पल्लवी खैरे
कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की नुसतं तुमच्याकडे साधन सामुग्री तयार असून चालत नाही. तुमचा व्यवसाय किंवा तुमचं उत्पादन अधिक चांगल्या पद्धतीनं करायचा असेल तर काही गोष्टींचा काटेकोरपणे अभ्यास केला तर व्यवसाय कमी वेळात अधिक नफा कमवून देणारा होऊ शकतो. असच काहीस जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एका 50 वर्षीय महिलेनं करून दाखवलं आहे. या महिलेने भाज्यांची पावडर तयार करण्याची कंपनी उभारली आहे. या कंपनीच्या माध्यमातून इतर महिलांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे.
जामनेर तालुक्यातील पळासखेडा या छोट्याशा गावातील वंदना प्रभाकर पाटील (वय 50) यांनी गायत्री फूड्स या नावाने कंपनी सुरू केली. वंदना पाटील यांचा जन्म रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. लग्नानंतर त्यांना सतत वाटायचं आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग त्या गायत्री स्वयंसहाय्यता समूहात सामील झाल्या आणि त्या गटाच्या उपाध्यक्षा आहेत. या गटाच्या माध्यमातून भाजणी चकली, उडीद पापड, आवळा कॅण्डी, आवळा सरबत, आवळा पावडर, लिंबू क्रश लोणचे हे महिला स्वतः तयार करून विक्री करायच्या आणि या बचत गटाच्या माध्यमातून बरीचशी माहिती वंदना पाटील यांना मिळाली.
अशी सुचली कल्पना
वंदना पाटील यांचं 12 वी पर्यंतच शिक्षण झालं असून त्यांनी 12 वीचे शिक्षण हे वाणिज्य विभागातून केलं. वंदना पाटील यांच्याकडे पाच एकर शेती आहे. या शेतीत त्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत होत्या. वंदना पाटील यांचा मुलगा एमएस (MS) करण्यासाठी अमेरिकेला गेला. तिथं त्यांच्या मुलाला रेडी टू कुक फूड मिळायचे. त्यात पोहे, उपमा आणि गाजर हे निर्जलीकरण करून मिळायचे. मात्र, त्यांच्या मुलाशी बोलल्यानंतर अनेक प्रश्न त्यांना पडली. यानंतर मुलाकडून निर्जलीकरणाबाबत माहिती जाणून घेतली व उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला.
असा सुरु झाला प्रवास
भाज्या निर्जलीकरण करून त्याचं मुल्यवर्धन करता येणं शक्य आहे का?, त्या आधारावर काही प्रकल्प सुरू करता येतो का? याबाबत कृषी विभागाकडून वंदना यांनी माहिती घेतली. यानंतर त्यांनी ममुराबाद येथे कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना अंतर्गत मजिल्हास्तरीय फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगफ याचे प्रशिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी काही महिलांनासोबत घेऊन आत्मविश्वासाच्या जोरावर 19 नोव्हेंबर 2022 रोजी म्हणजेच महिला उद्योजकतेच्या दिवशी त्यांनी मगायत्री फूड्सफ या नावाने कंपनीची स्थापना केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून वंदना पाटील या भाजीपाल्याची पावडर तयार करून बाजारात विक्री करत आहेत. तसेच वंदना यांच्या या उद्योगामुळे महिलांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे.
अशी बनवली जाते भाजीपाल्याची पावडर
भाजीपाल्याची पावडर तयार करण्यासाठी सर्वात आधी भाजीपाला स्वच्छ धुवून घेतला जातो. भाजीपाला स्वच्छ केल्यानंतर कटिंग मशीनच्या माध्यमातून भाज्या चिरल्या जातात. त्यानंतर चिरलेल्या भाज्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून सुकवल्या जातात. या पध्द्तीमुळे भाज्यांचा रंग आणि गुणवत्ता कायम असते. पुढे सुकवलेल्या भाज्यांची पावडर तयार केली जात असल्याचं वंदना पाटील यांनी सांगितले. तसेच वंदना यांनी बाजारातील मागणी लक्षात घेऊन त्या वेगवेगळ्या भाज्या निर्जलीकरण करून त्यापासून पावडर तयार करत आहेत. काही भाज्या त्या केवळ कोरड्या करून विकतात. केळीच्या कंबळाचे पावडर, कांदा, टोमॅटो, बीट, शेवगा, मेथी, पालक, कोथिंबीर, कढी पत्ता, आलं इत्यादी भाज्यांची पावडर तयार करून फूड उद्योगाच्या माध्यमातून बाजारात विकल्या जात आहे. या मूल्यवर्धित भाज्यांची पावडर नायट्रोजन गॅसच्या मदतीने पॅकिंग केल्यास एका वर्षापर्यंत वापरली जाऊ शकते. तसेच शेवगा (मरिंगा पावडर) पावडरची मागणी वाढली असून त्याची पूर्तता होत नसल्याच वंदना पाटील यांनी अॅग्रोवर्ल्डशी बोलताना सांगितले.
महिन्याकाठी 2 लाख रुपयांची उलाढाल
10 किलो कांद्यापासून 1 किलो कांदा पावडर मिळते त्यासाठी 150 रुपये मजुरीसहित 500 रुपये खर्च येतो. 700 रुपये किलो दराने त्या कांदा पावडरची विक्री करत असून त्यांना कांदा पावडर मागे 200 रुपये निव्वळ नफा मिळतो. सुरुवातीला त्यांना महिन्याला 15 ते 20 रुपये नफा मिळायचा. मात्र, आता महिन्याला सरासरी 2 लाख रुपयांची उलाढाल करत असून सर्व खर्च वजा जाता त्यांना किमान 50 हजार रुपये नफा मिळत आहे. मात्र, आता भाज्यांच्या पावडरची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
अडचणींवर केली मात
सुरुवातीला वंदना यांना अनेक अडचणी आल्या. यावेळी उद्योग उभारण्यासाठी आवश्यक असलेला प्रोजेक्ट रिपोर्ट आणि कागदपत्रांची पूर्तता करून बँकेत सादर केला. मात्र, बँकेत अनेक महिने फाईल पडून राहिल्याने उद्योग उभारताना अडचणी येत होत्या. यावेळी जळगाव जिल्हा कृषी विभागाचे संचालक अनिल भोकरे यांनी पीएमएफएमई मधून प्रकरण मंजूर करून दिले. त्यानंतर 1 लाख 81 हजार रुपयांची सबसिडी मिळाली. आणि उमेद अभियानाचे डी एम हरेश्वर भोई यांनी पीएमएफएमई मधूनच बीज भांडवल उपलब्ध करून दिले. एवढेच नाहीतर वंदना यांना बरेच लोक म्हणायचे इथं भाजी पाल्यांची पावडर चालणार नाही, ही पावडर कुणी खरेदी करणार नाही, मार्केटिंगसाठी अडचणी येतील. पण, या गोष्टींकडे दुर्लक्ष करत वंदना यांनी डोळ्यासमोर एकच ध्येय ठेवले आणि आज त्या अनेक प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवून मगायत्री फूड्सफ सर्वांपर्यंत पोहचवत आहे. याच प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना होल सेलर मिळाले असून नवनवीन ऑर्डर देखील मिळाल्या आहेत.
जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प
कोरोना काळात गावातील महिलांकडून 90 हजार मास्क बनवून घेतले आणि ग्रामपंचायतींना विक्री करून दिले, पाणी फाऊंडेशनच्या कामात श्रमदान केले, वृध्दाश्रमात दिवाळी फराळाचे वाटप केले, दिपस्तंभ मनोबल केंद्र देणगी, पळासखेडा गावात वृक्षारोपण केले, हे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले असून भाज्यांपासून पावडर तयार करणे हा त्यांचा जळगाव जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प आहे.
कोणतेही काम करताना वयाची अट नाही
आपण जे ध्येय निश्चित केलं आहे त्यात निराश न होता त्या दिशेने वाटचाल करत रहा. आपल्यासमोर कितीही स्पर्धा असली तरी आपल्या मालाची गुणवत्ता जर चांगली असेल तर नक्की आपण आपल्या व्यवसायात ध्येय प्राप्त करू शकतो. आपल्या मालाची विक्री होईल का?, असा विचार न करता महिलांनी आशावादी राहावे. कोणतेही काम करायला वयाची अट नसते. मी 50 व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली. बर्याच महिला विचार करतात की माझे वय झाले, मी आता काही करू शकत नाही. पण, जर जिद्द ठेवली तर नक्कीच महिला खूप काही करू शकतात.
– वंदना प्रभाकर पाटील,
संचालिका गायत्री फूड्स
रा. पळासखेडा बु., ता. जामनेर,
जि. जळगाव.