- वडगावच्या कारभारी सांगळेंनी साकारले किफायतशीर शेतीचे मॉडेल
फार मोठं नाही फक्त पाच गुंठे क्षेत्र + परदेशी भाजीपाला = नियमित आणि स्थिर उत्पन्न हे समीकरण प्रयोगशील शेतकरी कारभारी सांगळे यांनी मागील दहा वर्षात यशस्वी यशस्वी केले आहे. फयान वादळाने द्राक्षबागेचे नुकसान झाल्यानंतर सांगळे हे या कमी क्षेत्राच्या शेतीकडे वळले आहेत. त्यांच्यासोबत परिसरातील शेतकर्यांनीही त्यांचे अनुकरण करीत या शेतीकडे वळत पारंपरिक दुष्काळी शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. उन्हाळ्यात कोरड्याठाक असलेल्या सिन्नर या दुष्काळी भागातून कारभारी सांगळे शेतकरी नियमित उत्पन्न घेत आहे. या भागातून दररोज 5 टन परदेशी भाजीपाला देशभरातील बाजारपेठेत जात आहे.
सिन्नर तालुक्याचा बहुतांश भाग वर्षानुवर्ष दुष्काळी राहिलेला आहे. पाणी टंचाई, मुरमाट जमीन, बदलते हवामान या आव्हानांशी झुंजत असतांना सिन्नरच्या जिद्दी शेतकर्यांनी कधीच हार मानली नाही. या प्रतिकूलतेतच संधी शोधत त्यांनी शेतीत नवनवे प्रयोग करण्याचा ध्यास घेतला आहे. कमीत कमी क्षेत्रात नियमित उत्पन्न घेण्यावर त्यांनी भर दिला. वडगावातील शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी कारभारी महादू सांगळे हे अशा जिद्दी शेतकर्यांपैकीच एक आहे. ते त्यांच्या एकूण 6 एकरांपैकी 3 एकर क्षेत्रावर परदेशी तर 3 एकरावर देशी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. यातूनच त्यांनी रोजच्या नियमित व कमी कालावधीच्या उत्पन्नाची सांगड बसवली आहे. ते मागील दहा वर्षांपासून परदेशी भाजीपाला शेतीचे प्रयोग करीत आहेत.
संकटातून मिळाली प्रेरणा
सांगळे म्हणाले की, फयान वादळाने एक एकराच्या द्राक्षशेतीचे अतोनात नुकसान झाले होते. सलग दोन वर्षे बागेपासून उत्पादनच मिळाले नाही. या दरम्यान युवामित्र संस्थेने पंजाब, दिल्ली या राज्यात दौरा ठरवला होता. या दौर्यात या भागातील शेतीची तसेच मार्केटिंगच्या प्रयोगांची माहिती मिळाली. एका भागातील दुकानामध्ये देशीसह परदेशी भाजीपाला जवळून पहावयास मिळाला. त्यात देशी भाजीपाल्याचे किलोचे दर हे 50 रुपयांच्या आसपास होते. तर परदेशी भाजीपाल्याचे दर हे 160 रुपये होते. महानगरांमध्ये या भाजीपाल्याला विशेष मागणी असते. अशी माहिती मिळाली. पारंपरिक देशी भाजीपाल्यापेक्षा परदेशी भाजीपाल्याला मिळत असलेल्या जास्तीच्या दरांनी आकर्षित केले. परदेशी भाजीपाल्याची माहिती हे या दौर्याचे फलित होते. परत गावाकडे आलो आणि मित्रांशी चर्चा केली. पुन्हा पंजाब, दिल्ली भागात दौरा केला. परदेशी भाजीपाल्याच्या लागवडीला भेट दिली. लागवड पद्धती समजून घेतली. गावाकडे परत आल्यानंतर नुकसानग्रस्त द्राक्ष बागेतच परदेशी भाजीपाला लागवड करायचे ठरवले. आता जे विकतं तेच पिकवायचं हा निर्धार त्यांनी केला होता. याच काळात पुणे येथील अभिनव फार्मर्स क्लबचे ज्ञानेश्वर बोडके यांच्याकडून एका एकरात स्वयंपूर्ण शेती करण्याचे प्रशिक्षण घेतले.
पहिल्याच वर्षी भरघोस उत्पन्न
जुन्या द्राक्षबागेत दोन झाडांमध्ये ब्रोकोलीची 4 रोपे अशी लागवड केली. ही ब्रोकोली व्यवस्थित बॉक्स मध्ये पॅक केली व मुंबईच्या बाजारात पाठविली. या ब्रोकोलीच्या खरेदीसाठी व्यापार्यांमध्ये स्पर्धा लागली होती. या ब्रोकोलीसाठी किलोला 90 रुपयापासून ते 160 रुपयांपर्यंत बोली लागली होती. महेश रामदास गुप्ता या व्यापार्याने किलोला 125 रुपयांच्या दराने शेतातील सर्व खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. सांगळे यांनी गुप्ता या व्यापार्याला माल दिला. 2009 मध्ये सांगळे यांना एका एकरातील ब्रोकोलीचे सर्व खर्च वजा जाता 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यानंतर मात्र त्यांनी परदेशी भाजीपाला हा विषय अधिक गांभीर्याने घेण्यास सुरवात केली. यानंतर 5 ते 10 गुंठ्यांमध्ये त्यांनी विविध प्रकारचा परदेशी भाजीपाला उत्पादन घेण्यास त्यांनी सुरवात केली. एकूण जमिनीच्या निम्म्या क्षेत्रावर म्हणजे तीन एकरात फक्त परदेशी प्रकारचा भाजीपाला घेण्याचे त्यांनी ठरविले.
मार्केटचा अभ्यास केला
मागणी असलेल्या मार्केटचा अभ्यास केला. मुंबई, दिल्ली, पुणे, हैद्राबाद या शहरातील मोठ्या तारांकित हॉटेलांना वर्षभर परदेशी भाजीपाला लागतो. मात्र या हॉटेल व्यावसायिकांचे या क्षेत्रातील मध्यस्थांशी वर्षभराचे करार असतात. आम्ही काही शेतकरी मिळून थेट या व्यावसायिकांना भेटलो. त्यांची मागणी समजून घेतली. मार्केटचा रिसर्च केला. त्यानंतर लागवडीचे नियोजन केले. आता आम्ही ब्रोकोली वर्षभर पिकवितो. उन्हाळ्यात विशेषतः लग्नसराईत या भाजीपाल्याला चांगली मागणी असते. पावसाळ्यातही मागणी असते. मात्र या काळात नुकसान होत असल्याने माल कमी निघतो. हैद्राबाद, गोवा राज्यातील अनेक शहरे, मुंबई, दिल्ली, पुणे या शहरातून ब्रोकोली सारख्या परदेशी भाजीपाल्याला मागणी असते. या मोठ्या शहरातील पंचतारांकीत हॉटेलात तयार होणार्या खाद्य पदार्थात मोठा वाटा हा परदेशी भाज्यांचा असतो. मध्यस्थ टाळून थेट व्यावसायिकांशी मी व आमच्या परिसरातील शेतकर्यांनी करार केले. वार्षिक करारा दरम्यान जो व्यावसायिक चांगले दर देईल त्यालाच माल दिला जातो. यातून शेतकरी आणि व्यावसायिक अशी दोघांचीही गरज भागली जाते. या शिवाय इतर देशी माल हा दररोज सिन्नर शहरातील मार्केटमध्ये विकला जातो.
वर्षभर भाजीपाला उत्पादन
सांगळे यांनी तीन एकरांत प्रत्येकी 5 ते 10 गुंठे क्षेत्रावर ब्रोकोली, लालकोबी, केप्चॉय, चायना कोबी या परदेशी भाज्यांची, तर उर्वरित 3 एकर क्षेत्रावर सिमला मिरची, कांदा, लसूण, फूलकोबी या पारंपरिक पिकांची लागवड केली आहे. वर्षभर विविध टप्प्यात पिकांचे उत्पादन सुरू असल्याने सांगळे यांना शेतीतून वर्षातील बाराही महिने उत्पन्न मिळविण्याचे कसब साधले गेले आहे. बाजारातील मागणीचा अंदाज, हवामानाचा अभ्यास आणि कमीत कमी क्षेत्रावर गरजेनुसार उत्पादन या त्रिसुत्रीचा अवलंब त्यांनी केला असल्यामुळे शेती किफायतशीर करणे त्यांना शक्य झाले आहे.
रोज 5 टन माल जातो बाजारात
सिन्नर भागातील ठाणगाव, वडगाव, भाटवाडी या तीन गावातून वर्षभर दररोज तब्बल 5 टन परदेशी भाजीपाला हा गोवा राज्यात तसेच देशातील हैद्राबाद, इंदौर, पुणे, दिल्ली, बंगळुरु या मोठ्या शहरात पाठविला जातो. मागील सहा ते सात वर्षांपासून ही व्यवस्था यशस्वी करण्यात शेतकर्यांना यश मिळाले आहे. यासाठी कारभारी सांगळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सुरवातीला परिसरातील शेतकर्यांना सोबत घेऊन बचतगट तयार केला.
शेतकरी उत्पादन कंपनीची स्थापना
दरम्यान सिन्नर भागात कार्यरत असलेल्या युवामित्रच्या प्रयत्नांनी शिवारात देवनदी व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी स्थापन झाली. शेतकर्यांचा पहिला अॅग्रीमॉल या कंपनीने उभारला. नाबार्डचे अर्थसाह्य मिळविणारी देवनदी ही राज्यातील पहिली कंपनी ठरली. या कंपनीच्या माध्यमातून शेतकर्यांना कृषिनिविष्ठा रास्त दरात मिळण्यास मदत झाली. तसेच बाजारासाठीही मदत झाली. या कंपनीत अध्यक्ष म्हणूनही सांगळे यांनी कामकाज पाहिले आहे.