मुंबई : किसान स्टोअरची (Kisan Store) संकल्पना वर्षभरानंतर आता नव्या, दमदार स्वरुपात येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे नशीब खरोखरच बदलू शकेल. कृषीमाल बांधावरून थेट ग्राहकाच्या घरात जाण्याच्या मजबूत साखळीत शेतकरी जोडले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य दाम मिळून शेतकरी नक्कीच मालामाल होऊ शकेल.
जे कोणत्याही सरकारला इतक्या वर्षांत जमले नाही, ती किमया साधू पाहतेय एक खासगी परदेशी कंपनी. नेमके काय आहे हे किसान स्टोअर? त्यातून कसा होऊ शकेल शेतकऱ्यांना फायदा? कृषी मालाला योग्य भाव मिळण्यास कशी मदत होऊ शकेल, हे सारे आम्ही आपणास सांगणार आहोत.
शेतकऱ्यांचे नशीब पालटवणार आहे ते ॲमेझॉन (Amazon) ही अमेरिकी ई-कॉमर्स कंपनी. ॲमेझॉनने नुकताच भारतीय कृषी संशोधन परिषदेशी (ICAR) करार केला आहे. कंपनीने यापूर्वीच पुण्यात कृषी विज्ञान केंद्राशी (KVK) हातमिळवणी करून पथदर्शी प्रकल्प राबवला होता. त्यातून सप्टेंबर 2021 मध्ये किसान स्टोअर सुरू केले गेले होते. आता ॲमेझॉनने आयसीआरशी करार करून शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की, त्यांचा नवीन उपक्रम अन्नदात्यांचे नशीब बदलून टाकणार आहे.
ॲमेझॉन शेतकऱ्यांकडून थेट त्यांच्या शेतात जाऊन शेतमाल खरेदी करते आणि त्यानंतर त्यावर योग्य ती प्रक्रिया करून अगदी ताजा व दर्जेदार कृषीमाल थेट ग्राहकांच्या घरी पोहोचवते.
देशातील शेतकरी पीक पिकवण्यासाठी जेवढी मेहनत करतो, तेवढाच पीक विकण्यात त्याचा घाम गाळला जातो. एव्हढे करूनही हाती योग्य दाम येईलच, याची शाश्वती नसते. हे लक्षात घेऊन देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने (Amazon India) एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत ॲमेझॉनने ‘किसान स्टोअर’मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी कृषी संशोधन संस्था ICAR सोबत करार केला आहे.
2021 मध्ये सुरू झाले किसान स्टोअर
सप्टेंबर 2021 मध्ये ॲमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर ‘किसान स्टोअर’ विभाग सुरू करण्यात आला. शेतीशी संबंधित उत्पादने ॲमेझॉन इझी स्टोअर्समध्ये ऑनलाईन खरेदी करून शेतकरी नजीकच्या किसान स्टोअरमधून घरपोहच मिळवू शकतात. ॲमेझॉन या प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकण्याची संधी देते. ॲमेझॉन शेतकऱ्यांकडून थेट शेतात जाऊन खरेदी करते आणि त्यानंतर ते थेट ग्राहकांच्या घरी पोहोचवते.
ICAR सोबत करार
भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), कृषी विज्ञान केंद्र आणि ॲमेझॉन इंडिया यांच्यात पुण्यात घेण्यात आलेल्या पथदर्शी प्रकल्पाच्या चांगल्या रिझल्ट्समुळे या भागीदारीच्या विस्ताराला प्रेरणा मिळाली आहे, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. आयसीएआरचे कृषी विस्तार उपमहासंचालक यूएस गौतम आणि ॲमेझॉन फ्रेश सप्लाय चेन व किसानचे उत्पादन प्रमुख सिद्धार्थ टाटा यांनी यासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. आयसीएआरचे महासंचालक हिमांशू पाठक यांनी ॲमेझॉनशी केलेल्या आयसीएआर तंत्रज्ञान हस्तांतरण, क्षमता निर्माण कराराचा शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली. हा “सार्वजनिक- खाजगी- शेतकरी- भागीदारी” असा अनोखा पीपीपीपी उपक्रम आहे.