हा आठवडा मुसळधार पावसाचा…

प्रतिनिधी/ पुणे
अरबी समुद्रातील पूर्व मध्य भाग व राज्याची किनारपट्टी या दरम्यान या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती व दक्षिण गुजरात किनारपट्टी ते उत्तर कर्नाटक व उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या वातावरणामुळे राज्यात आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आजपासून (दि. १४ सप्टेंबर) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून वादळी वारे व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी दिला आहे.
काय आहे वातावरण?
अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग व महाराष्ट्राची किनारपट्टी यादरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती अरबी समुद्राच्या वायव्य परिसर ते गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत असून ती समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. यासह उत्तर प्रदेशचा आग्नेय भागात कमी दाबाचा पट्टा असून अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दरम्यान बंगालच्या उपसागराच्या पुर्व मध्य आणि उत्तर आंध्रप्रदेशाच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्यांचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या पश्चिममध्ये भाग व उत्तर आंध्र प्रदेशाच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. सध्या कोकण व मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती आहे.

कुठे बरसणार वरुणराजा
सर्वप्रथम कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी केला असून विदर्भासह मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागात जोरदार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दि १४ सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी तर १५ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, विदर्भ व कोकणात पावसाचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे १६ सप्टेंबर रोजी कोकण , मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यताही हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.





