मुंबई : भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आज, 18 जुलै रोजी राज्यातील 8 जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 16 जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 13 जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्टची स्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रासह पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मराठवाडा-विदर्भात आज काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात 27 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, देशात आज आंध्र-तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानात तुफानी पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे.
मान्सून राज्यभरात नव्याने सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरातील बदलांमुळे मान्सूनला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील 4-5 दिवसांत कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केली आहे. कोकणलगतच्या उत्तर, मध्य व पश्चिम महाराष्ट्रात घाट भागातील पावसाच्या हालचालींमध्येही हळूहळू वाढ होईल. येत्या 5 दिवसांत कोकण व विदर्भात काही जिल्ह्यात सातत्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले आहेत. आज, 18 जुलै रोजी पूर्व विदर्भ आणि सातारा तसेच पुण्यातील घाट भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
रायगडमधील माणगाव तालुक्यात राज्यातील सर्वाधिक पाऊस
राज्यात गेल्या 24 तासात मुंबईत सांताक्रूझमध्ये 120 मिमी तर कुलाब्यात 106 मिमी पाऊस नोंदविला गेला. रायगडमधील माणगाव तालुक्यात राज्यातील सर्वाधिक 254 मिलिमीटर पाऊस नोंद झाला. याशिवाय, खालापूर 231, पेण 195, माथेरान 170, कर्जत 168, तळा 164, पोलादपूर 152, उरण 150, रोहा 142, सुधागड 122, पनवेल 114 तर अलिबागमध्ये 112 मिमी पाऊस बरसला. पालघर-ठाण्यात सर्वाधिक 98 मिमी पाऊस वसई तालुक्यात झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तालुक्यात पाऊस 70 मिमीच्या आत राहिला.
पुणे व लगतच्या घाट परिसरात गेल्या 24 तासात अति मुसळधार पाऊस नोंदविला गेला. लोणावळ्यात जिल्ह्यातील सर्वाधिक 210.5 मिलिमीटर तर लवासा क्षेत्रात 111.5 मिमी पाऊस झाला. चिंचवड व तळेगावात 20 मिमी च्या आसपास पाऊस झाला. उर्वरित पुणे शहरासह जिल्ह्यात 10 मिमीहून कमी पाऊस नोंदविला गेला.
पूर्व विदर्भात गेल्या दोन दिवसात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश नदी, नाल्यांना पूर येऊन अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. या विभागात आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
“आयएमडी”ने दिलेले आज, 18 जुलै रोजीचे पूर्वानुमानित जिल्हानिहाय अलर्ट
ऑरेंज अलर्ट : रत्नागिरी, रायगड, पुणे, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया.
यलो अलर्ट : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, वाशिम.
ग्रीन अलर्ट (पावसाचा कोणताही विशेष इशारा नाही; रिमझिम, हलका ते काही ठिकाणी मध्यम पाऊस शक्य) : पालघर, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली.