प्रतिनिधी/ पुणे
हवामान बदलाचे परिणाम आता शेतीवरही दिसायला सुरुवात झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊसही पडला आहे. महाराष्ट्राबरोबर देशातील काही भागात हिवाळा संपताना आणि उन्हाळ्याची सुरुवात होत असताना अवकाळी पाऊस पडतो. मात्र यावेळचा अवकाळी पाऊस हिवाळ्यातच सुरू झाला आहे. या वातावरणाचा पिकांवर मात्र प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ हवामान रोगांचा प्रादुर्भाव होण्यास अनुकूल आहे. त्यामुळे या दिवसांत रब्बी हंगामातील पिके संकटात सापडली आहेत.
सातत्याने होत असलेल्या हवामान बदलाचा परिणाम पिकांवरही होत आहे. त्यामुळे थंडीदेखील कमी झाली आहे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच कांदा पिकावर करपा, गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. भाजीपाला पिकांनाही हवामान त्रासदायक ठरत आहे. एकूणच रब्बी हंगामातील पिकांना सध्याचे हवामान त्रासदायक ठरत आहे. या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या हवामान काळात पिकांची काळजी कशी घ्यावी, कीडरोगांना प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
पिकांच्या वाढीसाठी थंडी गरजेची आहे. ढगाळ वातावरण वाढल्यामुळे थंडी कमी झाली आहे. या वातावरणाने हरभरा व गहू, तूर, भाजीपाला आदी रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. ढगाळ व दमट वातावरणामुळे द्राक्षबागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या वातावरणात द्राक्षबागांवर ‘प्लझमोपॅरा व्हीटीकोला’ म्हणजेच ‘डाऊनी’ रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तसेच डाळिंब बागांवर देखील बुरशीजन्य रोगाची शक्यता आहे. द्राक्षावर कमी-अधिक प्रमाणात डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. आर्द्रतायुक्त हवामानात डाऊनी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या रोगामुळे द्राक्षपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगाला दमट वातावरण अनकूल असते. डाऊनीची लागण द्राक्षबागांमध्ये पाने, फुले व घडावर होत असते. त्यामुळे रोगग्रस्त भागावरील विषाणू मृत होतात व रोगग्रस्त भाग निकामी होतो. या रोगाला पोषक हवामान असल्यास रोगाचे नियंत्रण करणे अवघड होते. ढगाळ हवामानामुळे फळबागांवर बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तर भाजीपाला आणि तृणधान्य पिकांवर तांबेरा रोग येईल.
यामुळे होतो पिकावर विपरीत परिणाम
रब्बीच्या हंगामासाठी थंडी हा प्रमुख घटक असतो. प्रकाश संश्लेषण क्रिया ढगाळ हवामानामध्ये रोखली जाते. परिणामी फळबागांवर बुरशीजन्य रोग वाढतात. रोगराई रोखण्यासाठी ८० टक्के गंधक असलेली औषधांची फवारणी शेतकऱ्यांनी करावी.-
गव्हाच्या पिकावर परिणाम
गव्हाच्या पीकवाढीच्या अवस्थेत असताना अचानक तापमानात झालेली वाढ या पिकाच्या वाढीच्या दृष्टीने घातक आहे. उष्मांकात वाढ झाल्याने आणि थंडीच्या प्रमाणात घट झाल्याने पिकात लवकर परिपक्वता येण्याच्या क्रियेत झपाट्याने वाढ होते. गव्हाच्या पीकवाढीच्या अवस्था निश्चित अथवा ठराविक कालावधीपूर्वी पूर्ण करते. त्याचा पिकाच्या वाढीवर, उंचीवर, कांड्यांच्या लांबीवर, ओंबीच्या लांबीवर, दाण्याच्या संख्येवर आणि दाण्याच्या आकारावर अनिष्ट परिणाम होतो. उत्पादनात, उताऱ्यात घट येऊन दाण्याची प्रत खालावते. जेव्हा थंडीचा कालावधी अधिक असावयास हवा तेव्हा थंडीत चढ- उताराने कालावधी कमी- अधिक होतो आहे. त्याचे थेट परिणाम गव्हाच्या पिकावर दिसतात.
कांदा पिकावर ढगाळ हवामानाचे परिणाम
ढगाळ हवामान येताच तुडतुड्यांची वाढ झपाट्याने होते. पिकातील रस शोषण्याचे काम तुडतुड्यांची पिल्ले सुरवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात करतात. कांदा पातीचा तजेलदारपणा जातो आणि पाती माना टाकू लागतात. कांदा वाढणे आणि पोसणे हे हवामानावरच अवलंबून असते. तसेच करपा रोगाचा प्रादुर्भावही वाढण्याची भीती असते. याचा पिकाचे वाढीवर, उत्पादनावर आणि प्रतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
ज्वारी पिकावरील परिणाम
ढगाळ हवामान ज्वारी पिकास उपयुक्त ठरेल. मात्र वाढणारे तापमानामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन दव पडण्याचे क्रियेत अडथळा येईल, त्याचा परिणाम रब्बी ज्वारी पिकावर होईल. या वेळी पुंकेसर, स्त्रीकेसर आणि फुलधारणेत विशेष अडचणी येणार नाहीत. मात्र दाण्यांची संख्या अधिक असूनही दाण्यांचा आकार लहान राहील. त्यामुळे उत्पादकता घटेल आणि प्रत खालावेल. बागायत रब्बी ज्वारीवर विशेष परिणाम होणार नाही. मात्र कोरडवाहू रब्बी ज्वारीवर त्याचे परिणाम जाणवतील.
हरभरा व तूर पिकावर परिणाम
हरभरा आणि हरभऱ्यावरील घाटे अळीचा उपद्रव वाढेल, तर तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचे प्राबल्य वाढेल. त्यासाठी या दोन्ही किडींपासून पिकाचे संरक्षण करणे आवश्यक राहील. अन्यथा नुकसानीच्या पातळीत वाढ होईल.
हवामान आधारीत कृषि सल्ला आपल्याला म.फु. कृषि विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळ किंवा ०२४२६ २४३२३९ या दूरध्वनी.क्रमांकावर मिळू शकेल.
सौजन्य – इंटरनेट