मुंबई : Weather Alert… गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस होवून शेतकर्यांचे नुकसान झाले होते. यातून शेतकरी सावरत नाही तोच आणखी एक संकट शेतकर्यांसमोर उभे झाले आहे. राज्यात दि.7 ते 10 एप्रिल दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणावर होणारी झाडांची कत्तल, वाढते सिमेंटचे जंगल यांसारख्या मानवी चुकांमुळे वातावरणात आणि ऋतुमानात मोठा बदल झाला आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम म्हणून वेळी अवेळी पाऊस, गारपीट, वारा वादळ यासारख्या घटना घडत आहेत. पावसाळ्यात पावसाला उशिराने सुरुवात होवून मध्येच पाऊस गायब होते. याशिवाय हिवाळ्यात, उन्हाळ्यात देखील पाऊस पडत आहे. वातावरणातील या बदलाचा सर्वाधिक फटका हा शेतकर्यांना सहन करावा लागत आहे.
या जिल्ह्याना येलो अर्लट
हवामान विभागाकडून 7 एप्रिल रोजी कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, लातुर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया. 8 एप्रिल रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छ.संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, परभणी, जालना, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली यांना येलो अर्लट देण्यात आला आहे तर सातारा, कोल्हापूर सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातुर आणि नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. 9 रोजी पालघर, ठाणे, रायगड, उस्मानाबाद, लातुर, नांदेड वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना तर 10 रोजी कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, छ.संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांना येलो अर्लट देण्यात आला आहे.
पावसाची शक्यता…
येला अलर्ट (Yellow Alert) देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये दि.7 ते 10 एप्रिल या चार दिवसात ढगांचा गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यावेळी 30 ते 40 कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहतील असा इशाराही देण्यात आला आहे. तर ऑरेंज अर्लट (Orange Alert) देण्यात आलेल्या जिल्ह्यात विजांचा कडकडाट, वादळी वार्यासह गारपिट होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
उरकून घ्या कामे…
वातावरणातील बदलामुळे शेतकरी संभ्रमात सापडला आहे. गेल्या वर्षी थंडी लांबल्याने काही शेतकर्यांनी वेळेवर तर काहींनी उशिराने रब्बीच्या हंगामातील गहू, हरभरा, करडई यांसारख्या पिकांची उशिराने पेरणी केली होती. संपूर्ण हंगाम चांगला गेल्याने उत्पादन चांगले येईल अशी आशा शेतकर्यांना होती. मात्र, ऐन पिक काढणीच्या अवस्थेत असतांना गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस होवून पिकांचे नुकसान झालेे. उशिराने पेरणी केलेल्या पिकांची काही काढणी सुरु आहे तर काही ठिकाणी अद्याप पिक शेतात उभे आहे. त्यामुळे पुन्हा अवकाळी पाऊस होवून नुकसान होण्यापूर्वी पिकांची काढणी करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.