मुंबई : महाराष्ट्रातील काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. तर काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. दरम्यान, उत्तर भारतात उष्णतेचा कहर कायम आहे.
दक्षिण कोकणसह उत्तर – मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. तर उत्तर कोकण आणि उत्तर – मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळ आणि सोसायट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज अंशतः ढगाळ आकाश राहणार असून येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
उत्तर – मध्य महाराष्ट्र या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
नंदुरबार, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) दिला आहे. उत्तर – मध्य महाराष्ट्र विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
या राज्यात उष्णतेची लाट
उत्तर भारतात उष्णतेचा कहर कायम आहे. मान्सून महिना सुरू झालेला असून देखील देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने दडी मारलेली आहे. या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून तापमान वाढीमुळे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील काही राज्यांमधील तापमान वाढल्याचे पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशात पुढील दोन दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या स्थितीसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. पंजाबमधील लुधियाना, पटियाला, चंदीगड आणि अमृतसर या चार जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेने ग्रासले आहे. हरियाणामध्येही उष्णतेची लाट कायम आहे.
– 18 ते 19 जून रोजी पंजाब, हरियाणा-चंडीगड-दिल्ली
– 18 जून रोजी उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहारच्या वेगळ्या भागांमध्ये उष्णतेची लाट
– 18 जून रोजी जम्मू-काश्मीर, उत्तर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि उत्तर राजस्थान
– 18 ते 19 जून रोजी उत्तर कोस्टल आंध्र प्रदेश आणि उत्तर राजस्थान
– 18 जून रोजी गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये
– 20 जून पर्यंत झारखंडमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.