बीड, उस्मानाबाद, सोलापूर, नगरसाठी आॅरेंज अलर्ट
पुणे – नैर्ऋत्य
मान्सून देशातून परतल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले
असले, तरी
सध्या महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जुलै-ऑगस्ट या पावसाच्या महिन्यांसारखा सर्वदूर
पाऊस सुरु आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी
दाबाचा पट्टा यामुळे मान्सूनोत्तर पाऊस सक्रिय झाला असून मराठवाड्यासह मध्य
महाराष्ट्रात मंगळवारी दमदार पावसाची नोंद झाली. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा
आणि बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र यांची तीव्रता टिकून असल्याने
राज्यात आगामी तीन ते चार दिवस पाऊस सक्रिय राहणार असल्याचे संकेत आयएमडीने दिले
आहेत. त्यामुळे पश्चिम-मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा
आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्रीनंतर पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर
परिसरात आणि कोकणात सकाळी आठ वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. मंगळवारी दुपारी चारपर्यंत
उघडीप होती. मात्र, साडेचारच्या
सुमारास अंधारून आले आणि पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्री
उशिरापर्यंत रिमझिम स्वरूपात पडत होता.
विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस झाला.
मराठवाड्यातील सात मंडळांत अतिवृष्टी झाली. या पावसामुळे दुष्काळग्रस्त
मराठवाड्याला दिलासा मिळाला असला तरी खरिपाच्या काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान
झाले आहे. मध्य महाराष्ट्रात भोर आणि पारनेर येथे अतिवृष्टीची नोंद झाली. पुणे, नगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा
पाऊस झाला.
३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा मुक्काम : कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
बीड, उस्मानाबाद, सोलापूर, नगरसाठी आॅरेंज अलर्ट : कुलाबा वेधशाळेने बुधवारसाठी (२३ ऑक्टो.) बीड, उस्मानाबाद, सोलापूर, नगर, पुणे, साताऱ्यासह कोकणातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट अर्थात अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.