जळगाव : पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अॅग्रोवर्ल्डच्या डिजिटल विभागाच्या प्रतिनिधी पल्लवी खैरे यांना नुकतेच राज्यस्तरीय सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एरंडोल येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
एरंडोल येथील मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी देखील संस्थेच्यावतीने ५१ मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एरंडोल येथे मंगळवार (दि. ११) रोजी या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ मोहन बी. शुक्ला हे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार सुचिता चव्हाण, पोलिस निरीक्षक सतीष गोराडे, प्रशासक विकास नवाळे, नाशिक येथील बालाजी ट्रस्टच्या अध्यक्षा जयश्री चौधरी, टि.व्ही. मालिका कलावंत विजयमाला चौहान, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, माजी जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, शिवसेना (ठाकरे गट)चे ज्येष्ठ नेते रमेश महाजन, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन उद्योजक, अशोक पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. कैलास महाजन, उद्योजक नरेंद्रसिंह पाटील, डॉ. फरहाज बोहरी, शालिक गायकवाड, माजी मुख्याध्यापक हरीश्चंद्र चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या हस्ते पल्लवी खैरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.