मुंबई : राज्यात पुढील 4-5 दिवस संमिश्र पाऊस राहण्याची शक्यता आहे. मात्र, हवामान खात्याने आज विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्याच्या काही भागातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर भारतातील मान्सूनचा कहर सुरूच आहे. आजही बहुतांश भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाने हिमाचल प्रदेशात 72, तर उत्तर प्रदेशात 34 बळी घेतले आहेत. या पावसाने सुमारे 3,000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
राज्यात काही भागात अजूनही मुसळधार पाऊस होत आहे, तर बहुतांश भागात मात्र तुरळक पाऊस आहे. पुढील चार-पाच पाऊस संमिश्रच राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. कोकणात मुसळधार काही भागात सुरूच राहील. याशिवाय, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागातही विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. राज्यातील पावसात 13 जुलैनंतर सुधारणा होण्याचे अनुमान आहे.
“आयएमडी”च्या पूर्वानुमानानुसार, आज, मंगळवार, 11 जुलै रोजी राज्यात सांगली-साताऱ्यासह पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे. विदर्भ विभागासाठी आज यलो अलर्ट आहे. पुण्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
11 जुलै रोजी सकाळी 9.45 वाजताचे नवीनतम सॅटेलाइट छायाचित्राचे निरिक्षण केले असता, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आकाश ढगाळ दिसत आहे.
महाराष्ट्राच्या काही भागात आज थोडा पाऊस पडण्याची शक्यता
11 जुलै रोजीच्या IMD GFS मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्राच्या काही भागांसह मध्य भारतातील काही भागांमध्येही पुढील 24 ते 48 तासात थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तरोत्तर राज्यांचा काही भाग, बिहार, उत्तर प्रदेशसह हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या टेकड्यांवर पुढील 48 तासांत जोरदार सरी कोसळण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे के.एस. होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.
विदर्भावर मेघगर्जनेचे ढग
11 जुलै रोजीच्या नागपूरच्या रडारवरील नवीनतम निरीक्षणानुसार, विदर्भाच्या दक्षिणेवर हलक्या ते मध्यम प्रकारचे मेघगर्जनेचे ढग दिसत आहेत. हे ढग सूचित करतात, की पुढील 3-4 तासात पावसाच्या तुरळक सरींची शक्यता आहे. रडार निरीक्षणाची रेंज नागपूरपासून 150 किलोमीटर त्रिज्येच्या क्षेत्रात आहे. वरील छायाचित्रातील क्षेत्रात हलका निळा, पांढरा आणि पिवळ्या व लालसार क्षेत्रात चढत्या क्रमाने पाऊस पडेल.
पुढील 5 दिवस चांगल्या पावसाची शक्यता
IMD ने जुलैसाठी वर्तवलेल्या हंगामी पुर्वानुमानानुसार, महाराष्ट्राच्या काही भागांसह मध्य भारतात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त केली गेली होती. विस्तारित श्रेणीचा अंदाज देखील हीच शक्यता सूचित करतो. आता पुढील 5 दिवसांचा अंदाज चांगल्या पावसाचा दिसत आहे. इतर मॉडेलदेखील समान ट्रेंड दर्शवित असल्याचे होसाळीकर यांनी म्हटले आहे.