Home तांत्रिक महत्वाच्या औषधी वनस्पती भाग- ३ अडुळसा वनस्पती

महत्वाच्या औषधी वनस्पती भाग- ३ अडुळसा वनस्पती

   अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उंच वाढणारे झुडूप आहे. पाने हिरवी, लांबट, वर्तुळाकार, टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात. मध्यम आकाराचे, झुडपाचे सोटमूळ लांब वाढते. खोडाला फांद्या समोरासमोर येतात व पेर फुगलेली असतात. फुले पांढरी असतात फळे टोकाला लागतात.
    याची लागवड पावसाळ्यात करावी, कुंपणाच्या कडेला, शेतजमिनीच्या बांधावर 1 x 1 मीटर अंतरावर याची लागवड करता येते. शेतात 60 x 60 सें.मी. अंतरावर लागवड करावी.  या वनस्पतीवर रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत नाही. पानांची किंवा फुलांची काढणी गरजेनुसार झाडाच्या पानाच्या प्रमाणानुसार करावी. साधारणतः तिसऱ्या महिन्यापासून पाने काढणीसाठी तयार होतात. त्यानंतर एक ते दोन महिन्यांच्या अंतराने छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर पाने, फांद्या, फुले हे सावलीत वाळवावीत. संपूर्ण वाळल्यानंतर त्याची पावडर करावी. यामध्ये कटू गुण असल्याने यावर बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही.

संपर्क – 02426- 243315
औषधी व सुगंधी वनस्पती योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

—————————————————————————————————————-
        अडुळसा ही अ‍ॅकॅंथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅधॅटोडा व्हॅसिकाआहे. भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत ती आढळते. ही वनस्पती महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने लावतात. अडुळसा सु. १.२-२.४ मी. उंच वाढते. पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीच्या टोकास फुलोरा येतो. फुले पांढरट रंगाची असतात. फळ लांबट व टोकदार असते. अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधांत वापरली जातात. कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा औषध मोठ्या प्रमाणावर वापरतात. साधारणपणे २००० वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात असावा, असे आयुर्वेदातील उल्लेखांवरून दिसते. अडुळशापासून आयुर्वेदीय पद्धतीने अनेक औषधे तयार केली गेली आहेत.