पुणे : मान्सून आज रविवारी 11 जून रोजी महाराष्ट्राच्या दारात अर्थात कोकण भूमीत पोहोचला. उकड्यामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला दिलासादायक ही बातमी आहे. विशेषतः शेतकरी वर्गासाठी ही आनंदाची बातमी असून मान्सूनचा जोर असाच टिकून तो लवकरच महाराष्ट्र व्यापेल, असा भारतीय हवामान विभागाचा (IMD) अंदाज आहे. अर्थात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व सरी कोसळत असल्याने काही ठिकाणी मात्र उकड्यातून दिलासा मिळाला होता. मान्सूनच्या बातमीमुळे शेती कामांनाही आता वेग येईल.
गेल्या काही दिवसांपासून मान्सून राज्यात कधी दाखल होईल याबाबत प्रतीक्षा लागलेली होती. या वर्षी मॉन्सून लांबल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. राज्यातील पेरण्या देखील रखडल्या होत्या. याच सोबत बिपरजॉय चक्रीवादळाचे देखील संकट असून हे चक्रीवादळ अरबी समुद्रात आहे.
के. एस होसाळीकर यांनी ट्विट करून दिली माहिती
सर्वांनाच चाहूल लागलेल्या मान्सूनचे अखेर महाराष्ट्रात आगमन झाले आहे. राज्याच्या दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग आज मान्सूनं व्यापाला आहे, असे ट्विट पुणे हवामान विभागाचे प्रमुख आणि हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे. नैऋत्य मान्सूनचे आज रविवारी ११ जून ला महाराष्ट्रात आगमन झाले असून दक्षिण कोकणातील काही भाग, द.मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटकचा व तामीळनाडू व आंध्रप्रदेशचा काही भाग मान्सूनने व्यापला असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ सद्यस्थिती
भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळे 12 जूनपर्यंत अरबी समुद्र खवळलेला राहणार आहे. हे चक्रीवादळ पूर्व -मध्य अरबी समुद्रावर 11 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 510 किलोमीटर अंतरावर होते. पुढच्या 12 तासांमध्ये हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
महाराष्ट्राला थेट धोका नाही पण…
हवामान खात्याने पुढे असे देखील सांगितले आहे की, बिपरजॉय चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तरी देखील या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकसह गोव्यामध्ये दिसून येणार आहे. कारण या वादळामुळे या राज्यामध्ये जोरदार वादळी वारे आणि मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुरेसा पाऊस झाल्यावरच मशागतीची कामे करावी
केरळमध्ये मान्सून झाल्यानंतर आता राज्यात मान्सून दाखल झाला आहे. शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच पेरणीसाठी तयार राहावे. मात्र, पुरेसा पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करु नये, असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.