आज आम्ही तुम्हाला अजित त्रिपाठी या अलाहाबाद येथील एका होतकरू, उत्साही आणि मेहनती तरुणाची कहाणी सांगणार आहोत. या MBA झालेल्या तरुणाने दुबईतील चांगला व्यवसाय सोडून आपल्या गावात डेअरी फार्म स्थापन केला. आज संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही त्याच्या श्री गंगाधाम गोशाळेच्या प्युअर देसी दुधाची चर्चा आहे. त्रिपाठी यांनी दुग्धव्यवसाय या कठीण समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातील आव्हान स्वीकारले आणि त्यात यशस्वीही होऊन दाखविले.
अलाहाबादच्या जसरा भागातील पंडार गावात राहणाऱ्या अजित त्रिपाठी यांनी वाराणसीच्या बीएचयूमधून एमबीए केले. त्यानंतर 2013 मध्ये ते काका प्रदीप त्रिपाठी यांच्या दुबईतील मोबाइल व्यवसायात सामील झाले. अजित यांनी मस्कतमध्ये सुमारे तीन वर्षे मोबाइलचा व्यवसाय सांभाळला. शेवटी, अचानक मोबाईल व्यवसायातून दुग्ध व्यवसायाकडे उडी घेतली. यावर त्रिपाठी म्हणतात की, 2016 मध्ये जेव्हा ते काकांशी त्यांच्या गावाची आणि घराची चर्चा करत होते, तेव्हा ही आयडीया मनात बसली. मग दुधाची चर्चा सुरू झाली आणि ती दुबईत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या अल्मराय ब्रँडच्या दुधाची.
दुबईसारख्या वाळवंटात अल्मराई बँडचे दूध भारताच्या तुलनेत शुद्ध मानले जाते. तेथे भारत, बांगलादेश, पाकिस्तान आदी देशांतून लाखो गायी आणून आधुनिक डेअरी फार्ममध्ये पाळल्या जातात. त्यानंतर त्यांचे दूध काढले जाते. अलाहाबादमध्ये असाच एक डेअरी फार्म उघडून आपण लोकांना शुद्ध दूध देऊ शकतो, असे अजित यांना वाटले. त्यांचे काका प्रदीप त्रिपाठी यांनाही ही कल्पना आवडली आणि मग त्यांच्या प्रेरणेने अजित दुबईतील व्यवसाय सोडून भारतात परतळे. त्यांनी गावात डेअरी स्थापन केली.
2016 मध्ये पंडारा गावात श्री गंगाधाम गोशाळेची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी दुबईहून अलाहाबादला आल्यानंतर अजित यानी राजस्थान, पंजाबमधील अनेक दुग्धशाळा आणि गोठवाला भेट दिली. त्यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये त्यांनी 50 जनावरांसह आपल्या गावच्या जमिनीवर श्री गंगाधाम गोशाळा सुरू केली.
अजित त्रिपाठी यांनी 24 बिघा क्षेत्रामध्ये गोठ्याची स्थापना केली आहे. ही गोशाळा उभारण्यासाठी त्यांनी खर्चात हात आखडता घेतला नाही. त्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही मोठा हातभार लावला. अजित यांचे काका, वडील आणि सर्वांनीच आर्थिक मदत केली. याशिवाय, त्यांनी यूपी सरकारच्या कामधेनू योजनेतून कर्जही घेतले. 24 बिघा क्षेत्रात पसरलेल्या या डेअरी फार्ममध्ये आधुनिक सुविधा आणि सुसज्ज मशीन्स आहे. गोशाळेत 8 बिघा परिसरात दोन 250X300 फूट शेड आहेत, जिथे गाई आणि म्हशी ठेवल्या जातात.
त्रिपाठी यांनी त्यांचा डेअरी फार्म फक्त 50 गायीपासून सुरु वेन्ला होता. अवघ्या तीन वर्षात गोठबातील जनावरांची संख्या 50 वरून 450 पर्यंत वाढली आहे. त्यामध्ये 340 गायी आणि 110 म्हशी आहेत. सुरुवातीला सुमारे दीड कोटी रुपये खर्च आला होता, तो आता 10 कोटीहून अधिक झाला आहे. तरीही लवकरच आणखी काही जनावरे वाढवण्याचा विचार केला जात आहे.
या आधुनिक डेअरी फार्ममध्ये प्रत्येक व्यवस्था आहे. त्रिपाठी यांनी फक्त गायींना राहण्यासाठी शेडच बांधले नाही, तर त्यामध्ये फॉगर सिस्टीम, पंखे इ. सुविधा आहेत. जनावरांसाठी गोठ्याच्या आत एक मोठा तलावही बांधण्यात आला असून, येथे गाई-म्हशी उन्हाळ्यात तासन् तास अंघोळ करतात. जनावरांना फिरण्यासाठी मोठं मैदानही आहे. पूर्वी गायींचे दूध काढण्याचे यंत्र वापरून दूध काढले जात होते, मात्र आता जनावरांची संख्या वाढल्याने अत्याधुनिक दूध पार्लर उभारण्यात आले आहे. या मिल्क पार्लरमध्ये 40 हून अधिक गायींचे दूध एकाच वेळी काढले जाऊ शकते आणि थेट बीएमसीमध्ये पाईपद्वारे संकलित केले जाते. गोठ्यात प्रत्येकी 1,000 लिटरच्या दोन बीएमसी आहेत.
त्रिपाठी यांना दुग्ध व्यवसायाच्या सुरुवातीला अडचणीही आल्या, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, पण त्यांनी हिंमत हारली नाही. जेव्हा त्यांनी गोठ्याचे उद्घाटन केले, तेव्हा त्यांनी पंजाबमधून गायी आणल्या होत्या, परंतु हवामानातील बदलामुळे एचएफ आणि साहिवाल गायींना जगवण्यात अडचणी आल्या. याशिवाय, संपूर्ण माहिती नसल्यामुळे ते गायींची योग्य काळजी घेऊ शकले नाहीत. सुरुवातीच्या महिन्यात अनेक गायींचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी पशुवैद्यकांशी संपर्क साधला आणि दोन अनुभवी पशुवैद्यकांना गायींच्या आश्रयस्थानात पूर्णवेळ नियुक्त केले. त्यातून जनावरांची योग्य निगा राखली गेली आणि दूध उत्पादनही वाढले.
पीएम किसानचा 17 वा हप्ता कधी येणार ? या व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण माहिती
अजित त्रिपाठी यांनी गोशाळेत 74 जणांना रोजगार दिला आहे. त्यांच्या डेअरी फार्ममध्ये दोन पशुवैद्यक आणि सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. अजित व्यतिरिक्त त्याचे दोन धाकटे भाऊ अंबुज आणि सिबू हे देखील दूध काढणे, खाद्य आणि मार्केटिंगचे काम सांभाळतात. अजित यांचे वडील आणि काकाही वेळोवेळी हातभार लावतात. ही गोशाळा इतकी प्रसिद्ध आहे की, अलाहाबादच्या कृषी विद्यापीठाच्या डेअरी विभागाचे विद्यार्थी इंटर्नशिपसाठी येत राहतात आणि येथे दुग्धव्यवसायाशी संबंधित प्रत्येक काम शिकतात.
श्री गंगाधाम गोशाळेत दररोज 1,000 लिटर दुधाचे उत्पादन होते, त्यातून लाखोंची कमाईही होते. संचालक अजित त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोशाळेला दररोज गायींचे सुमारे 750 लिटर आणि म्हशींचे 250 लिटर दूध मिळते. हे दूध बाजारात 50 ते 60 रुपये प्रतिलिटर दराने विकले जाते. मोठ्या संख्येने लोक स्वतः गोशाळेत दूध घेण्यासाठी येतात, तर दररोज शेकडो लिटर दूध आयटीबीदी, आयएएफ आणि कृषी विद्यापीठाला पुरवले जाते. श्री गंगा धाम गोशाळेचे दूध आजूबाजूच्या परिसरात शुद्धतेचे प्रतीक बनले आहे, याला अजित त्रिपाठी सर्वात मोठे यश मानतात, गोठ्यात दुधाशिवाय तूप, दही, चीज, ताक यांचेही उत्पादन घेतले जाते. गोमूत्रापासून फिनाइलही तयार होते. यातूनही चांगली कमाई होते. गोठ्यातच बायोगॅस प्रकल्प असून, त्याठिकाणी दुग्धव्यवसायासाठी लागणारे इंधन आणि वीजनिर्मिती केली जाते.
डेअरी फार्ममध्ये स्वच्छतेबाबत कोणतीही काळजी घेतली जात नसल्याची तक्रार अनेकदा येते; पण अजित त्रिपाठी यांच्या गोशाळेत स्वच्छता ही सर्वोपरी आहे. गोठ्यातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. इथे गायींचे दूध काढणे, ते गोळा करणे आणि नंतर ते लोकांपर्यंत पोचवणे यात मानवी हातांचा फारसा सहभाग नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जनावरांना त्यांच्याच शेतातून हिरवा चारा दिला जातो, त्यामुळे त्यांचे आरोग्यही चांगले राहते.
भविष्यात स्वतःच्या ब्रँडने दूध विकण्याची त्रिपाठी यांची योजना आहे. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर डेअरी फार्ममध्ये यश मिळवले आहे. जनावरांची देखभाल, कर्मचाऱ्यांचे पगार इत्यादींवर दर महिन्याला सुमारे 16 ते 17 लाख रुपये खर्च येतो आणि त्यानंतर दोन ते अडीच लाख रुपयांची बचत होते. पण अजित इथेच थांबणार नाही. भविष्यात स्वतःच्या ब्रेडचे दूध बाटल्यांमध्ये पुरवण्याची त्यांची योजना आहे. यासाठी बाजार सर्वेक्षण करण्यात आले असून लवकरच अलाहाबादमधील लोकांना गंगा दूध उपलब्ध करून दिले जाईल. एवढ्या लहान वयात अजित त्रिपाठी यांनी आपल्या जिद्द आणि धाडसाच्या बळावर दुग्ध व्यवसायासारख्या कठीण व्यवसायात यश संपादन केल्याचे आपण पाहिले आहे. दुग्धव्यवसाय क्षेत्रात काहीही करता येत नाही, असे वाटणाऱ्या तरुणांसाठी त्यांचे हे यश प्रेरणादायी आहे.