मुंबई : मान्सून देशातून संपूर्णपणे माघारी जात असताना उकाडा वाढत असलेल्या महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी आली आहे. 11 व 12 ऑक्टोबरदरम्यान राज्याच्या काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने (आयएमडी) म्हटले आहे. याशिवाय, यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्येही चांगल्या पावसाचे अनुमान वर्तविण्यात आले आहे.
देशातून मान्सूनच्या माघारीला अनुकूल स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात अतिवृष्टी होण्याचा इशारा आयएमडीकडून दिला गेला आहे. पूर्वोत्तर राज्यात सिक्कीम, तटवर्ती पश्चिम बंगाल आणि दक्षिणेकडे अंदमान-निकोबार, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्येही पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर गोवा, महाराष्ट्र व तेलंगणाच्या काही भागात येत्या 48 तासात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पंजाबराव डख म्हणतात, आणखी काही दिवस चांगल्या पावसाची शक्यता
दुसरीकडे, शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले हवामान अभ्यासक आणि पावसाचे अंदाजक पंजाबराव डख यांनी आणखी काही दिवस चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. अलीकडील त्यांचे काही अंदाज चुकल्याचा आरोप होत असला तरी त्यांनी पावसाची शक्यता वर्तविणे, ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे.
पंजाबराव सांगतात, “राज्यामध्ये आता जवळपास 25 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडणार नाही. मात्र, त्यानंतर राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. 25 ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीमध्ये राज्यात पावसाची शक्यता आहे. दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर 10 नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असून यावर्षीदेखील दिवाळी कालावधीत चांगला पाऊस होईल.”
शास्त्रीय हवामान तज्ञ म्हणतात, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये चांगला पाऊस
मान्सून आता महाराष्ट्रासह देशातून संपूर्ण माघार घेण्याच्या स्थितीत आहे. यंदाच्या मान्सून हंगामात राज्यात समाधानकारक पाऊस झाला असून पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. आता यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्येही चांगला पाऊस पडू शकतो. शास्त्रीय हवामान मॉडेल आयओडी सकारात्मक दिसत असून त्यामुळे हवामानात काही बदल होऊ शकतात. 2019 सारखेच या वर्षीच्या अखेरीस अवकाळी पावसासाठी बरेच मापदंड अनुकूल दिसत आहेत. बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होईल. 2019 प्रमाणेच या कालावधीत राज्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे, असे शास्त्रीय हवामान तज्ञांचे अनुमान आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- जगातील सर्वात महाग बटाटा; किंमत ऐकून येईल चक्कर!
- कांद्याला असा मिळतोय भाव ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव