काळानुरूप विभक्त कुटुंब पद्धती प्रचलित झाल्यामुळे जमिनीचे सुद्धा त्याचप्रमाणे विभाजन झाले. शासकीय सेवा योजनांचा लाभ घेण्यासाठी जमिनीचे भाग करणे, शहरीकरण, औद्योगिक विकास, विकासाचे अनेक प्रकल्प यासारख्या अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांचे किंवा त्याच्या पुढील पिढीचे दरडोई कृषी क्षेत्रफळ कमी होत चालले आहे. याचा विपरीत परिणाम होवून शेतकरी अत्यल्प किंवा अल्पभूधारक होत आहे. त्यातच बदलते नैसर्गिक चक्र, अवेळी पडणारा पाऊस, मनुष्यबळ टंचाई, महागाई, बाजारपेठ उपलब्धता, शेतीमाल साठवणी समस्या, शेती बद्दलची नकारात्मक, उदासीन मानसिकता यासारख्या अनेक कारणांमुळे शेतीकडे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून न पाहता उपजीविकेचे साधन मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील जनता शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्याचे सोडून आजूबाजूच्या विकसित होणाऱ्या शहरांकडे धाव घेत आहे. पण, भविष्यात निर्माण होणाऱ्या या अडचणींचे वेळेच्या आधीच संधीमध्ये रूपांतर करून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मु.पो. मोगरज येथील प्रगतिशील शेतकरी दाम्पत्यांनी शेती हेच आपल्या उदरनिर्वाहाचे साधन मानले आहे. आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती करून समाजामध्ये मानसन्मान मिळवून आपल्या मुलांना आवडत्या क्षेत्रात शिक्षण देऊन, ‘आत्मनिर्भरता’ याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आनंदी व समाधानी आयुष्य जगत आहेत. त्यांच्याबद्दल आपण या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत.
वडिलोपार्जित शेतीतून सुरुवात
अगदी शालेय जीवनापासून परशुराम दादांनी त्यांच्या बाबांबरोबर शेतीमध्ये नांगर धरण्यासह इतर शेतीची कामे देखील शिकायला सुरुवात केली. जेमतेम इयत्ता नववी शिकलेले परशुराम दादा हे वयाच्या 15 व्या वर्षांपासून पूर्णपणे शेतीची सर्व कामे करून त्यांच्या बाबांना शेती कामात हातभार लावू लागले .
दोघं दाम्पत्यांनी केली सुरुवात
परशुराम दादांचे लग्न झाल्यानंतर शेती कामात त्यांची पत्नी देखील सहभाग घेवू लागली. पावसाळा ऋतू वगळता इतर काळात परशुराम दादांनी आपला संसार शेतातच थाटला. आई-बाबांबरोबर अगदी सुरुवातीपासून शेती करत असताना मी कधीच स्वतःला शेतीसाठी वाहून घेतले ते मलाच कळले नाही असे परशुरामदादा प्रांजळपणे सांगतात. पण, पारंपारिक पद्धतीने शेती करत असल्यामुळे शेतामध्ये इतके परिश्रम घ्यावे लागायचे ते मलाच कळायचे नाही आणि एवढे करूनही त्यामधून मिळकत ही काही मिळायची नाही. त्यामुळे एवढी प्रचंड मेहनत करून सुद्धा आर्थिक परिस्थिती बदलण्याचे कोणतेही चिन्ह समोर दिसत नसायचे असे परशुराम दादा अगदी स्पष्टपणे सांगतात.
समवयस्कर सहकारी / मित्र प्रगती करू लागले
आजूबाजूच्या ठिकाणी रोजंदारी करून परशुराम दादांच्या वयाचे काही मित्र पैसा कमावून आपली आर्थिक परिस्थितीत सुधारणा करू लागले. पण, परशुराम दादा त्यांच्यापेक्षा जास्त वर्षाचे बाराही महिने घरगुती तसेच शेतीच्या कामात मेहनत करून काहीच आर्थिक प्रगती करत नव्हते. हे परशुराम दादांना ही आता कळायला लागलं होते.
शेतात विहीर खोदून बसवले इंजिन
सन २००२ साली परशुराम दादांनी ४२ टक्के अनुदानित तत्वावर एकूण ७० हजार खर्च करून विहीर खोदून इंजिन बसवून घेतले. विहिरीसाठी लागणारा उर्वरित खर्च हा परशुराम दादांनी त्यांच्याकडे असणाऱ्या प्रमाणिकपणाच्या भांडवलावर उभा करून पुढील तीन वर्षात शेती मधूनच मिळणाऱ्या तटपुंजा पैशातून त्यांची परतफेड केली. भाताचे पीक घेतल्यानंतर भाजीपाला लागवड केल्यामुळे त्या ऋतूमध्ये भाजीपाल्यातुन चार ते पाच हजार रुपये कमविणे सुरू झाले. त्यामधील अर्धे पैसे आई-वडिलांना देऊन अर्धे पैसे ते स्वतः ठेवू लागले.
कृषी अभ्यास दौऱ्यांना जाण्यास सुरवात
अनेक वर्षांपासून शेतीतील परशुराम दादांचे कष्ट पाहून त्यांच्या भागातील कृषी सहाय्यक परशुराम दादांच्या शेताला आवर्जून भेट द्यायला यायचे. त्यावेळी परशुराम दादांना खूप आनंद व्हायचा. पुढे त्यांनीच कृषी विद्यापीठाच्या अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी संधी दिली असे दादा आवर्जून सांगतात. पुणे, बारामती, नागपूर इत्यादी अनेक ठिकाणी शेती अभ्यास दौरे केल्यामुळे परशुराम दादांना शेतीमधील नाविन्यपूर्ण पद्धती समजल्या.
शेतात केले अनेक कृषी प्रयोग
परशुराम दादांनी कृषी अभ्यास दौरे, शासकीय अधिकारी, विद्यापीठ यांच्या सल्ला/मार्गदर्शनाने आपल्या शेतीत अनेक प्रयोग केले. त्यामधून उत्पादने वाढले पण खर्चही तितकाच येत होता आणि मेहनतही तितकीच करावी लागत होती. जेवढ्या शेती अभ्यास दौऱ्यामधून नवनवीन शेती पद्धती शिकल्या तेवढ्या जशाच्या तशा शेती पद्धती आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष अवलंबल्या. त्यामुळे शेतीमधील अभ्यास वाढला, सखोल माहिती मिळाली, बारकावे लक्षात यायला लागले. पण, यामधूम कोणतीही पद्धत हृदयाला पटली नाही असे परशुराम दादा स्पष्टपणे सांगतात.
स्वयंसेवी संस्थांच्या मार्गदर्शनाने शेती प्रयोग
शेतकऱ्यांच्या विकासासाठी ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन परशुराम दादांनी आपल्या शेतात काही शेती प्रयोग केले. ज्या ज्या संस्थेद्वारे जे जे सांगण्यात यायचे त्याचा स्वीकार करून ते अगदी जशेच्या तसे आपल्या शेतामध्ये मेहनत करून प्रामाणिकपणे राबत गेले. ते बरोबर आहे की चुकीचे आहे याचा कधीच विचार केला नाही. त्यांनी सांगितले म्हणजे ते बरोबरच असणार अशा भावनेने प्रत्येक क्षण शेतीत काम करत गेलो असे देखील परशुराम दादा आवर्जून सांगतात.
कृषिभूषण चंद्रशेखर भडसावळे यांचा संपर्क संपर्कात असणाऱ्या संस्थांपैकी एका संस्थेच्या व्यक्तीने सन २०१२ साली परशुराम दादांना कृषिभूषण चंद्रशेखर भडसावळे यांचा संपर्क करून दिला. येथील शेतात मला भुईमुगाच्या शेंगाची लागवड केलेली दिसली. पण, त्या भुईमुगामध्ये मला भाताची चूडही दिसले. त्यासंबंधी येथील प्रशिक्षक अनिल निवळकर हे याबद्दल आम्हाला माहिती देत असताना मी त्यावेळी तेथील एक भुईमुगाचे रोपटे काढून पहिले. त्याला ५२ शेंगा आलेल्या, माझ्या सहकाऱ्याने सुद्धा एक रोपटे काढून पाहिले तर त्याला तर ५५ शेंगा आल्या होत्या. हे पाहून माझ्या डोळ्यांवर मला विश्वासच बसत नव्हता. मी आश्चर्यचकित झालो होतो की, नांगरणी न करता हे कसे शक्य होऊ शकते? आतापर्यंत आपल्या शेतात अनेक पद्धती वापरून आपण शेती केली तर ही नांगरणी न करता केली जाणारी शेती आपण एकदा आपल्या शेतात करून पाहूया असा निश्चय परशुराम दादांनी तेव्हाच केला.
शेतात सगुणा रीजनरेटिव्ह टेक्निक (SRT) पद्धतीचा अवलंब
कोणालाही न सांगता दादांनी आपल्या शेतात सगुणा रीजनरेटिव्ह टेक्निक म्हणजेच एसआरटी पद्धतीने भात लागवड केली. कोणत्याही प्रकारची तांत्रिक माहिती नसल्यामुळे बेडचे मोजमाप करण्यासाठी प्रशिक्षणाच्या ठिकाणावरूनच गाठी मारून आणलेल्या दोरीचा वापर करून शेत नांगरून, ढेकळ फोडून बेड बनविले. तिथे ऐकलेल्या ग्लायफोसेट व गोल या तणनाशकांच्या नावा व्यतिरिक्त तणनाशक काय असते? ते कधी फवारायचे असते याचीही कोणतीही माहिती नसल्यामुळे चुकीच्या वेळी तणनाशकाची फवारणी करून शेतात आलेल्या गवताची बिननी मात्र दोघा दाम्पत्यांनी केली. एवढ्या अफाट प्रमाणावर शेतात मेहनत करण्याची सवय झालेल्या दादांना व त्यांच्या पत्नीला शेतात बेननी करणे काही कठीण झाले नाही.
एसआरटी पद्धतीने शेती डोलु लागली
सर्व शेतकऱ्यांच्या अगोदर माझी भात शेती लागवड झाली होती. इतर शेतकरी पेरणी करत होते पण त्यावेळी मात्र माझी लागवड सुद्धा झाली होती. त्यामुळे मला व पत्नीला खूप रिकामा वेळही मिळाला होता. ‘आता माझे शेत चांगले डोलू लागले होते’ याचा मला खूप आनंद झाला, असे उत्स्फूर्तपणे परशुराम दादा सांगतात. पहिल्यांदाच आपल्या शेतीतून वेळ मिळाल्यामुळे माझ्या पत्नीने इतरांच्या शेतात जाऊन काम केल्यामुळे काहीशी रक्कम पण कमवून आणली होती याने माझा आनंद द्विगुणीत झाला, याचा परशुराम दादा आवर्जून उल्लेख करतात.
वडिलांच्या विरोधाचा सामना करावा लागला
एसआरटी पद्धतीने भात लागवड करताना परशुराम दादांना शेतामधील अनुभवी व हुशार असणाऱ्या त्यांच्या वडिलांनी सुरवातीला विरोध केला. परशुराम हे तू चुकीचे करत आहेस! यामधून भाताची रोपे उगवून तर येतील पण, यामधून तुला भात मिळेल याची मला काही शाश्वती वाटत नाही. तर तू याच्या भानगडीत काय पडू नकोस! बाबा मी आतापर्यंत एवढ्या अनेक पद्धतीने शेती केली पण मला कधी सुख मिळाले नाही. पण या पद्धतीने मी शेती मी करेन ! अश्या शब्दात परशुराम दादांनी बाबांची समजूत काढत या पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. पण हे केल्यामुळे आपल्या मुलाला पुढच्या वर्षी खायला भात मिळणार नाही. तर तो काय खाईल? या काळजीने परशुराम दादांच्या बाबानी त्यांच्यासाठी वर्षभरासाठी पुरेल एवढा धान्यकोश तयार करून ठेवला होता.
एसआरटी पद्धतीने भात लागवड केल्यावर सुरुवातीची दोन ते तीन वर्षे नातेवाईक, मित्रमंडळी, आजूबाजूचे शेतकरी, इतर लोकांनी हा कायवेड्यासारखे करत असतो! असे कधी झाले आहे का? आणि काही होणार आहे का? त्यामुळे याच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही असे म्हणून निघून जायचे. असे परशुराम दादा आवर्जून सांगतात. अश्या भाताला कधी लोभी येत नाहीत. अशा प्रकारच्या भातामधून तुझ्या हाताला काहीच लागणार नाही, तणनाशकांचा वापर करता करता तुला कॅन्सर होईल अश्या असंख्य नकारात्मक विचारसरणीच्या माणसांना परशुराम दादांना तोंड द्यावे लागले.
पहिल्याच वर्षी मिळाले भरघोस उत्पादन पण पहिल्याच वर्षी १८ ते २२ पोती मिळणाऱ्या भात शेतीमधून चक्क ३९ पोती भात मिळाले. जास्त अंग मेहनत न करता, ना जास्तीचा खर्च करता, नांगरणी, पेरणी, चिखलणी नाही, माणसांची सुद्धा तितकीशी आवश्यकता नाहीं आणि पीक पण दर्जेदार व भरघोस, अप्रतिम डबलचे उत्पादन परशुराम दादांना मिळाले त्याचा त्यांना खूप आनंद झाला.
भात कापणीनंतर वाल लागवड
भात पिकलं तर मग वाल लावायला हरकत नाही, आपल्याला नांगरणी करताना होणारा वेळ व त्रास ही वाचावा या हेतूने आत्मविश्वासावर परशुराम दादांनी त्याच ठिकाणी नांगरणी न करता वाल लागवड करून सुमारे ७ क्विंटल वाल काढून त्या सिजनमध्ये अंदाजे ७० हजार रुपयांची त्यांनी कमाई केली.
सगुणा बागेशी वाढू लागला संपर्क
परशुराम दादांनी पहिल्याच वर्षी केलेल्या एसआरटी पद्धतीने भात लागवडीचे यश पाहण्यासाठी प्रत्यक्ष एसआरटीचे जनक कृषिभूषण चंद्रशेखर भडसावळे स्वतः परशुराम दादांच्या शेतात भेट देण्यासाठी आले व त्यांना अत्यंत आनंद झाला. काही महिन्यातच त्यांनी परशुराम दादांना आपल्या संपर्कात ठेवण्यासाठी मोबाईल भेट म्हणून दिला. यानंतर भडसावळे परशुराम दादांना सुद्धा आवर्जून सगुणा बागेत बोलवु लागले. अशा पद्धतीने एसआरटीचा येणाऱ्या काळात अधिक प्रभावीपणे विकास करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्याऱ्यांना स्वतःचे अनुभव सांगण्यासाठी परशुराम दादांचा सगुणा बागेमध्ये संपर्क वाढला.
शेतकऱ्यांना घेऊन एसआरटीची लागवड.
आपल्या गावातील पाच शेतकऱ्यांना घेवून त्यांना एसआरटी भात लागवड संबंधीचे सगुणा बागेतून मिळत असलेल्या मार्गदर्शनातून आपण केलेल्या एसआरटी भात लागवड पद्धतीतून काही गोष्ठी प्रत्यक्ष शिकून एसआरटी ही नवीन भात लागवड पद्धती शेतकऱ्यांच्या मनात रुजविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
एसआरटी टीममध्ये सहभाग
एसआरटीची माहिती घेण्यासाठी अनेक ठिकाणाहून शेतकरी सगुणा बागेत येवू लागले होते. आपण गेल्या दोन वर्षांपासून कशा प्रकारे एसआरटी पद्धतीने भात लागवड करत आहोत. त्यातून आपल्याला काय फायदे होत आहेत. हे आपण आपल्या शेतातून घेतलेलं ज्ञान परशुराम दादा आलेल्या या शेतकऱ्यांना अगदी प्रामाणिकपणे सांगू लागले आणि ते त्या शेतकऱ्यांनाही पटू लागेल. हे सर्व करत असताना सततचे प्रयोग, संशोधन, अभ्यास यामधून वेळोवेळी एसआरटीमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करून एसआरटी आता महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरही असंख्य शेतकऱ्यांच्या पसंतीस पडत असून परशुराम दादा आता पूर्णवेळ एसआरटीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर जाऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृतिशील मार्गदर्शन करत आहेत. त्याचा मोबदला म्हणून त्यांना समाधानकारक मानधनही मिळते. सकारात्मक दृष्टिकोन, सतत प्रयोगशील राहण्याची वृत्ती, समोरच्याच भलं व्हावं ही आंतरिक तळमळ यामुळे परशुराम दादांचा हा प्रवास यशस्वी होत आहे असे म्हणणे वावगे ठरू शकणार नाही.
पत्नी सांभाळते शेतीचा डोलारा
गेल्या अनेक वर्षांपासून आठवड्यातील सुट्टीचे चार ते पाच दिवस वगळता परशुराम दादा एसआरटीच्या कार्यात व्यस्त असतात. पण, आता मात्र आम्ही दोघा दाम्पत्यांनी उभा केलेला शेतीचा डोलारा माझी पत्नी समर्थपणे सांभाळते असे परशुराम दादा अभिमानाने सांगतात. शेतीची छोटी-मोठी सर्वच कामे त्या एकट्याने करतात. कारण आता त्यांना त्यांची शेतीत तितक्या श्रमाची व मनुष्यबळाची आवश्यकता लागत नाही.
दोन्ही मुलींना केले सुशिक्षित
परशुराम दादांची एक मुलगी मेडिकल क्षेत्रामध्ये परिचारिका म्हणून नामवंत हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहे. व दुसरी मुलगी इयत्ता बारावी विज्ञान या शाखेमध्ये शिक्षण घेत आहे.
एखादी व्यक्ती सुद्धा शेती करू शकते.
कमी कष्टाची, कमी मनुष्यबळ व कमी खर्चाची एसआरटी पीक लागवड पद्धतीचा अवलंब करून भात कापणी झाल्यानंतर त्याच ठिकाणी अन्य पिके घेवून झाल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अन्य पीक घेणे म्हणजेच वर्षातून आलटून पालटून तीन प्रकारची पिके घेतली जातात. त्यामधील दोन पिके ही विशेषता बाजारामध्ये शेती उत्पन्नाची विक्री करून कुटुंबासाठी आर्थिक कमाई करण्यासाठी असते व तिसरे पीक हे स्वतःच्या घरच्या आवश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी असते. भात झोडून झाल्यानंतर भाताच्या उरलेल्या पेंढ्याच्या विक्रीतून सुद्धा काही आर्थिक उत्पन्न मिळते.
भात शेती खर्च व उत्पन्न
एक एकर क्षेत्रात भात लागवड ते मळणी करणे यामध्ये बियाणे, टोक्कणी, तणनाशक, कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन, मनुष्यबळाची अंदाजे रुपये १५,३०० एवढा खर्च येतो. यामधून सुमारे २,२७५ क्विंटल एवढे भात मिळते. त्याची भात विक्री केंद्रावर २२ रुपये प्रति किलो दराने विक्री केल्यावर रुपये ५०,०५० एवढी रक्कम मिळते. त्यातून खर्च वगळता रुपये ३४,७५० एवढा नफा मिळतो.
भाजीपाल्याची प्रत्यक्ष विक्री
शेतात तया होणार भाजीपाला हा पशुराम दादांच्या पत्नी घराच्या जवळच असणाऱ्या वर्दळीच्या ठिकाणी जिथे शहरातील माणसांची रेलचेल असते अशा ठिकाणी प्रत्यक्ष विक्री करतात. जास्त प्रमाणामध्ये भाजीपाला असल्यास तो नेरळ किंवा कर्जत याठिकाणी विक्रीसाठी जातो. त्याची जबाबदारी सुद्धा परशूराम दादांच्या पत्नी समर्थपणे सांभाळतात.
शिल्लक राहिलेल्या भाजीपाल्यावर प्रक्रिया करून विक्री
दोन्ही ठिकाणच्या बाजारपेठेमध्ये न विकल्या गेलेल्या भाजीपाल्यावर सोलर ड्रायरच्या माध्यमातून प्रक्रिया करून त्याचे रंग, रूप, चव न बदलता त्याची मार्केटमध्ये पुन्हा विक्री केली जाते.
वर्षाकाठी सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न
दोघं दाम्पत्यांना वर्षाकाठी सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मीठ, साखर, काडेपेटी, साबण, कपडे, चप्पल अशा काही ठराविक वस्तू सोडल्या तर इतर आवश्यक वस्तू शेतातूनच मिळतात. यामध्ये काही वेलवर्गीय, काही पालेभाज्या, कडधान्य, तृणधान्य, तेल आदींचा समावेश होतो. यावरून ‘आत्मनिर्भरता’ म्हणजे काय हे समजण्यासाठी याहून अधिक काही सांगण्याची गरज नाही. स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या भुईमुगापासून घाण्यावर काढलेल्या तेलानंतर उरलेल्या चोथ्यापासून पाळीव जनावरांना खाद्य म्हणून वापरली जाणारी पेंड दहा ते बारा रुपये प्रति किलो दराने विकली जाते.
शेती करायला शिकले पाहिजे
मनापासून शेती केली तर नक्कीच यश मिळते. कमीत कमी वेळ, खर्च, श्रम यामधून शेती करायला शिकले पाहिजे. आपण केलेले श्रम कधीही वाया जावू देवू नका. भेटणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तींकडून काहीतरी शिकायला हवे, असा संदेश परशुराम दादांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. परशुराम आगिवले मु.पो. मोगरज, ता. कर्जत, जि. रायगड
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
शेती, शेतकरी केंद्रित तेलंगणा ; भारतीय ॲग्रीटेकची यशोगाथा
IMD चा ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट