मुंबई- राज्याच्या अनेक भागांत आजही ‘आभाळमाया’ कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषत: मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे. हा इशारा उद्या, 19 जुलै रोजीही काही जिल्ह्यांसाठी कायम राहणार आहे. राज्यात पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खाते (आयएमडी) ने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला मान्सून नव्या हवामान प्रणालींमुळे पुन्हा सक्रीय होत आहे. राज्याच्या विविध भागांत पावसाने गेले काही दिवस विश्रांती घेतली असली तरी, कोकण, घाटमाथा आणि दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-मध्य महाराष्ट्राच्या काही पट्ट्यांत पावसाच्या सरींची हजेरी लावत आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. ‘आयएमडी’ने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

आज ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता
आज, 18 जुलै रोजी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. ‘आयएमडी’च्या अधिकृत माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या मराठवाडा व दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत आज वादळी पावसाचा अंदाज आहे.

‘या’ जिल्ह्यात अधिक जोर; उद्यासाठीही इशारा
प्रामुख्याने अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. या भागात उद्या, 19 जुलै रोजीही अलर्ट कायम राहणार आहे. हवामान खात्याने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर जाणे टाळावे, झाडांचा आश्रय घेऊ नये आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल










