हैद्राबाद : तेलंगणा राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणारी महत्वाकांक्षी योजना व शेतकऱ्यांची आर्थिक लाईफ लाईन बनलेली ‘रयतू बंधू’ ही योजना शेतक-यांसाठी कल्याणकारी ठरली आहे, असे प्रतिपादन तेलंगणाचे कृषिमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी केले.
‘रयतू बंधू’ ही योजना लागू करण्यास आज १० मे रोजी पाच वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने आयोजित एका शेतकरी संमेलनात एस. निरंजन रेड्डी यांनी केक कापून या योजनेचे महत्व सांगितले. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव १० मे २०१८ रोजी यांनी करीमनगर जिल्हातील जाहीर सभेत या योजनेची सुरवात केली होती, असे त्यांनी सांगितले.
शेतक-यांना खरीप आणि रब्बी हंगाम मिळून वर्षभरात एकरी १० हजार रुपये अनुदान या योजनेतून दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. गत पाच वर्षात सरकारने या योजनेसाठी ६५ हजार कोटी रुपये दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘रयतू बंधू’ योजना काय आहे..?
तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात पूर्वी प्रति एकरी पाच हजार व रब्बी हंगामापूर्वी प्रति एकरी पाच हजार असे वर्षातून एकरी दहा हजार रुपये शेती कसण्यासाठी दिले जातात. विशेष म्हणजे यासाठी किती एकर शेती क्षेत्र असावे याचे किंवा कोरडवाहू ती बागातदार असे कोणतेही बंधन नाही. या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर ऐन हंगामापूर्वी थेट पैसे जमा होतात. यामुळे शेतीची कामे, बियाणे, औषध फवारणीसाठी भांडवल उपलब्ध झाल्याने अनेक शेतकरी सावकारी जाचातून मुक्त झाले आहेत. सध्या ‘रयतू बंधू’ या योजनेची देशपातळीवर चर्चा सुरू असून ही योजना समजून घेण्यासाठी मागच्याच आठवड्यात केंद्र सरकारची एक समिती देखील तेलंगणा येथे भेटीसाठी येऊन गेली.
शेतीसाठी आर्थिक भांडवल मिळाले – राव
माझी दहा एकर शेती आहे. पीक उत्पादनासाठी पैशाची मोठी आवश्यकता भासते. यापूर्वी शेती उत्पादनासाठी पैशांची अडचण निर्माण व्हायची, मात्र तेलंगणा सरकारच्या ‘रयतू बंधू’ योजनेतून शेतीसाठी आर्थिक साह्य वेळेवर मिळते आहे. याचा फायदा आम्हाला शेती करताना होत आहे.
– सुरणार विलास राव, शेतकरी, बाभूळगाव, ता. कांगटी, जि. संगारेड्डी