जगातील सर्वात महाग बटाटा कोणता, हे तुम्हाला माहिती आहे काय? तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत, इतका हा बटाटा महाग आहे. त्याची किंमत ऐकून तुम्हाला कदाचित चक्कर येईल. बरं, हा बटाटा काही वर्षभर उपलब्ध नसतो. या बटाट्याची चव चाखायची असेल तर खवय्यांना मिळतात वर्षातले फक्त दहा दिवस.
तसे बटाटे हे जगभरातील मुख्य अन्न आहे. अतिशय परवडण्याजोग्या किंमती, सर्वत्र सहज उपलब्धता यामुळे बटाटा जगातील अन्नसुरक्षा साखळीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, जगात दरवर्षी 376 दशलक्ष टन उत्पादन होते. त्यात सर्वाधिक 94 दशलक्ष टन चीनमध्ये आणि 54 दशलक्ष टन उत्पादन भारतात होते. आकडेवारीनुसार, जगभरात दररोज प्रती व्यक्ती 200 ग्रॅम बटाटा खाल्ला जातो.
फ्रान्समधील अनोखे, दुर्मिळ ले बोनाटे बटाटे
असा सर्वसाधारण किंमतीतील बटाटा महाग कसा असू शकतो, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल. तथापि, एका विशिष्ट बटाट्याचे वाण तुमच्या या धारणेला धक्का देईल. हा जगातील सर्वात महागडा बटाटा आहे फ्रान्समधील. त्या वाणाचे नाव आहे ले बोनाटे (Le Bonnotte). फ्रान्सच्या नॉर्मैंडी क्षेत्रातील इले दे नॉयरमाउटियर बेटावरच फक्त या बटाट्याची लागवड केली जाते. या बटाट्याची किंमत 40,000 ते 50,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी आहे. तो फ्रान्समध्येच फक्त लिलावात हातोहात विकला जातो. त्यामुळे हा सर्वात महाग बटाटा जगातील इतर भागात फारसा पोहोचू शकत नाही. काही युरोपीय देशात, अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये पोहोचणाऱ्या काही मालाची किंमत 80 हजारांपासून एक लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचते.
सीवीड, शैवाल या नैसर्गिक खतांचा वापर
हा बटाटा वर्षातून फक्त 10 दिवस उपलब्ध असतो. त्याचे उत्पादन फक्त 50 चौरस मीटर वालुकामय जमिनीवर उत्पादित होतो. समुद्रतृण (सीवीड) आणि शैवाल यांचा नैसर्गिक खते म्हणून वापर करून उगवलेला हा बटाटा असतो. त्यात लिंबूची चव, थोडा खारटपणा आणि अक्रोडच्या गरासारखी एक वेगळी चव आहे. या परिसरातील बटाटा कापणीच्या 10,000 टनांपैकी फक्त 10 टक्के म्हणजे 100 टन इतकेच पीक ले बोनाटे बटाट्याचे असते.
बटाट्याच्या इतर जातींपेक्षा हा बटाटा वेगळा आणि नाजूक असतो. त्याला अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागते. यंत्राद्वारे त्याची काढणी होऊ शकत नाही. ते वैयक्तिकरित्या हाताने निवडावे लागतात. सात दिवसांच्या काढणीच्या हंगामात, अंदाजे 2,500 मजूर हे दुर्मिळ बटाटे काळजीपूर्वक निवडण्यासाठी काम करतात. त्यामुळे या बटाट्याची किंमत वाढते.
सालीमध्ये समुद्राचा सुगंध, चव शोषून घेण्याची क्षमता
ले बोनाटे बटाट्याच्या सालीमध्ये माती आणि समुद्राच्या पाण्याचे वेगळे सुगंध आणि चव शोषून घेण्याची अनोखी क्षमता असते. त्यामुळे हे बटाटे सालीसह खाण्याची शिफारस केली जाते. बटाट्याच्या या अनोख्या जातीने दुर्मिळ पाककृतीसाठी जगभरात ख्याती मिळवली आहे, ज्याच्या चवीचे नामांकित शेफ आणि खवय्यांनी कौतुक केले आहे.
ले बोनाटे बटाट्यांना जास्त मागणी असल्यामुळे ते विशेष लिलावात विकले जातात. जगभरातील बटाटा संग्राहकांसाठी ती एक मौल्यवान चीज बनली आहे. या बटाट्यांची अनन्यता आणि दुर्मिळता यामुळे त्यांना प्रीमियम, लक्झरी दर्जा प्राप्त झाला आहे.
ले बोनाटे बटाट्याची वैशिष्ट्ये, औषधी गुणधर्म
हा बटाटा फार कमी प्रमाणात तयार होतो. त्याची किंमत खूप जास्त आहे पण त्याची खासियत इतकी आहे की त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात ज्यामुळे तो इतर बटाट्यांपेक्षा वेगळा ठरतो. हा बटाटा इतका मऊ आहे की तो हातानेच खणून काढावा लागतो. या बटाट्याचा वापर विशेषतः सुगंधी पदार्थांमध्ये केला जातो. या बटाट्यांचा रंग हलका तपकिरी असतो आणि त्यांना विशेष चव असते. बोनेट बटाटे खूप आरोग्यदायी असतात. त्यात भरपूर फायबर, पोषक, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामध्ये प्रथिने, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए आणि फॉलिक ॲसिड यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हा बटाटा कमी रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह यांसारख्या आजारांपासूनही बचाव करतो.
थोडेसे बटाट्याविषयी
बटाटा हा जगभरात “गरिबांची भाकरी” (ब्रेड ऑफ पुअर) म्हणून ओळखला जातो. बटाटा हे एक पारंपारिक उत्पादन आहे. तांदूळ, गहू आणि मक्यानंतर बटाटा जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक खाल्ली जाणारी चीज आहे. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 (32%), स्टार्च (26%), तांबे (22%), व्हिटॅमिन सी (22%), मॅग्नेशियम (19%), फॉस्फरस (17%), फायबर (15%), पॅन्टोथेनिक ॲसिड (13%) असते. अमेरिकन दर वर्षी सरासरी 35 किलो फ्रोझन बटाटे, 19 किलो ताजे बटाटे, 8 किलो बटाटा चिप्स आणि 6 किलो निर्जलित बटाटा खातात. दरडोई बटाट्याचा जागतिक मासिक वापर 31.3 किलो आहे. युरोपमध्ये सर्वाधिक दरडोई 87.8 किलो वापर आहे. पूर्व युरोपातील थंड देशांतील रहिवासी जगातील बटाट्याचे सर्वात मोठे ग्राहक आहेत. चीन हा जगातील सर्वात मोठा उत्पादक आहे, परंतु तो दरडोई सर्वात मोठा ग्राहक नाही. चिनी लोकं जास्त बटाटे खात नाहीत. एकूण बटाटा उत्पादनापैकी केवळ 6% जगभरातील व्यापार बाजारपेठेत पोहोचते. त्यातच आता प्रक्रिया केलेल्या बटाट्याचा व्यापार वाढला आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कांद्याला असा मिळतोय भाव ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव
- भ्रूण प्रत्यारोपण सेवा आता थेट शेतकऱ्यांच्या दारी!