Weather Updates 2023… सध्या वातावरणातील बदलामुळे आणि अवकाळी पावसाने आधीच शेतकरी चिंतेत आहे. त्यातच एका खाजगी संस्थेने यावर्षी देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने यावर्षीच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच आता यंदा पाऊस कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यावर्षी कमी पाऊस राहणार असल्याचा प्राथमिक अंदाज स्कायमेटकडून वर्तविण्यात आला आहे. देशामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत 858.6 मिमी सरासरी म्हणजेच 94 टक्के पाऊस राहण्याची शक्यता आहे.
या भागात होणार कमी पाऊस
देशाच्या मध्य आणि उत्तर भारतात कमी पावसाची शक्यता असल्याचे स्कायमेटने सांगितले. मध्य प्रदेश, गुजरात, आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यामध्ये कमी पावसाचा अंदाज असून पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, स्कायमेटने दिलेल्या प्राथमिक अंदाजानंतर पुन्हा मान्सूनबाबतचा अंदाज जाहीर करणार आहे. तसेच देशाच्या काही भागात कमी पावसाची शक्यता असून हे भाग कोणते आहेत याबाबत पुढच्या अंदाजात चित्र स्पष्ट होणार असल्याचं स्कायमेटने सांगितले आहे.