एकीकडे वाढत्या उष्णतेने अंगाची काहीली होत असताना, राज्यातील काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) तसा अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, या आठवड्याच्या उत्तरार्धात, राज्यातील काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याचेही अनुमान आहे. आज पाऊस कुठे बरसणार, अवकाळीचा फटका कोणत्या जिल्ह्यांमध्ये बसणार आणि उष्णतेची लाट कुठे राहील, ते आपण जाणून घेऊया …
ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस 5 एप्रिल (शुक्रवारी) रोजी उपलब्ध
आयएमडी सूत्रांनी सांगितले की, सध्याची हवामान परिस्थिती हा वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम आहे. याशिवाय, काही प्रदेशांच्या वर विकसित झालेल्या कुंडाचाही हा परिणाम आहे. शनिवारी, रविवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वारे आणि गडगडाटासह पावसाची नोंद झाली. हा पाऊस अल्पकालीन असून तो राज्यात फक्त आज-उद्यापर्यंत सुरू राहू शकतो, असे IMD, मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.
5 एप्रिलनंतर तापमानात होणार अचानक मोठी वाढ
सध्या मुंबईत दररोज सरासरी कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान नोंदवले जात आहे. नायर म्हणाल्या की, 5 एप्रिलनंतर तापमानात अचानक वाढ होऊन अस्वस्थता निर्माण करणारे हवामान राहू शकते. 5 ते 7 एप्रिल दरम्यान उच्च तापमानाचा अंदाज वर्तवत असलो तरी, वर्तमान निरीक्षणानुसार मुंबईत कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर जाणार नाही. ते 32 ते 34 अंशांच्या दरम्यान असेल, असेही नायर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, येत्या आठवड्याच्या उत्तरार्धात, चंद्रपूरसह राज्यातील काही भागात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
“या” जिल्ह्यात पडणार आज पावसाची शक्यता
हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरसह अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य महाराष्ट्रासाठी आयएमडीने यलो अलर्ट जारी केला आहे.
कर्नाटक, हरियाणातही 4 एप्रिलपर्यंत अतिवृष्टी
महाराष्ट्रातील पाऊस फक्त आज-उद्यापुरताच राहणार असळांतरी हवामान खात्याने 4 एप्रिलपर्यंत पंजाब, हरियाणा, चंदीगडसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये वादळासह पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. देशाच्या काही भागात अतिवृष्टी आणि काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आयएमडीने जारी केला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि दक्षिणेतील काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीत काल 35.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा तीन अंशांनी जास्त होते.
IMDचा हीटवेव्ह अंदाज
IMD ने पुढील 5 दिवसांसाठी उष्णतेची लाट, तापलेली रात्र तसेच उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा जारी केला आहे. 2 ते 4 एप्रिल दरम्यान मध्य प्रदेश , विदर्भ, कर्नाटकात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 31 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान, मराठवाड्यात 1 आणि 2 एप्रिल दरम्यान रात्री उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. 1-4 एप्रिल दरम्यान रायलसीमा आणि 1 आणि 2 एप्रिल रोजी तेलंगणामध्ये अशीच परिस्थिती असेल. महाराष्ट्रात 3 एप्रिलपासून तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज आहे.