दीपक खेडेकर
पतीच्या एस.टी.मधील नोकरी निमित्त होणार्या बदल्या, मात्र पुणे स्वारगेट येथे बदली झाल्यावर एस.टी. वसाहतीतील काही महिला एकत्र येऊन मार्केटयार्ड मधून फळे एकत्रित पणे खरेदी करून समोरच असलेल्या शासकीय कॅनिंग सेंटर मध्ये प्रक्रिया करून घेत असत. पण, कालांतराने हे कॅनिंग सेंटर बंद झाल्यामुळे आपल्या दुपारच्या फावल्या वेळेत आपल्या कुटुंबिय, नातेवाईक, मित्रमंडळी यांना स्वच्छ व भेसळ विरहित सरबत, जॅम, सॉस, आंबा पल्प इत्यादी सारखे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ बनवणे बंद करावे लागेल. पण वडिलांच्या प्रेरणा व पाठिंब्यामुळे छोट्या छोट्या गुंतवणुकीने घरगुती स्वरूपातील कॅनिंगचे (फळ प्रक्रियेचे) मोठ्या उद्योग मध्ये रूपांतर होणे हा प्रवास आपण या लेखातून जाणून घेणार आहोत, कोल्हापूर येथील मिनल प्रतापराव भोसले यांचा.
मिनल भोसले या मार्केट यार्ड समोरील ज्या कॅनिंग सेंटर वरून सर्व महिला फळांची प्रक्रिया करून घ्यायच्या ते कॅनिंग सेंटर काही कारणास्तव अचानक बंद झाले. त्यामुळे मात्र सर्वांच्या घरी सिजन नुसार बनविले जाणारे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविणे बंद झाले. मात्र योगायोगाने पुणे येथे मिनलताईंचे माहेर असल्यामुळे वडिलांच्या शेतातून सुद्धा टोमॅटो, डाळिंब घेऊन प्रक्रिया केली जायची. ती सुद्धा खरेदी आता बंद करावी लागली. त्यामुळे वडिलांकडून विचारण्यात आले की, आता तुम्ही प्रक्रियायुक्त पदार्थ बनवणे बंद का केले? त्यांना कॅनिंग सेंटर बंद झाल्याचे कारण मिनल ताईंकडून सांगण्यात आले. त्यावर त्यांचे वडील त्वरित म्हणाले र्कीें तू कॅनिंग सेंटर का सुरू करत नाही? तेव्हा बाबांनी माझ्या डोक्यात टाकले कॅनिंग सेंटर सुरू करायचे! असे आवर्जून मिनलताई सांगतात.
बाबांचा पाठिंब्यामुळे मिळाले बळ
मुलींना सॉस, केचप, जॅम खूप आवडायचे त्याप्रमाणे बाजारपेठेमधून ते आणून द्यावे लागायचे पण हे स्वच्छ, भेसळयुक्त आहेत हे कळायचं. तरी सुद्धा ते त्यांना आवडतं म्हणून नाईलाजास्तव द्यावे लागायचे. पण मात्र प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्यामुळे यांना आवडणारे सर्व पदार्थ हे भेसळ विरहित स्वच्छ व ताजे भेटू लागले. कॅनिंगसाठी लागणारे सुरवातीचे आवश्यक साहित्य पॅकिंग मशीन, शेगडी व इतर काही साहित्य हे बाबांनी आणून दिले, असे मिनलताई अभिमानाने सांगतात.
बदलीच्या ठिकाणी घरगुती कॅनिंग सेटअप
पतीच्या एसटीमधील नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी बदल्या होत असायच्या, मात्र जिथे बदली व्हायची तिथे मिनलताईंचा घरघुती कॅनिंग सेंटरचा सेटअप तयार असायचा. या कामामध्ये मुलींची मदत होऊन, कच्चा माल आणणे, पॅकिंग साहित्य आणणे इत्यादीसारखी अनेक कामे पूर्ण करण्यासाठी त्यांचे पती प्रतापराव भोसले यांचे वेळोवेळी सहकार्य मिळते, असे आवर्जून सांगतात.
कोल्हापूर येथील बदली ठरली टनिंग पॉईंट
मिनलताई यांचे सासर कोल्हापूर येथे असल्यामुळे येथेच त्यांनी घर बांधून त्या घरामध्येच कॅनिंग (फळ प्रक्रियेला) ला सुरुवात केली. कोल्हापूर येथे फळ प्रक्रियेचा कायम स्वरुपाचा सेटअप करून छोट्या-छोट्या गुंतवणुकीतून मोठा सेटअप निर्माण झाला असे मिलनताई ठामपणे सांगतात.
पियुष नावाच्या ब्रँडची निर्मिती
मिनलताई यांनी आवश्यकतेनुसार वेळोवेळी फळ प्रक्रियेमधल्या तांत्रिक व शास्त्रीय गोष्टी समजण्यासाठी कृषी विद्यापीठ, मिटकॉन या सारख्या संस्थांमधून फळ प्रक्रिया या विषयातील शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पियुष कॅनिंग सेंटर व फ्रुटस प्रोसेसिंग युनिट या नावाने ब्रँड नावा रुपास आणून उद्योजकतेमध्ये यशस्वी टप्पा गाठला. चिंच, आंबा, टोमॅटो या मालावर प्रक्रिया करून बाजारपेठेमध्ये विकणे. त्याचबरोबर अन्य व्यावसायिक, शेतकरी यांच्याकडून कच्चामाल घेऊन त्यांच्या मालांवर सुद्धा प्रक्रिया करून देणे हे व्यावसायिक काम पियुष नावाच्या ब्रँड खाली केले जाते.
शेतकर्यांच्या शेतमाला सुद्धा प्रक्रिया
पहिल्यांदा अनेक ठिकाणावरून कच्चा माल आणावा लागायचा, पण आतामात्र कोल्हापूरमधील अनेक शेतकरी आपल्या शेतीमध्ये तयार केलेला शेतमाल मीनलताईंकडून प्रक्रिया करून प्रत्यक्ष बाजारामध्ये आपल्या ब्रँडखाली विकत असतात. शेतकर्यांबरोबर इतर काही व्यवसायिक आपल्या कच्चा मालावर प्रक्रिया करून स्वतःच्या ब्रँड खाली चांगल्या दराने विक्री करत असतात.
पतीची भक्कम साथ
मिनलताई यांना अगदी सुरुवाती पासूनच पती श्री प्रतापराव भोसले यांचा भक्कम पाठिंबा मिळत राहिली आहे. आता तर त्यांचे पती सेवा निवृत्त असल्यामुळे मिनलताईं एवढा त्यांचाही फळ प्रक्रिया उद्योगामध्ये सहभाग असतो. प्रक्रिया युक्त पदार्थांच्या मार्केटिंगची मुख्य जबाबदारी तेच सांभाळतात, असे मिनलताई सांगतात.
नातेवाईक, मित्रमंडळी हेच सुरुवातीचे ग्राहक
आपले नातेवाईक, मित्रमंडळी मुलींचे मित्रमंडळी, नातेवाईकांचे कामांमधील सहकारी,शेजारी, माउथ पब्लिसिटी हेच आपल्या उत्पादनाचे सुरुवातीचे ग्राहक होते त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला मालाची निर्मिती करण्यासाठी सतत ऊर्जा मिळत राहिली म्हणूनच या उद्योगाची दिवसेंदिवस वाढ होत राहिली, असेही त्या सांगतात. संस्था, प्रदर्शन, बाजारपेठमधून मार्केटिंग स्वयंसिद्धासारख्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी चांगले व्यासपीठ मिळते, असे मिनलताई सांगतात. या संस्थेच्या माध्यमातूनच आयोजित केली जाणारी बाजार पेठ, वेगवेगळ्या ठिकाणची आयोजित प्रदर्शने, कृषी प्रदर्शनांमध्ये भाग घेतल्यामुळे प्रक्रिया युक्त मालाला चांगली बाजारपेठ मिळून कस्टमर बेस तयार झाला. त्यामधूनच आम्हाला अनेक ठिकाणचे डिस्ट्रीब्यूटर सुद्धा मिळाले. याचा व्यवसाय वृद्धीसाठी चांगला फायदा झाला.
प्रशिक्षण क्षेत्रातही काम
आपल्या सारखेच ग्रामीण तसेच निमशहरी भागातील महिला तरुण-तरुणी यांना फळ प्रक्रिया उद्योग निर्मिती करून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, या उद्देशाने मिनलताई व त्यांचे पती प्रतापराव भोसले यांना बरोबर घेऊन त्याच्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तसेच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन फळ प्रक्रिया या विषयाचे प्रशिक्षण देत असतात.
टप्प्या टप्प्याने गुंतवणूक
ह्या फळ प्रक्रिया उद्योगांमध्ये कधीही आपण मोठ्या प्रकारची गुंतवणूक केलेली नाही. जस-जसा उद्योग वाढत गेला, तस-तशी थोड्या थोड्या प्रमाणावर आपण यामध्ये गुंतवणूक करत राहीलो. छोट्या छोट्या गुंतवणुकीमधून मोठी उलाढाल केली, असे मिनलताई सांगतात. शासकीय सेवा योजनेचा लाभ दिवसें दिवस उद्योगांमध्ये होणार्या वृद्धीमुळे मिनलताई यांना फळ प्रक्रिया उद्योगांमध्ये वाढ करणे आवश्यक वाटू लागले. यामुळे त्यांनी शासनाच्या मुद्रा लोन या योजनेचा लाभ घेऊन उद्योगाचा आणखी विस्तार केला.
वर्षाकाठी 6 लाखाची उलाढाल
प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून वर्षाकाठी रुपये 6 लाखाची उलाढाल होते. यामधून सर्व खर्च वगळता निव्वळ 50 टक्के एवढा नफा मिळत असल्याचे मीनलताई सांगतात. महिलांसाठी रोजगार निर्मिती फळ प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून तीन महिलांना पूर्णवेळ रोजगाराची उपलब्धता होते तसेच आजू बाजूच्या दहा महिलांना हंगामी स्वरूपाची रोजगार निर्मिती होत असते.
फावल्या वेळेचा सदुपयोग करावा
महिलांनी आपली चौकट सांभाळून मिळालेला दुपारच्या फावला वेळ काहीतरी नावीन्य पूर्ण निर्मिती करण्यामध्ये लावावा. ज्यामध्ये त्यांनी जिद्द, प्रामाणिकपणे कष्ट करून हाती असलेला कामांमध्ये चिकाटी ठेवून राहावे. यामधून नक्कीच आपली प्रगती होते.
– सौ. मिनल प्रतापराव भोसले,
रा. कोल्हापूर