मुंबई : Pik Vima Bharpai… शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान सहन करावे लागते. पदरी अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळतं. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांना 381 कोटींची विमा भरपाई मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. चला तर मग याबाबत जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
2021 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आणि त्यात विमा कंपनीने योजनेतील निकषांचा चुकीचा अर्थ लावत शेतकऱ्यांना एकूण भरपाईच्या 50 टक्के रक्कम वितरित केली होती. त्या अनुषंगाने राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपील दाखल करण्यात आले होते. याच अपिलास अनुसरून मुंबईत समितीची बैठक पार पडली.
शेतकऱ्यांना मिळणार 381 कोटींची पीक विमा भरपाई
2021 च्या सप्टेंबर अखेर व ऑक्टोबर महिन्यात खूप मोठी अतिवृष्टी झाली होती. ऐन काढणीच्या काळात पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे पूर्णतः नुकसान झाले होते. त्यानंतर कंपनीने भरपाई निश्चित करताना काढणी कालावधी निकषांचा अर्थ चुकीच्या पद्धतीने काढून शेतकऱ्यांना 50 टक्क्यानेच रक्कम वितरित केली. यावर तक्रार झाल्यानंतर जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक झाली.
उर्वरित विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा
या बैठकीत शासनाने निश्चित केलेला काढणी कालावधी कंपनीच्या लक्षात आणून दिला. त्यामुळे संपूर्ण भरपाई मिळणे अपेक्षित होते. दरम्यान, शेतकरी प्रतीनिधी म्हणून अनिल जगताप यांनी राज्यस्तरीय समितीकडे अपील केले. त्यानुसार मंगळवारी या समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवण्यात आला. त्यामुळे आता उर्वरित विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य समिती येत्या काही दिवसातच याबाबत लेखी आदेश काढण्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक विमा भरपाई मिळणार असून मोठा दिलासा मिळणार आहे.