मुंबई : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दरवर्षी मान्सून 7 जूनला राज्यात दाखल होत असतो, पण कालच मान्सून राज्यात दाखल झाला आहे. तसेच पुढील 3 दिवसांत हवामान कसे असेल ? याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. दरम्यान, मान्सूनने आज कोकण किनारपट्टी व्यापत मुंबईत प्रवेश केला.
काल केरळमध्ये प्रवेश केलेल्या मान्सूनने जोरदार प्रगती केली आहे. गोवा ओलांडून मान्सून सिंधुदुर्ग मार्गे महाराष्ट्रात दाखल झाला आहे. यंदाचा मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात येऊन पोहोचला आहे. तसेच हवामान विभागाने आज काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नैऋत्य मान्सूनचा वेग वाढला
आज, २६ मे रोजी नैऋत्य मान्सूनने पुढे सरकताना मध्य अरबी समुद्राचा काही भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक व बंगळुरू, तामिळनाडूचा उर्वरित भाग, तेलंगणा व आंध्र प्रदेशाचा काही भाग, तसेच पश्चिम मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग, मिझोरामचा उर्वरित भाग, संपूर्ण त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम व मेघालयाच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे.
पुढील 3 दिवसांत हवामान कसे असेल ?
पुढील तीन दिवसांत नैऋत्य मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती तयार झाली आहे. मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराचे काही भाग आणि ईशान्य भारतातील उर्वरित राज्ये, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल व सिक्कीमच्या काही भागांमध्ये मान्सूनची वाटचाल होण्याची शक्यता आहे.
आज या भागात ऑरेंज, यलो अलर्ट
जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर, सांगली, ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
