पहिल्याच दिवशी 22 हजार शेतकऱ्यांच्या भेटी
जळगाव, ता. १५ (प्रतिनिधी)ः अॅग्रोवर्ल्डच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शिवतिर्थ मैदानावर काल (शुक्रवारी) दुपारी ४.०० वाजता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक व नाविन्यपूर्ण शेतीच्या माहितीसाठी अॅग्रोवर्ल्डच्या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. या गरजेवर आधारीत कृषी प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुप्पट उत्पादन वाढीसाठी नक्कीच मदत होईल. शेतकरी व ग्राहक यांचे संबंध दृढ होण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनीच नव्हे तर शहरी भागातील नागरिकांनी देखील या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जळगावच्या महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, आरोग्य विभाग सभापती दिलीप पाटील, शिक्षण विभाग सभापती पोपटतात्या भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी, प्लॅनटो कृषी तंत्रचे स्वप्नील चौधरी, साईराम इरिगेशनचे श्रीराम पाटील, क्वालिटी ठिबकचे रमेश पाटील, ग्रब अॅग्रोचे कैलास मगर, कुमार बायो सीड्सचे श्रीकांत निरफळे, इंबी जलसंचायचे अनिल राजपूत व अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती.
अॅग्रोवर्ल्डच्या या चार दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात शेती उपयोगी यंत्रे, तंत्रे, सिंचन प्रणाली, नामांकित कंपन्यांची ट्रॅक्टर व अवजारे, स्प्रे- पंप, फळबाग छाटणीपासून ते परसबागेतील मशागतीसाठी उपयुक्त शेती साहित्य, दूध काढणी यंत्र, करार शेतीची माहिती यासह इतर माहितीचे स्टॉल उपलब्ध आहे. या प्रदर्शनात २१० हून अधिक स्टॉल्स सहभागी आहेत. संपूर्ण प्रदर्शन हे डोम स्ट्रक्चर व फेब्रिकेटेड सिस्टीमने सज्ज आहेत. अॅग्रोवर्ल्ड राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. मुख्य प्रायोजक असून, प्लॅन्टो कृषीतंत्र, कुमार बायोसीड्स, श्री साईराम प्लास्टिक, क्वालिटी ड्रीप इरिगेशन, ग्रब अॅग्रो, गोदावरी फाउंडेशन व इंबी जलसंचय हे सहप्रायोजक आहेत.
प्रदर्शनस्थळी ट्रॅक्टरे, अवजारे व मशिनरी स्वतः हाताळून खात्री करण्यासाठी मोठी जागा राखीव ठेवली आहे. त्याचाही लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. याशिवाय पशुपालकांसाठी हिरव्या चाऱ्यासाठीचे व्यवस्थापन, मूरघास, हायड्रोपोनिक फॉडर, अॅझोलाची प्रात्यक्षिकासह माहिती देण्याची व्यवस्था आहे. दूध काढणी यंत्रांच्या नामांकित कंपन्यांचेही स्टॉल्स याठिकाणी आहेत. कृषी संशोधन शिक्षणसंस्था, बँका, बियाणे, खते, कीटकनाशके, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, ड्रीप, टिश्यूकल्चर क्षेत्रातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी आहेत. त्याचबरोबर ऑटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, नर्सरी, कृषी प्रकाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनांचेही स्टॉल्स प्रदर्शनात आहेत. नवतंत्रज्ञानाचा विचार करून पॉलीहाऊस, शेडनेट, मल्चिंग, विविध आकारातील शेततळे, गांडूळ शेती अशा बाबी प्रदर्शनस्थळी मांडण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना आज कृषी पुरस्कार
अॅग्रोवर्ल्डच्यावतीने प्रयोगशील शेतकऱ्यांचा उद्या (शनिवार)अॅग्रोवर्ल्ड कृषी सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता सुरु होणार असून कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा.पाशा पटेल यांच्या हस्ते खालील १७ पुरस्कर्ताचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यावेळी आर.सी.बाफना, आ. चिमण आबा, नाबार्डचे श्रीकांत झांबरे उपस्थित असणार आहेत.
शेतकरी संघटनेतील कार्यासाठी कडू अप्पा पाटील, कृषी शिक्षण क्षेत्रासाठी डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, महेश महाजन कृषी विज्ञान केंद्र ,पाल, प्रमोद बर्हाटे कृषी पर्यंटन केंद्रसाठी, जलसंधारणातील कार्यासाठी गुणवंत सोनवणे, निलेश राणे तसेच प्रयोगशील शेतकरी म्हणून मधुकर नारायण पाटील, समाधान रतन पाटील, संघरत्न शालीग्राम गायकवाड, लीलाधर पाटील , समाधान भिकन पाटील, मयुर अरुण वाघ, बीड जिल्ह्यतील शेतकरी जगन्नाथ रामभाऊ दिवाण, नांदेड जिल्ह्यातील कृषी उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी, कृषी विस्तार केलेल्या कार्याबद्दल आर.ए.पाटील, दिनेश पाटील, वरिष्ठ संशोधक डॉ.मधुकर बेडिस, आदींचा गौरव या वेळी होणार आहे.