पुणे – उत्तर – मध्य महाराष्ट्र, मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30 / 40 किमी प्रति तास वेगाने वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे.
नैऋत्य मोसमी वारे जळगाव, अमरावती पट्ट्यातच
महाराष्ट्रात मान्सूनचा वेग मंदावला आहे. राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. मात्र दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा वेग काहीसा मंदावला आहे. वेगानं वाटचाल सुरू असलेल्या मान्सूननं गुरुवारी फारशी प्रगती केली नाही. सध्या हे नैऋत्य मोसमी वारे जळगाव, अमरावती पट्ट्यातच असून ते पुढे सरकलेले नाहीत, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. परिणामी या पट्ट्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरावर सक्रिय असलेले नैऋत्य मोसमी वारे गेल्या पाच दिवसांपासून मंदावले आहेत. त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई आणि नाशिक भागांमध्ये पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
मान्सून पश्चिम विदर्भात दाखल झाला आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे पूर्व विदर्भात अजूनही मान्सून दाखल झाला नसून, पावसाची प्रतिक्षा आहे.
पावसाअभावी वातावरणात प्रचंड उकाडा असून नागपूरसह, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे.
उत्तर – मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस – डख
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार पुढील तीन-चार दिवस राज्यातील नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, जालना, परभणी, अकोला, हिंगोली, वाशिम, नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये सलग पाऊस नसला तरी भाग बदलत तो पडत राहील असेही त्यांनी सांगितले. विदर्भात मात्र पुढील पाच ते सहा दिवस मुसळधार पावसाचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.