भारतामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. 1960 पर्यंत भारतीय शेतकरी या शेतीवर अवलंबून होता ती सेंद्रिय शेतीच होती. हरितक्रांतीपासून रासायनिक खते, बुरशीनाशके, किटकनाशके, तणनाशके व संजिवके यांचा भरमसाठ वापर झाला. जनावरांच्या दुधासाठी संप्रेरके वापरण्यास सुरुवात झाली. त्याच्या वापरामुळे देशाच्या एकूण उत्पादनात भरीव वाढ झाली. रासायनिक खतांचा पीक उत्पादन वाढीसाठी होणार्या फायद्यामुळे सेंद्रिय खतांच्या वापराकडे शेतकर्यांचे दुर्लक्ष झाले.
अक्षय्य तृतीयाच्या खास मुहूर्तावर अॅग्रोवर्ल्ड तर्फे देवगड हापूस उपलब्ध
https://youtube.com/shorts/mjngTWqs4t4?feature=share
अलिकडच्या काळात जमिनीच्या आरोग्यावर परीणाम होऊन उत्पादीत मालाच्या प्रतीवरही परिणाम झाला. मानवावर आणि पशु पक्षीयांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवू लागले. गेल्या दोन दशकात पशुधनामध्ये घट होत असल्याने एकूण शेणखताची उपलब्धता सातत्याने कमी होत गेली. अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी ऊस, कापूस, गहू, भाजीपाला पिके आणि फळबागांना आवश्यकतेपेक्षा जास्त खते आणि पाण्याचा वापर करण्यात आला. यापध्दतीने उत्पादन खर्चात वाढ तर झालीच पण त्याचबरोबर जमिनीची रासायनिक, भौतिक आणि जैविक गुणवत्ता कमी होत गेली.
उष्ण हवामानामुळे महाराष्ट्राच्या जामिनीत सेंद्रिय कर्बाचा र्हास झपाट्याने होत आहे. त्याचे जामिनीतील प्रमाण 0.2-0.5% इतके दिसून येते. या सर्व प्रश्नांवर जामिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कसे वाढविता येईल हाच पर्याय शिल्लक राहतो. सातत्याने अधिक उत्पादन देणारी ठराविक पिकेच वर्षानुवर्षे त्याच जमिनीत घेतली गेल्याने काही नवीन रोग आणि किडी या पिकांवर दिसू लागल्या. सेंद्रिय शेतीपद्धतीमध्ये सर्व प्रकारची रासायनिक खते आणि औषधांचा वापर पूर्णपणे बंद करुन सेंद्रिय पदार्थांचाच वापर केला जातो. त्यामुळे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
सेंद्रिय खतांचे प्रकार
वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हणजे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे खत, हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादी.
शेणखत : गाई म्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणार्या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते.
कंपोस्टखत : शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीव जंतूंमुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते.
हिरवळीचे खत : लवकर वाढणार्या पिकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोर्यावर येण्याच्या आधी ते नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात. त्यापासून जमिनीला नत्र मिळते, जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात. गाडलेल्या पिकांना कुजण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो. ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीरिसिडीया व तागा पासून नत्राचा पुरवठा 5 ते 6 आठवड्यात होतो. मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होते.
गांडूळ खत : ह्या खतात गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडी पुंज, बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.
माशाचे खत : समुद्र किनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ते. ह्यात नत्र, स्फुरद आणि पालाशयांचे प्रमाण भरपूर असते.
खाटीकखान्याचे खत : खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणात असते.
अन्नद्रव्य व्यवस्थापन :- सेंद्रिय शेतीसाठी शेणखत, कंपोस्ट खत, कोंबडी खत, लेंडी खत, हिरवळीचे खत, गांडूळ खत या भर खतांचा आणि अखाद्य पेंडीचा जोर खतासाठी वापर करता येतो. सेंद्रिय शेतीत उपयुक्त जीवाणूचे प्रमाण वाढविण्यासाठी रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, अॅसिटोबॅक्टर, स्फूरद विरघळविणार जीवाणू या जीवाणू खतांचा पिकानुसार पूरक खते म्हणून वापर केल्याने उत्पादनात 8 ते 10 टक्के वाढ होते. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीत योग्य पिकपद्धतीचा अवलंब केल्याने जमिनीचा पोत सुधारून आर्थिक फायदा होतो. सेंद्रिय शेतीत पिकांच्या गरजेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे लागते. त्याचबरोबर विविध जैविक द्रावणांचा, जीवामृत, गांडूळपाणी, गोमुत्र इत्यादींचा वापर सेंद्रिय शेतीत करणे शक्य होत आहे. या शिवाय जैविक पीकसंरक्षण शिफारसीचा वापर रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी करावा लागतो. जैविक किड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क व निमार्कचा वापर करावा.
बीजामृत (बीजप्रक्रिया) :- बियाणे बीज प्रक्रियासाठी बीजामृत वापरता येते. बीजामृत तयार करण्यासाठी गाईचे शेण 5 किलो, गोमूत्र 5 लिटर, दूध 1 लिटर, चुना 250 ग्रॅम, हे मिश्रण रात्रभर भिजवून दुसर्या दिवशी बीज प्रक्रियेसाठी वापरता येते.
जीवामृत :- गाय अथवा बैलाचे शेण 10 किलो, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ, बेसनपीठ 2 किलो, 1 किलो वनातील माती हे मिश्रण प्लास्टीकच्या ड्रम मध्ये 200 लि. पाण्यात 5-7 दिवस आंबवून दररोज 3 वेळा मिश्रण ढवळून घेणे. सदरचे मिश्रण 1 एकर क्षेत्रासाठी पाण्यावाटे पिकास देता येते.
दशपर्णी :- मररोग, मूळकुजव्या, भुरी, केवडा, करपा, तेल्या या रोगांच्या नियंत्रणासाठी 10 वनस्पतींचा (नीम, कन्हेर, निर्गुडी, घाणेरी, पपई, सिताफळ, गुळवेल, एरंड, करंज, रूई) 20-25 किलो पाला, 2 किलो हिरव्या मिरचीचा ठेचा, 250 ग्रॅम लसूण, 3-4 किलो शेण, 3 लि. गोमूत्र हे मिश्रण 200 लि. पाण्यात मिसळून दारोज 3 वेळा मिश्रण ढवळून 1 महिना आंबवून पिकावर फवारणीसाठी वापरतात. अशाप्रकारे 200 लि. अर्कामधून गाळलेला 5 लि. दशपर्णी अर्क + 5 लि. गोमूत्र 200 लि. पाण्यात मिसळून रोग व किडिंच्या नियंत्रणासाठी वापरता येते.
पंचगव्य :- शेण 5 किलो, नारळाचे पाणी/गोमूत्र 3 लि., गाईचे दूध 2 लि., तूप 1 किलो हे मिश्रण 7 दिवस आंबवून दिवसातून 2 वेळा हलवावे. तयार झालेले पंचगव्य 10 लि. पाण्यात मिसळून जमिनीवर पाण्यावाटे फवारावे. एकरासाठी 20 लि. पंचगव्य वापरता येते.
सेंद्रिय पदार्थामुळे होणारे फायदे
नत्र पुरवठा :- जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यां पासून मिळणारे खत (कोंबडीची विष्ठा), रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते. जमिनीला 0.5 % ते 1.0 % सेंद्रिय पदार्थ दिल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते.(एक एकरात 8 टन कुजलेले शेणखत घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ 0.5 % ने वाढतात.) जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत जातात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
स्फुरद व पालाश :- सेंद्रिय खतांमुळे झाडांना विविध अवस्थेत स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे शोषले जातात.
जमिनीचा सामू :- सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.
कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी (उएउ) :- कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी 20 ते 30 % ने वाढते. त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते व संतुलित पोषकद्रव्ये मिळतात.
कर्बाचा पुरवठा :- कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात.
सेंद्रिय खतांचा परिणाम :- सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही. सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरून ठेवतात. उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमीन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते. त्यांत रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात. अश्या वेळी ट्रायकोडरमा नावाचे जिवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणार्या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.
– मोनिका भावसार, डॉ. विजय गाभणे, डॉ. राजेश पातोडे,
डॉ. महीपाल गणवीर आणि डॉ. अनिता चोरे,
कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्प,
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला