सद्ध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड झाली असून बऱ्याच ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ढगाळ वातावरण व कमी पाऊस यामुळे अळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरवातीपासूनच काही उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येईल.
अमेरिकन लष्करी अळी
(फॉलआर्मिवर्म-स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) भारतामध्ये सर्वप्रथम २०१८ मध्ये प्रथम तामिळनाडू व दक्षिण कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये ह्या किडींची नोंद झाली. महाराष्ट्रात हि कीड सर्वप्रथम तांदुळवाडी, ता-माळसिरस, जि – सोलापूर येथे आढळून आली. आता सर्वदूर जवळपास सर्वच पिकावर ( मका) ह्या किडीचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे.
सदर कीड हि बहुभक्षी असून ८० पेक्षा जास्त वनस्पतीवर उपजीविका करते. हि कीड मुख्यतः मका, ज्वारी, बाजरी, भात तसेच कापूस, सोयाबीन, ऊस, इतर पिकावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव करते त्यामुळे तिचे वेळीच व्यवस्थापन तितकेच गरजेचे आहे.
जिवनक्रम
1. अंडी अवस्था (२ ते ३ दिवस )
• मादी पानांच्या वर किंवा मागच्या बाजूस पुंजक्यामध्ये सुमारे ६०० ते ८०० अंडी घालते.
• पुंजक्यामधील अंड्यावर लोकरीसारखे आवरण असून अंडी पिवळसर सोनेरी रंगाची असतात.
2. अळी अवस्था ( १४ ते २० दिवस )
• या कालावधीत अळी सहा अवस्थेतून जाते.
• सुरवातीला डोके हिरवे, नंतर तपकिरी होते , अंगावर पांढऱ्या पिवळसर रेषा यायला लागतात.
• शेवटच्या अवस्थेमध्ये पाठीवर पिवळसर रंगाचे ठिपके दिसायला लागतात.
• उन्हाळ्यात १४ तर हिवाळ्यात ३० दिवसापर्यंत अळी अवस्था असू शकते.
• सर्वात नुकसानकारक हि अवस्था असून वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात ७० ते ८० % पर्यंत घट होते.
3. कोषावस्था (९ ते १२ दिवस)
• संपूर्ण वाढ झालेली अळी ३ ते ८ सेमी खोलीवर कोषावस्थेत मातीमध्ये जाते.
• कोशाचा रंग तपकिरी असतो
• कोषावस्था ९ ते ३० दिवसापर्यंत असू शकते.
4. पतंग अवस्था (४ ते ६ दिवस)
• नर पतंग हा राखाडी रंगाचा असून पंखाच्या मध्यभागी गोल ठिपका असतो.
• नर पतंग रात्रीच्या वेळेला १०० कि.मी. पर्यंत प्रवास करू शकतो.
• वेळीच नर पतंगाचा नायनाट केल्यास पुढच्या अळी निर्मितीला आळा बसतो.
नुकसानीचा प्रकार :-
मका पिकावर सर्वच अवस्थांमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. सुरवातीच्या अळी अवस्थेमध्ये समूहाने राहत असल्यामुळे पानाचा पृष्ठभाग खरबडून टाकल्यामुळे पानावर पांढरे चट्टे पडल्यासारखे दिसतात. अळ्या थोड्या मोठ्या झाल्यावर पोंग्यामध्ये शिरून कोवळी पाने खायला सुरवात करतात. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पानावर मोठ्या आकाराची एकसारखी छिद्रे दिसून येतात. सहाव्या अवस्थेतील अळी अतिशय खादाड असून मोठ्या प्रमाणात पोंग्यामध्ये विष्ठा आढळून येते. हि कीड स्वजातीय भक्षक असल्यामुळेएका पोंग्यामध्ये एक किंवा दोनच अळ्या आढळून येतात. दाणे भरण्याच्या काळात मक्याच्या कणसातील दाण्यावर सुद्धा प्रादुर्भाव दिसून येतो.
सद्ध्या स्थितीत पिकानुसार करावयाचे व्यवस्थापन :
आठवड्यातून दोन वेळा पिकाचे सर्वेक्षण केल्यावर अळीचा प्रादुर्भाव ओळखणे लगेच शक्य होते. ( सकाळी किंवा संध्याकाळी )
1. पारंपारिक पद्धती:-
• पिक ३ ते ४ पानावर असताना झाडांचे पोंगे हाताने दाबून घेणे.
• पानावरील अंड्याच्या पुंजक्याचा नायनाट करणे.
• पोंगे चांगले सक्षम झाल्यावर माती + राख यांचा उपयोग पोंग्यामध्ये करून वरून पाणी सोडणे किंवा मातीची स्लरी थेट झाडाच्यापोंग्यामध्ये टाकणे. २ ते ३ दिवसात अळींचा संपूर्ण नायनाट होतो.
• लागवड होताच एकरी ५ ते ६ पक्षांचे थांबे बसवावे.
• सामुहिक पद्धतीने लागवड केल्यास अळ्यांच्या प्रादुर्भावाला आळा घालता येतो.
• सुरवातीला पिक वाढीच्या काळात पिक ताणविरहित ठेवणे.
2. जैविक पद्धती:-
• किडींच्या सर्वेक्षणासाठी व पतंग नियंत्रणासाठी एकरी १० ते १५ कामगंध सापळे लावावेत.
• मका पिक उगवून येताच निंबोळी अर्क (५%) किंवा ॲझोडीराक्टीन( १०००० पी पी एम ) ३-४ मिली प्रती लिटर फवारणी करावी.
• मेटाऱ्हायझिमॲनिसोप्ली किंवा नोमुरीया रिले १० ग्राम किंवा बिव्हेरीया बॅसियाना १० मी ली प्रती लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
• ट्रायकोग्रामा प्रीटीओराम किंवा टीलेनोमस रेमस यांनी परोपजीवग्रस्थ केलेली ५०००० अंडी प्रती एकर एका आठवड्याच्या अंतराने दोन वेळा प्रसारित करावी.
• जैविक घटकांची फवारणी संध्याकाळच्या वेळेला पोंग्यामध्ये जाईल अशा पद्धतीने करावी. गरज भासल्यास १० दिवसाच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी.
3. रासायनिक नियंत्रण पद्धती:-
अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठल्यावर (२०% प्रादुर्भाव ग्रस्त झाडे किंवा ५ पेक्षा जास्त अळ्या प्रती झाड ) खालील प्रमाणे उपाययोजना कराव्यात:
• पहिलीफवारणी (१० ते १५ दिवस ) – क्लोरोपायरीफोस ३५ EC @ १५ मी ली + निंबोळी अर्क (५ % ) २० मी ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• दुसरी फवारणी (२५ ते ३० दिवस ) इमामेक्टीन बेन्जोएट (५ %) ४ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• तिसरी फवारणी (३५ ते ४० दिवस) – ट्रेसर @ ५ मी ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पोंग्यामध्ये फवारणी करावी.
• शक्यतो रासायनिक पद्धतीचा उपयोग अळ्यांचा प्रादुर्भाव अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यावर करावा. प्रयोगाअंती असे आढळून आले आहे कि एकाच औषधांची फवारणी वारंवार न करता आलटून पालटून करावी.
काही सरकारी संस्था उदा. मका अनुसंधान केंद्र, CIMMYT व खाजगी कंपन्या लष्करी अळीसाठी प्रतिकार करणाऱ्या जातींची निर्मिती विषयी संशोधन करत आहे. लवकरच बाजारात असे वाण उपलब्ध होतील.
पारंपारिक व जैविक पद्धतीने लष्करी अळीचे नियंत्रण रासायनिक पद्धतीचा अवलंब न करता चांगल्या प्रकारे करता येते. हे अजित सीड्स कंपनीच्या संशोधन क्षेत्रावर मागील वर्षी सिद्ध झालेले आहे.
लेखक : श्री. अमोल सराफ ( वरिष्ठ पैदासकार)
Mob. No. 9921569099
श्री. बबन अनारसे ( वरिष्ठ व्यवस्थापक) अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड
छत्रपती संभाजीनगर.