेले होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा म्हंटले जात असे. आज जसे भारतात अनेक राज्य आहेत व प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हंटले जाते, त्याचप्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा होय. प्रत्येक खंडात छोटे-छोटे सुभे असायचे. अनेक सुभ्यांचे मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख तो महासुभेदार म्हणजेच म्हसोबा होय. त्याचप्रमाणे सुभ्याचा प्रमुख जोतिबा, मल्हार व मार्तंड हे सुरक्षा अधिकारी होत. आज केवळ बळीराजाचीच पूजा होते असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीचे राज्य प्रजेला किती सुखी व संपन्न ठेवत
भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्व
बळी राजा म्हणजे सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा निरागस ‘माणूस’… आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता… भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर…. बळी – हिरण्यकश्यपचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचानाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व… सुमारे साडे तीन ते पाच हजार वर्षापूर्वी होवून गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट, एक महातत्ववेत्ता… या बळीचा वंश तो बळीवंश. या बळीवंशातील माणसे-आपली माणसे, आपल्या रक्तामासाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे… ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले, पण तत्वांशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोच्छवासावर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही, अशी माणसे.
“बहुजन हिताय, बहुजन सुखाय”साठी समर्पित राज्य
बळीराजा हे एक कतृत्ववान आदर्श राजे होते, ज्यांनी आपले राज्य बहुजन हिताय, बहुजन सुखायसाठी समर्पित केले होते. आपल्या राज्यातील प्रजेचे हित लक्षात घेता त्यांनी प्रजेचा विकास आणि संरक्षणांकडे अधिक लक्ष दिले. त्यांनी कोणताही वर्ण, जात, धर्म पंथ पाहिला नाही. न्याय करताना कधीही भेदभाव केला नाही. म्हणूनच ते उदारमतवादी, मोठ्या मनाचे. शूर पराक्रमी, अनेक गुणसंपन्न, बलवान, मितभाषी, शत्रूना रणांगणात पाठ न दाखविणारे, समान विभागणी करणारे, योग्य काळाची वाट पाहणारे, सत्य शील, सर्वाविषयी सावध असे महान राजे होते. बळीराजा हे शेतकऱ्यांवर कुठे अन्याय अत्याचार घडत असतील तर लगेच ते शत्रुस कठोर शासन करीत होते. या त्यांच्या आदर्श कार्य कतृत्वामुळेच भयभीत झालेल्यानी कपटाने त्यांची हत्या केली, असा दावा काही जण करतात. बळी राजा हे गोर गरीबांना न्याय, हक्क देणारे होते, म्हणूनच आजही आपल्या समाजामध्ये एक प्रचलित म्हण आहे ‘बळी तो कान पिळी’.
बळी हे उत्तम शेतकरी, त्यांनीच भरली धान्याची कोठारे
बळीराजा… सात काळजात जपून ठेवावा असा ’जिवलग’. सुमारे तीन-चार हजार वर्षांपूर्वी बळीराजाच्या पूर्वजांनी केलेल्या उत्तम शेतीमुळे पिकलेल्या धान्याने सिंधूसंस्कृतीमधील धान्याची कोठारे भरली होती. बळीराजानेही आपल्या पूर्वजांचे अनुसरण करीत, पण त्यांच्यापेक्षा अधिक कौशल्याने, पेरणी सुरू केली. पेरणी धान्याची होती. पेरणी संस्कृतीचीही होती. पेरणी जीवनमूल्यांची होती, पेरणी जगण्याच्या कलेची होती. पेरणी रक्तमांसाची होती आणि माणसासाठी नव्या नव्या स्वप्नांचीही होती. तेव्हापासून बळीराजा प्रत्येक पिढीच्या श्वासोच्छवासात वसत आहे, रक्तवाहिन्यांतून वाहत आहे, बहुजनांच्या उराउरांतून धडधडत आहे. घराघरातून बहरत आहे, रक्तवाहिन्यांतून वाहत आहे, उत्कट जिज्ञासेने सृष्टीच्या आणि जीवनाच्या नव्या-नव्या रहस्यांचा शोध घेत आहे. बहुजन समाजाच्या दृष्टीने बळीवंश आणि त्याच्या प्रवाहातील असंख्य व्यक्ती जमिनीत अदृश्य असलेल्या मुळांसारख्या आहेत.
कंटेंट सौजन्य : निलेश रजनी भास्कर कळसकर (प्रबोधन टीम)