यशोगाथा

दूध पंढरीचे वारकरी आमडदे येथील मांगो पाटील

एका वर्षात 29 हजार लिटर दुधाचा पुरवठा करून व 15 लाख 37 हजार रुपये बँक खात्याद्वारे पेमेंट मिळवून राज्यात पहिला येण्याचा मान भडगाव तालुक्यातील आमदडे येथील मांगो रायला पाटील यांनी मिळविला आहे. डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जन्म दिनी राष्ट्रीय डेअरी विकास संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करून नुकतेच त्यांना गौरविण्यात आले.

महाराष्ट्रात मुख्य दूध उत्पादक जिल्हयांत जळगाव जिल्हा गणला जातो. जिल्हा सहकारी दूध संघाने गावो गावी दूध उत्पादक सहकारी संस्थांचे जाळे विणून राज्यातच नव्हे तर देश पातळीवर लौकिक मिळवला आहे. यासाठी राष्ट्रीय दूध विकास महामंडळ जिल्हा दूध संघाना सतत प्रोत्साहित करीत असते. सर्वाधिक दूध पुरवठादार आणि त्यांना डिजिटल स्वरूपात पेमेंट मिळविणार्‍या दूध उत्पादकांना सन्मान करणे हा त्यातलाच एक भाग. हा मान यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून मांगो रायला पाटील यांनी मिळविला आहे.
राज्यात ज्याप्रमाणे जळगाव जिल्हयाने दूध उत्पादनात क्रांती केली तशीच परिस्थिती भडगाव तालुक्यातील आमडदे येथील आहे. आमडदे हे शिक्षण आणि उत्कृष्ट शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे गाव. गिरणेच्या कालव्यामुळे केळी, ऊस, आंबा उत्पादनाचे समृद्ध शिवार म्हणजे आमडदे.


गिरणेच्या पाण्यामुळे ओलिताची चांगली सोय असल्याने जळगाव जिल्हयात जिल्हा दुध उत्पादक सहकारी संस्था (विकास) स्थापन झाल्यापासूनच म्हणजे 1967 पासून येथे सहकारी तत्वावर कै.दीनानाथ दूध उत्पादक संस्था सुरू झाली. त्यामुळे शेतीसोबत दुग्धोत्पादन हा येथील शेतकर्‍यांचा पूरक व्यवसाय झाला. अशा अनेक शेतकर्‍यापैकीच मांगो रायला पाटील हे एक. मांगो पाटील यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या आर्थिक वर्षाच्या कालावधीत तब्बल 29 हजार लिटर दुधाचा पुरवठा करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला.
मांगो पाटील मागील 15 वर्षांपासून दूध संघास दूध पुरवितात. त्यांच्याकडे 20 म्हशी असून ते गावातील डेअरीत वर्षभर दूध पुरवितात. ते फक्त मोठे दूध उत्पादकच नाहीत तर त्यांच्या दुधाची गुणवत्ताही उत्तम आहे. त्यांच्या दुधाला 9.5 इतका फैट तर छडऋ 9 चा लागतो. त्यामुळे त्यांना सुमारे 55 रुपये प्रति लिटर असा सर्वोच्च दर मिळतो. त्यांच्या दुधाचे पेमेंट त्यांना त्यांच्या खात्यावर परस्पर (डिजिटल) अदा केले जाते. त्यासाठीच त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


दूध पुरवठ्यात सातत्य आणि गुणवत्ता टिकून राहावी यासाठी मांगो रायला पाटील व त्यांचे 3 मुले प्रयत्न करतात. त्यांना दूध डेअरीचे चेअरमन प्रताप हरी पाटील व सचिव अनिल वाघ यांचे मार्गदर्शन मिळत राहते. दूध उत्पादनात सतत लक्षणीय कामगिरी करत राहिल्याने मांगो रूपला पाटील यांना आर्थिक सुबत्ता अनुभवास मिळत आहे.

Related Articles

Back to top button