तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव पश्चिम महाराष्ट्रातील नदीकाठच्या क्षेत्रात अधिक दिसून येतो. सुरवातीस बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूस होते. पानावर लांबट पिवळे ठिपके दिसतात. त्यांची लांबी वाढून रंग लालसर तपकिरी होतो. ठिपके मोठे होऊन नारंगी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. ओलसर दवबिंदूंच्या वातावरणात त्यांचा प्रसार होतो. ठिपक्यांमुळे पेशीद्रव्यपटल मृत होते. परिणामी प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावून वाढीवर विपरीत परिणाम होतो.
तपकिरी ठिपके
रोगाचा प्रादुर्भाव जास्त पावसाच्या भागात होतो. जुन्या पानाच्या दोन्ही बाजूंवर अंडाकृती, लालसर ते तपकिरी ठिपके दिसतात. ठिपक्यांभोवती पिवळसर वलय दिसते. प्रादुर्भाव वाढल्यास पानांवरील ठिपके एकमेकांत मिसळून मोठे होतात. ठिपक्यांमधील पेशी मरतात आणि प्रकाश संश्लेषण क्रिया खंडित होते. प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावल्यामुळे उसाच्या कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. उसातील शर्करा व वजन घटते. रोगाचा प्रसार 75-80% सापेक्ष आर्द्रता असलेल्या वातावरणात हवा, पावसाचे पाणी व दवबिंदूंमार्फत होतो.
व्यवस्थापन
1. प्रमाणित, रसरशीत, निरोगी, योग्य वयाचे बेणे बेणेप्रक्रिया करून वापरावे. खोडवा उसाचे बेणे लागणीसाठी टाळावे.
2. वेळेवर आंतरमशागत करून शिफारशीत रासायनिक खतमात्रा द्याव्यात.
3. हवेमार्फत पसरणाऱ्या रोगांपासून ऊस पिकाच्या संरक्षणासाठी सिलिकॉन या मूलद्रव्याची उपलब्धता महत्त्वाची असते. त्यामुळे 6 क्विंटल बगॅस राख अधिक सिलिकेट विरघळविणारे जीवाणू 1 लिटर एकरी वापर करावा.
4. या दोन्ही रोगांच्या नियंत्रणासाठी, प्रोपिकोनॅझोल 1 मि.लि. किंवा मँकोझेब 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे पंधरा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇