गुजरातच्या आदिवासीबहुल डांग जिल्ह्यातील, अर्ध-साक्षर महिलांच्या गटाने शेतकरी उत्पादक संघटना (FPO) स्थापन करून कोट्यवधी रुपयांचा उपक्रम तयार केला आहे. डांगमधील विविध खेड्यांमधून आलेल्या या उत्साही महिलांच्या कामातून त्यांचे परिश्रमपूर्वक मिळवलेले यश दिसून येते. डांगमधील या आदिवासी महिला शेतकरी आता कृषी उद्योजक झाल्या असून कोट्यवधी रुपयांचा शेती व्यवसाय करू लागल्या आहेत.
डांग आदिवासी महिला खेडूत एफपीओ या आदिवासी शेतकरी उत्पादक संस्थेच्या महिला सहकाऱ्यांनी यावर्षी सुमारे 1.85 कोटी रुपयांची उलाढाल साधली आहे, प्रामुख्याने कृषी बियाणे, सेंद्रिय औषधे आणि इतर बरेच कृषी जिन्नस यांच्या विक्रीद्वारे त्यांनी ही उलाढाल साधली. त्या वांगी, मिरची, टोमॅटो आणि पालक यांसारख्या भाजीपाल्याच्या बियाही विकतात.
कृषी बियाणे किंवा अवजारांची विक्री असो, कंपनीने अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, त्यांचे जीवन बदलले आहे. या सक्षम महिलांनी समाजाची अवास्तव बंधने धुडकावून लावत अनेक समज आणि आक्षेपांना छेद दिला आहे. त्यांच्या व्यवसायाची स्थापना आणि देखभाल करणे तसे सोपे नव्हते. मर्यादित बाजारपेठेमुळे, महिला शेतकऱ्यांनी कापणीनंतर पिके, उत्पादने स्वतः वैयक्तिकरित्या बाजारपेठ शोधून विकावी लागली, परिणामी सुरुवातीला आर्थिक स्थिती डळमळीत झाली. इतरही अनेक आव्हाने होती, पुरुषप्रधान संरचनेचा अडथळा होता. लहान किंवा अल्पभूधारक शेतकरी समूहाला त्यांच्या उत्पादनाची बाजारपेठेत विक्री करण्याच्या क्षमतेत अनेक अडथळे निर्माण होतात. त्यावर मात करण्यासाठी, संस्थेने प्रशासन, विपणन आणि इतर आवश्यक क्षेत्रातील प्रशिक्षणाद्वारे लहान शेतकऱ्यांना सामूहिक सहकारी म्हणून संघटित करण्याची योजना आखली.”
एफपीओच्या माध्यमातून बियाणे विक्री
या दृढनिश्चयी महिलांच्या एकत्रित प्रयत्नांतून, जानेवारीपर्यंत एकूण 1,170 भागधारकांची अधिकृतपणे नोंदणी झाली आहे. संस्थेच्या महिला कर्मचाऱ्यांनी यावर्षी सुमारे 1.85 कोटी रुपयांची उलाढाल साधली आहे, प्रामुख्याने कृषी बियाणे, शेती उपकरणे, सेंद्रिय औषधे, मत्स्यबीज, पोल्ट्री फीड आणि इतर विविध उत्पादनांच्या विक्रीद्वारे एफपीओच्या माध्यमातून, डांग गावातील लोकांना फक्त 300 रुपये प्रति किलो दराने भात बियाणे मिळते आणि तेच बियाणे बाजारात 350 रुपये किलो दराने विकले जाते,” असे एफपीओचे सीईओ हसमुखभाई पटेल म्हणाले.
महिलांमध्ये आला नवा आत्मविश्वास
“भाताच्या व्यतिरिक्त, महिला एफपीओच्या माध्यमातून भाजीपाला बियाणे, जसे की वांगी, मिरची, टोमॅटो आणि पालक विकले जाते. हे बियाणे डांगच्या 98 गावांमध्ये उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या सीमावर्ती खेड्यातील शेतकरी देखील कमी खर्चात हे बियाणे घेण्यासाठी येतात,” अशी माहिती आगाखान संस्थेच्या डांग क्षेत्र व्यवस्थापक अंजली गावित यांनी दिली. एफपीओशी संलग्न असलेल्या महिलांमध्ये आता नवा आत्मविश्वास आल्याचे त्या सांगतात.
हक्कांच्या ज्ञानामुळे आता या महिलांनी पंचायतीच्या व्यासपीठाद्वारे स्वच्छ पाणी, रस्ते, पायाभूत सुविधा आणि स्वच्छता सुविधा यासारख्या आवश्यक समस्यांचे निराकरण करून त्यांच्या समुदायाची जबाबदारी घेतली आहे.
फोन कॉलवर बियाणे घरपोहच डांग येथील रहिवासी असलेल्या गमित गीता बेन या एफपीएस उपक्रमाचा एक भाग होण्याच्या फायद्यांविषयी सांगतात, “आधी आमच्या आदिवासी भगिनींना एकत्रितपणे शेतीचे बियाणे घेण्यासाठी आमच्या गावाबाहेर जावे लागायचे. यामुळे केवळ अतिरिक्त वाहतूक खर्चच नाही तर संपूर्ण दिवसाचे श्रम देखील होते. तथापि, कंपनी सदस्य झाल्यापासून, मी माझ्या घरी बसून फोन कॉल करून आणि वाटाघाटी करून वाजवी दरात बियाणे मिळवू शकत आहे. शिवाय, आमच्या कंपनीची प्रतिष्ठा जिल्हा पातळीवर पसरली आहे.”
महिलांना घरबसल्या उत्पन्नाचे साधन
बोरखेड या निसर्गसंपन्न गावात राहणारी सेजल बेन तिच्या समाजात 800 किलो भात बियाणे विकून घर चालविण्यासाठी उत्पन्न मिळवण्यात यशस्वी झाली आहे. 7 रुपये प्रति किलोच्या कमिशनमुळे सेजल बेन 5,600 रुपयांची बऱ्यापैकी बचत करू शकल्या. अशा अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत आणि ही संख्या वाढत आहे.
कंपनीच्या बोर्ड सदस्य आणि नडगखडी गावातील महिला नेत्या कल्पनाबेहन अमृतभाई गायकवाड सांगतात, “आम्ही बियाणे विक्री कमिशन आणि कंपनीने विकलेल्या किचन गार्डन किट्स पॅकिंगच्या श्रमातून प्रत्येक वस्तूसाठी दररोज 150 रुपये कमावत आहोत. परिणामी, आमची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे.”
गुजरात, मध्य प्रदेशात प्रशिक्षण
पाटीदार म्हणाले, “आम्ही या महिलांना गुजरात आणि मध्य प्रदेशमधील विविध शेतकरी उत्पादक संस्थांमध्ये प्रशासन, मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी पाठवले जेणेकरून त्या स्वतंत्रपणे त्यांचा व्यवसाय करू शकतील.” कंपनीची स्थापना जुलै 2019 मध्ये करण्यात आली. तथापि, कोविड लॉकडाऊनमुळे, या एफपीओला महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यात अडथळे आले. तथापि, कंपनीच्या स्थापनेपासून, कंपनीच्या महिला सदस्यांनी मागे वळून न पाहता सातत्याने प्रगती केली, असे पाटीदार म्हणाले.