मुंबई : Monsoon Update 2023… राज्यातील बदलत्या वातावरणामुळे (Changing Environment) शेतकरी हैराण झाले आहेत. शेतीवर या हवामानाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली असताना काही ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तविण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार, याची सर्वाना प्रतीक्षा लागून आहे.
मान्सून अंदमानात दाखल झाला असून सध्या त्याचा जोर कमी आहे. राज्यात आता लवकरच मान्सूनचे (Monsoon) संकेत मिळाले आहे. अरबी समुद्रात (Arabian Sea) बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात झालेली आहे. यामुळे दि. ७ जूननंतर राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या उष्णतेच्या लाटेपासून दिलासा नसला, तरी लवकरच मान्सूनचे आगमन होण्याची चाहूल लागल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
मान्सूनचे (Monsoon) दक्षिण अंदमान समुद्रात आगमन
नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले. आता मान्सून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात पोहचलेला आहे. तसेच अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल निर्माण झाली आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर नैऋत्य मान्सून आणखी पुढे जाणार आहे.
दरम्यान, आज दि. २५ मे रोजी नंदुरबार, नाशिक, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर दि. २६,२७,२८ आणि २९ मे दरम्यान तापमान कोरडे राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. तसेच केरळ मध्ये १ जूनपर्यंत मान्सून दाखल होणार आल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
तर असा आहे स्कायमेटचा (Skymate) अंदाज
केरळमध्ये ७ जूनपर्यंत मान्सून पोहचणार असल्याचा अंदाज स्कायमेट वेदर या खाजगी संस्थेने वर्तविला आहे. दक्षिण हिंद महासागरावर विषुववृत्तीय अक्षांशांमध्ये चक्रीवादळ सरकत असून हे चक्रीवादळ मान्सूनला रोखणारे आहे. हे वादळ कमी होण्यास एक आठवडा लागेल. परंतु, अंदमान निकोबारकडे मान्सून वेगाने वाटचाल करत आहे.