प्रतिनिधी/मुंबई
देवगड हापूस म्हणून तुम्ही बाजारातून जो आंबा आणताय तो खरंच अस्सल देवगड हापूस आहे का? याची एकदा खात्री करा. कारण देवगड हापूसच्या नावाखाली तुमच्या माथी कर्नाटकचा आंबा मारला जात आहे. दामदुप्पट पैसे मोजून खरेदी केलेला हापूस कर्नाटकाचा तर नाही ना? देवगड हापूसच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते.
कोकणातून दररोज १० ते १२ हजार पेट्या आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. सध्या चार ते पाच हजार रु पर्यंत दराने पेटीची विक्री होत आहे. मात्र कर्नाटक हापूस आंबा बाजारात आला असून कर्नाटक हापूसची विक्री व्यापाऱ्यांकडून कोकणच्या हापूसच्या नावाखाली सुरु आहे. त्यामुळे कोकणच्या हापूसला दराचा फटका बसत आहे.
वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणच्या हापूस बरोबरच कर्नाटक राज्यातून हापूस आंबा विक्रीला येत आहे. कोकणच्या हापूस प्रमाणेच कर्नाटकाचा हापूस दिसतो. मात्र चव, दर्जा व सालीमध्ये फरक आहे. कोकणातून कलमे नेऊन कर्नाटक मध्ये हापूसची लागवड केली गेली असली तरी माती, पाणी तसेच हवामानामुळे ( भौगोलिकदृष्ट्या ) फळामधील वैशिष्टे वेगवेगळी आहेत. आंब्यामधला
फरक कसा ओळखायचा?
या फसवणुकीचा फटका कोकणातल्या हापूस उत्पादकांनाही बसत आहे. कर्नाटक आणि केरळातला आंबा हापूसप्रमाणेच दिसायला असल्यानं ग्राहकांची फसगत होत आहे. पण कोकणातला हापूस हा चवीला कर्नाटक आंब्यापेक्षा उजवा असतो. हापूसचा देठ खोल असतो, कापल्यावर तो केशरी रंगाचा दिसतो. हापूसची साल पातळ असते. आणि त्याला वेगळा सुगंध असतो. हापूस आंब्याचा आकार हा विशिष्ठ असतो त्याला कुठे ही चोच किंवा टोक नसते, हापूस हा कधी लांबट नसतो तो जरा गोलसर लांबट असतो. आंब्याची साल म्हणजे स्किन हे प्लेन असते ते कुठे ही खडबडीत नसते, सालीवर पांढऱ्या फुल्यांच्या लहान छिद्र असतात पातळ साल असता, नाममात्र फायबर असता.
अशी होते भेसळ…
कोकणातील हापूसची विक्री ७०० ते ९०० रु. डझनने सुरु आहे. मात्र कर्नाटकाचा हापूस ७० ते ८० रु किलो दराने विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे विक्रेते दोन्ही प्रकारचे आंबे विकत घेतात. दोन्ही प्रकारचे आंबे एकाच वेळी पिकायला ठेवतात. आंबे पिकल्यानंतर ते एकत्र करून भरतात. कोकणाचा हापूस सांगून कर्नाटक हापूसची जास्त दराने विक्री करून पैसे मिळवितात. हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हीच फसवणूक सुरु आहे.