Pre Monsoon Rain… प्रत्यक्ष मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वी राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन-चार दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो. राज्यात गेल्या आठवडाभरात बऱ्याच ठिकाणी मान्सूनपूर्व वाळवाच्या पावसाने हजरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यातून काही अंशी दिलासा मिळत आहे. मात्र, त्यानंतर पुढील 4-5 दिवस तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी सोमवारी अन् मंगळवारी मान्सूनपूर्व पाऊस झाला. आयएमडी, पुणेचे प्रमुख केएस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या वाळवाच्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या 2-4 दिवसात तापमानाचा पारा 2 ते 3 अंशांनी खालावलेला आहे. काही जिल्ह्यात मात्र अजूनही तापमान चाळीशीपारच आहे. सांगली, सातारा, पुणे व नाशिक या नेहमी थंड असलेल्या शहरातही तापमान वाढले असून कमालीचा उकाडा जाणवत आहे. दुसरीकडे, कोकण पट्ट्यात हवेतील आर्द्रता वाढली आहे.
गेल्या 24 तासात, राज्यातील सर्वाधिक तापमान परभणीत 42.5 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. जालना 42.3°C, सोलापूर 42.2, जेऊर 42, बीड 41.9, नांदेड 41.2, सांगली 40.2, उद्गीर 39.8, पुणे 39.2, सातारा 38.6, नाशिक 38.4, बारामती 38.3 आणि कोल्हापूर 38°C अशी तापमानाची नोंद झाली. पुण्यात तर गेल्या 24 तासात चिंचवड आणि डुडुळगाव परिसरात 50 मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली. पुणे व परिसरात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस झाला.
वाढलेल्या आर्द्रतेमुळे कोकणात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गात तर मंगळवारी 30 मे 2023) अवकाळी पावसाचा फटका बसला. जोरदार वादळी वाराही होता. मुसळधार पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मान्सून महाराष्ट्रात पोहोचायला अद्याप किमान आठवडाभर लागेल, असा अंदाज आहे. मात्र, कोकण, पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व सरी बरसत आहेत. वाशिम, परभणी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार अवकाळी पाऊस बरसला. काही ठिकाणी उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला. परभणीत मात्र राज्यातील सर्वाधिक तापमान नोंद होण्याइतपत उष्मा वाढला.
काही भागातील शेतकऱ्यांना हा मान्सूनपूर्व पाऊस फायद्याच्या ठरत आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीला वेग येईल. काही ठिकाणी मात्र या पावसाने बागायतदारांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. या अवकाळी पावसाने कोकणातील आंबा पिकाला शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यातही मुसळधार पावसाने शेतमालाचे बरेच नुकसान केले.
पुण्याला यलो, नाशिकला ऑरेंज अलर्ट
जालना आणि बीड वगळता, पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी येत्या 24 तासात हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वादळ, विजांचा कडकडाट यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ-मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नाशिक, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, वाशीम, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव; तसेच संभाजीनगर, कोल्हापूर, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.