मुंबई : देशभरातील शेतकर्यांना शेतमाल काढणी पश्चात माल साठविण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने कृषी पायाभूत सुविधा अंतर्गत वित्त पुरवठा सुविधा योजना (Agriculture Infrastructure Fund Scheme) राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 2 कोटी रुपयांपर्यंच्या कर्जावर पत हमीसह मुदत कर्जाच्या व्याजदरावर 3 टक्के सवलत देखील सरकारकडून देण्यात येत आहे.
देशभरातील शेतकरी, कृषी उद्योजक, स्टार्ट-अप, विविध कार्यकारी सहकारी संस्था, सहकारी पणन संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), बहुउद्देशीय सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट, संयुक्त उत्तरदायीत्व गट, केंद्रिय तसेच राज्य यंत्रणा अथवा स्थानिक संस्थानी प्रस्तावित केलेले सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प आदींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
यासाठी मिळेल लाभ
योजनेंतर्गत शेतमाल साठवणीसाठी गोदाम, पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायपनिंग चेंबर्स, सायलोज, लॉजिस्टीक, कोल्ड स्टोरेज, असेयींग युनिट्स उभारणीसाठी शेतकर्यांना कर्ज मिळणार आहे. काढणी पश्चात प्राथमिक प्रक्रियेसाठीच्या प्रकल्पांना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर पतहमी तसेच व्याजदरावर 3 टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत 7 वर्षांपर्यंत असणार आहे. या प्रकल्पांना इतर योजनेतून देखील अनुदान मिळणार आहे. योजनेचा लाभ घेतांना लाभार्थींना प्रकल्प किमतीच्या किमान 10 टक्के हिस्सा देणे बंधनकारक आहे.
या ठिकाणी करा अर्ज
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदाराला दोन वेगवेगळे अर्ज करावे लागणार आहेत. AIF अंतर्गत व्याज सवलतीसाठी http://www.agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर तर कर्जासाठी बँकेकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. कृषी विभागाशी संपर्क साधून अर्ज सादर करतांना अर्जासोबत सविस्तर प्रकल्प अहवालाची मूळ प्रत आणि कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहेत. अर्जदाराने सविस्तर प्रकल्प अहवालासह कर्ज देणार्या वित्तीय संस्थेकडे मूल्यांकनासाठी अर्ज पाठवावा. कर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यात निधी थेट जमा होणार आहे.