शहादा : समाजातील विविध क्षेत्रात महिलांची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. त्यात कृषी क्षेत्र देखील मागे नाही. केवळ शेतीपुरक जोडधंदा नाही तर शेतीतील यथासांग माहिती, परंपरेने आलेल्या ज्ञानाला व्यापक दृष्टी देवून यशस्वी शेती करण्याचे कार्य देखील महिला शेतकरी करीत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील काठी येथील नंणद, भावजायी यांनी देखील दहा बाय दहाच्या खोली वजा जागेत मशरुमची शेती (mushroom farming) करुन आर्थिक प्रगती साधली आहे. सोबत गावातील महिलांनाही प्रशिक्षित करुन आर्थिक उन्नत्तीचा मार्ग खुला करुन देत आहेत.
आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, जिद्द व चिकाटीचा अवलंब करत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी या पाच किलोमीटर अंतरावर देवमोगरा पुनर्वसातील किरताबाई वसावे व लिलाबाई बसावे या दोन महिला आदर्श महिला शेतकरी आहेत. मइच्छा तिथे मार्गफ या उक्तीला सार्थ ठरवित किरताबाई व लिलाबाई वसावे या नणंद भावजयी यांनी कुटुंबाला अर्थसाक्षर (economic progress) बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अस्मानी सुलतानी संकटावर मात करीत आज मशरूम शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवित आहेत. आपल्या प्रयत्नांतून केवळ आपलीच प्रगती व्हावी या उद्देशाला छेद देत शेकडो महिला शेतकर्यांना प्रशिक्षण देत आहेत. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे बारमाही पिक असलेल्या ममशरूमफ ची शेती त्या करीत आहेत.
पतीकडून मिळाली प्रेरणा
लिलाबाई यांना त्यांच्या पतीपासून मशरुमची शेती करण्याची प्रेरणा मिळाली. गुजरात राज्यातील डायमंड सिटी म्हणून ओळख असलेल्या सुरत शहरात त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु, व्यवसाय करता करता मन गावाकडे वळू लागले. जणू काही गड्या आपला गावच बरा.., गावाकडे गेले पाहिजे, बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे, असे वाटू लागले. त्यामुळे गावी घरी परतलो. परंतु, घरची जबाबदारी आणि जोडीला व्यवसायाची पिंड स्वस्थ बसू देईना. कमीत कमी भांडवलात जास्त उत्पादन देणारे पीक कोणते, त्यासाठी पोषक वातावरण व हवामान याचा अभ्यास करीत असतांना मशरुम पिकाविषयी समजले. आणि मशरूमचे पिक घेण्याचे ठरल्याचेही त्या सांगतात. मशरुमची शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 2018-19 साली किरताबाई व लिलाबाई वसावे या नणंद भावजयी यांनी दहा बाय दहाच्या जागा वजा खोलीत मशरुमची शेती करण्याला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी 100 बॅगांमध्ये मशरुची लागवड केली. त्यासाठी त्यांना 4 हजाराच्या जवळपास खर्च आला. अत्याधुनिक पध्दतीने शेती केली असती तर आणखी खर्च वाढला असता. त्यामुळे वातावरणाचा अभ्यास करुन खोलीचे वातारवण नैसर्गिक पद्धतीने बदलुन खर्च कमी केल्याचेही त्या सांगतात.
पहिल्याच प्रयत्नात 16 हजारांचे उत्पन्न
सुरुवातीला 100 बॅगांमध्ये मशरुमची लागवड केली. मशरुम हे पिक कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 30 दिवसात येत असल्याने पहिल्याच महिन्यात व पहिल्याच प्रयत्नात चांगले उत्पादन मिळाले. तब्बल 16 हजारांचे उत्पन्न मशरुमच्या शेतीतून मिळाल्याने आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी सांगितले.मशरुम शेतीच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्यानंतर लिलाबाई, किरताबाई व राजेंद्र वसावे यांनी गावातील तसेच इतर भागातील शेकडो महिलांना प्रशिक्षण दिले. यामुळे अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून या महिला देखील महिन्याकाठी 10 ते 16 हजारांपर्यत उत्पन्न मिळवित आहेत. येणार्या काळात आणखी काही महिलांना प्रशिक्षित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
अनेक जिल्ह्यात विक्री
लिलाबाई आणि किरताबाई यांना मशरुमच्या शेतीतून महिन्याकाठी 20 ते 25 हजारांचे उत्पन्न मिळत आहे. त्यांच्या शेतात उत्पादीत होणारे मशरुम नंदुरबार जिल्ह्यासह नाशिक, मुंबई यासह गुजरात राज्यात विक्री होत आहेत. घरी बसल्या जरी या मशरुमची विक्री केली तरी 300 रुपये प्रति किलो दराने या मशरुमची विक्री होत असल्यानेे वर्षभरात 1 ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे त्या सांगतात.
महिन्याला 60 किलो उत्पादन
एक महिन्यात म्हणजेच अंदाजे 25 ते 30 दिवसांत दहा बाय दहाच्या खोली वजा जागेत मशरूमसाठी लागणारे 20 ते 30 अंश तापमान व 70 ते 90% आर्द्रता असे वातावरण ठेवल्यास 40 ते 60 किलो मशरूमचे उत्पादन होऊ शकते. सुरवातीला वातावरणाचा अंदाज आणि संयम राखला तर नक्कीच दर महा एक महिना 10 ते 12 हजार रुपये कमवू शकतो, असे त्या सांगतात.