सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी देशासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी नाले, धरणे चांगली भरली आहेत. मोठ्या प्रमाणात राज्यातील धरणातील पाणी साठ्यात वाढ झालेली असून यावर्षीची पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान, राज्यात अद्याप थंडीची चाहूल लागलेली नाही. नोव्हेंबर महिन्यात देखील ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवत असून काही ठिकाणी ढगाळ वातावरणासहित तापमान वाढले आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे ? आणि पेरणी केव्हा करावी ? हे आपण जाणून घेणार आहोत.
जमिनीतील ओलावा अत्यंत महत्त्वाचा – शरद जाधव
गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेत वाढ होत आहे. या वाढत्या उन्हामुळे आणि वाऱ्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होत आहे. अशावेळी कोरवाहू शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जमिनीतील ओलावा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आहे त्या ओलाव्यावरती शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पेरणी करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीची पूर्वमाशागत करून मातीचा थर (Soil Dust) तयार केला तर जमिनीला भेगा पडत नाही आणि जमिनीतला ओलावा उडून जात नाही.
पेरणी करण्यापूर्वी अशी घ्या काळजी ?
शेतीच्या पूर्वमशागतीसाठी वखरणी / कुळवणी करून जमिनीला भेगा पडणार नाही आणि जमिनीचे बाष्पीभवन होणार नाही, याची शेतकऱ्यांनी खरबदारी घेणे आवशयक आहे. तसेच पेरणी करताना बियाणे योग्य खोलीवर पडणे आवश्यक आहे. यंदा पाऊस चांगला झाला आहे. ज्यावेळेस पाऊस चांगला होतो त्यावेळेस बुरशीचा प्रादुर्भाव जास्त होतो. अशावेळी शेतकऱ्यांनी बियाणे पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे. बीजप्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर करणे आवश्यक आहे.
ज्वारीवरील काणी रोग व्यवस्थापन
जर शेतकरी पेरणीसाठी घरगुती बियाणे वापरत असतील तर त्यावर काणी रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी शेतकऱ्याने बियाणे पेरणी पूर्वी गंधकाची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. तसेच स्फुरदच्या उपलब्धतेसाठी रब्बीतील सर्व पिकांना पीएसबीची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.
अक्झॉटोबॅक्टर – ज्वारी, बाजरी, गहू (एकदल पिके)
रायझोबियम – तूर, उडीद, सोयाबीन, मूग, हरभरा, भूईमुग (द्विदल पिके)
डॉ. शरद जाधव
विषय विशेषज्ञ (कृषिविद्या)
कृषी विज्ञान केंद्र.,
जळगाव.