राज्यात एक एप्रिलपासून नवे वीज दर लागू करण्यात आले आहेत. यातून सर्वसामान्य ग्राहक, उद्योजक यांच्याबरोबरच शेतकऱ्यांच्या खिशालाही मोठा आर्थिक भार बसणार आहे. शेतकऱ्यांना 5 हॉर्सपॉवरपर्यंत पंपासाठी आता 563 रुपये स्थिर आकार द्यावा लागेल. पूर्वी हे बिल 466 रुपये होतं.
राज्य सरकारकडून 10 टक्के दरवाढ सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात ग्राहकांवर सरासरी 15 ते 40 टक्के अधिक भार पडेल, असा वीज तज्ञ प्रताप होगाडे यांचा दावा आहे. महावितरणनं स्थिर आकार आणि इंधन अधिभार दरात ही वाढ केली आहे. घरगुती सिंगल फेजसाठी पूर्वी 116 रुपये लागायचे. आता 1 128 रुपये लागतील. थ्री फेजसाठी पूर्वीच्या 385 ऐवजी 425 रुपये, वाणिज्यिक ग्राहकांना 470 ऐवजी 517 रुपये लागतील. सरकारी कार्यालयं, सार्वजनिक पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईटस् आणि लघु उद्योजकांच्या वीज बिलातही वाढ करण्यात आलीय.
नवीन आर्थिक वर्षात आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी महावितरण कंपनीनं वीज ग्राहकांवरच हा आर्थिक भार टाकण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप प्रताप होगाडे यांनी केला आहे. यामुळं घरगुती वीजेचा दर 100 युनिटपर्यंत 24 टक्के तर 500 युनिटच्या वर 34 टक्के वाढणार आहे. व्यापारी वापरात 15 ते 20 टक्के वाढ होईल. शेतीसाठी वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. शेतकऱ्यांना यापुढे 38 ते 48 टक्के वाढीव दराने बिलं द्यावी लागतील, असं होगाडे यांनी सांगितलं.