बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाची प्रणाली विकसित होण्याची दाट शक्यता
ऑगस्ट कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह देशात सर्वत्र पावसाचे धुमशान सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सून हंगामातील एकत्रित सरासरी गाठली जाण्याची शक्यता आहे. सध्याचा पाऊस देशभरात सप्टेंबरच्या अखेरपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला आहे.
याशिवाय, यंदा परतीचा पाऊस म्हणजे रिटर्न मान्सून लांबण्याची शक्यता आहे. त्याला परतायला विक्रमी उशीर होण्याची चिन्हे दिसत असल्याचे “स्कायमेट”ने म्हटले आहे. 18 ऑक्टोबरपूर्वी मुंबईतून परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता नसल्याचा “स्कायमेट”चा अंदाज आहे.
ऑक्टोबरच्या पूर्वार्धात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता : हवामान अभ्यासाच्या GFS मॉडेलने 3 ऑक्टोबरपर्यंत स्थितीचे अनुमान निश्चित केले आहे. या GFS अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरावर नवे अतितीव्र दाबाचे क्षेत्र किंवा चक्रीवादळ निर्माण होणे अपेक्षित आहे. हा अंदाज 15 दिवस आधी वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे त्यात परिस्थितीनुसार बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्यातून एक संकेत मिळत आहे, की ऑक्टोबरच्या पूर्वार्धात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. विशेषत: दक्षिण भारतात मान्सूनचा जोर कायम राहू शकेल, असे हवामानतज्ञ डॉ. प्रदीप कुशवाह यांनी म्हटले आहे.
मुंबईत 24 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर : मुंबईत 24 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता “स्कायमेट”ने वर्तविली आहे. 25 तारखेनंतर पुढे किमान 3 ते 5 ऑक्टोबरपर्यंत मुंबई महानगर परिसरात पावसाची विश्रांती राहू शकते. त्यानंतर पुन्हा काही प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे. मुंबईतून 18 ऑक्टोबरपूर्वी मान्सून माघारी जाण्याची शक्यता फारच कमी आहे. साधारणतः 10 ऑक्टोबरनंतर मुंबईत पोस्ट मान्सून काळ सुरू होतो.
राजस्थान, गुजरातमध्ये आज-उद्या मुसळधार : कमी दाबाची प्रणाली सध्या दक्षिण राजस्थानवर आहे. यामुळे पुढील 24 ते 36 तास दक्षिण राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत राहील. गुजरातलगतच्या महाराष्ट्राच्या भागात विशेषत: उत्तर महाराष्ट्रात या स्थितीचा अनुकूल फायदा राहू शकतो.