कृषी यंत्रे आणि उपकरणे निवडणे, त्यांची खरेदी करणे हा शेतकऱ्यांसाठी काळजीचा विषय असतो. शेतकऱ्यांसाठी, शेतीच्या विकासामध्ये शेती उपकरणे आणि यंत्रे अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. त्यांची योग्य ती निवड केल्याने वेळेची बचत होते, उत्पादनात वाढ होते आणि खर्च कमी होतो. मात्र, बाजारात विविध कंपन्यांची अनेक उपकरणे उपलब्ध असल्याने त्यांची निवड करणे कठीण असते. खरेदी करताना काही खास गोष्टींची काळजी घेतली नाही तर पुढे अडचणी येऊ शकतात. म्हणून कृषी यंत्रे आणि उपकरणे यांची निवड कशी करावी, त्यांची निवड करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ते आपण जाणून घेऊया.
शेताचे क्षेत्रफळ आणि जमीन प्रकार
सर्वप्रथम आपल्या शेताचे क्षेत्रफळ आणि जमीन प्रकार, जसे की जमीन चिकण, काळया मातीची, मुरमाड आहे का, याची माहिती असणे आवश्यक आहे. मोठ्या शेतांसाठी मोठ्या क्षमतेची यंत्रणा लागेल, तर लहान शेतांसाठी लहान यंत्रे पुरेसे होतील. जमीन चिकण असेल तर हलक्या यंत्रांचा विचार करावा.
मातीच्या वैशिष्ट्यांचे वर्गीकरण
जमिनीच्या प्रकारानुसार जड किंवा हलकी अशी कृषी उपकरणे निवडली पाहिजेत. हलकी माती असलेल्या शेतांसाठी जास्त ग्राऊंड क्लिअरन्स आणि कमी वजन असलेली शेती उपकरणे वापरण्याचा सल्ला दिला जातो.
आपण कोणती पिके घेणार आहात ?
वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळी यंत्रणा लागते. जसे धान्यासाठी पेरणी यंत्र, वीडर, हार्वेस्टर वैगेरे; तर ऊसासाठी बेणे टोचण आणि कापणी यंत्र इत्यादी. आपण कोणती पिके घेणार आहात त्यानुसार यंत्रसामग्री व उपकरणे निवडा.
शेतीच्या यंत्राविषयी योग्य माहिती गोळा करा
तुम्ही कोणते साधन वापरणार आहात आणि त्यातून कोणते फायदे होतील, हे तुम्हाला माहिती व्हावे. त्यासाठी तुम्हाला अगोदरच बाजारात मिळणारी कृषी यंत्रांची प्राथमिक माहिती करून घेणे आवश्यक आहे. आजूबाजूला संबंधित शेती यंत्रे वापरणारे शेतकरी असतील, त्यांना जरूर भेटा, त्यांचा अनुभव जाणून घ्या. तुम्हाला फायदा-तोट्याची योग्य प्राथमिक माहिती नसल्यास, तुम्ही यंत्रसामग्रीबाबत समाधानकारक निर्णय घेऊ शकणार नाही.
आपल्या बजेटचा विचार करा
शेती उपकरण आणि यंत्रे खरेदी करताना तुमच्या बजेटचाही विचार करा. नवीन यंत्रसामग्री महाग असू शकते, तर भाड्याने उपलब्ध असलेली यंत्रे वापरण्याचा विचार करता येतो. शिवाय, जुन्या यंत्रांची चांगली दुरुस्ती करूनही काही काळ वापरता येऊ शकतात.
गुणवत्ता आणि टिकाऊपणा महत्वाचा
शेती उपकरण आणि यंत्रे खरेदी करताना त्यांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा याकडे लक्ष द्या. विश्वासार्ह, परिचित अशा नामांकित कंपन्यांची यंत्रे निवडणे चांगले, कारण त्यांची स्पेअर पार्ट्स सहज उपलब्ध होतात आणि वारंवार दुरुस्तीची गरज पडत नाही.
यंत्राची माहिती आणि गुणवत्ता प्रमाणपत्र
आपण ज्या यंत्राची खरेदी करत आहात, त्याची तपशीलवार माहिती (हॉर्सपॉवर, क्षमता, इत्यादी) आणि गुणवत्ता प्रमाणपत्र (BUREAU OF INDIAN STANDARDS BIS किंवा इतर मान्यताप्राप्त संस्था) याची माहिती जाणून घ्या. त्यामुळे यंत्राची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा यांची खात्री करता येते. नेहमी प्रमाणित यंत्रे आणि उपकरणे यांची खरेदी करावी.
विक्रेत्याची माहिती आणि सेवा
ज्या विक्रेत्यांकडून आपण यंत्र खरेदी करत आहात, त्याची बाजारात प्रतिष्ठा आणि मागील ग्राहकांचा अनुभव यांची माहिती करून घ्या. विक्रेत्यांकडे यंत्रे, उपकरणांची संपूर्ण माहिती, स्पेअर पार्ट्सची उपलब्धता आणि दुरुस्ती सेवा चांगली आहे ना, याची खात्री करा.
बँड आणि मॉडेल विचारात घ्या
एकट्या मशीनच्या दिसण्यावर कधीही अवलंबून राहू नका. फार्मट्रॅक, फिल्डकिंग, सोनालिका किंवा महिंद्रा यांसारख्या प्रतिष्ठित उत्पादकाकडून शेतीचे यंत्र खरेदी करा. तुमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह सर्वात अलीकडील मॉडेल शोधा. तुम्ही खरेदी करू इच्छित असलेली शेती मशिनरी चालवण्यासाठी जास्त श्रम किंवा ऊर्जा लागत नाही. जास्त तास काम करू शकणारे फार्म मशीन निवडताना त्याचे अष्टपैलुत्व आणि सहनशक्ती विचारात घ्या. इतर घटकांमध्ये फार्म मशीनची मूळ किंमत, अंदाजे सेवा वर्ष आणि इतर समाविष्ट आहेत.
डेमो आणि ट्रेनिंग
काही यंत्रे वापरण्यासाठी थोडीशी जटिल असू शकतात. म्हणून खरेदी करताना विक्रेत्याकडे त्या यंत्राचे डेमो मागवा आणि ते चालविण्यासाठी थोडे प्रत्यक्ष फील्ड ट्रेनिंग घ्या.
किंमत, घासाघीस, डिस्काऊंट अन् सौदेबाजी
बाजारात विविध कंपन्यांची यंत्रे व उपकरणे उपलब्ध असल्याने किंमत आणि वैशिष्ट्यांची तुलना करा. शक्य असल्यास थोडी घासाघीस, सौदेबाजी करण्याचा प्रयत्न करा. कोणताही विक्रेता, डिलर सध्याच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात डिस्काऊंट देऊ शकतो. अनेकदा कंपन्यांच्या ऑफर्स सुरू असतात. डिस्काऊंट आणि ऑफर्सचा आग्रह धरा. मात्र, फक्त किंमतीच्या मोहात पडून, पैसे वाचवण्यासाठी, कमी किमतीची, मान्यता नसलेली, खराब गुणवत्तेची यंत्रे खरेदी करू नका.
वॉरंटी आणि हमी
यंत्राची वॉरंटी आणि हमी काय आहे, याची माहिती घ्या. वॉरंटी कालावधीत यंत्र बिघाड झाल्यास दुरुस्ती किंवा बदलणीसाठी कंपनी जबाबदार असते. नेहमी बिल घेऊनच कोणतीही खरेदी करावी. शिवाय, वॉरंटी कार्ड डिलरच्या सही-शिक्क्यानिशी भरून घ्यावे. अलीकडे, वेबसाईटवर ऑनलाईन प्रॉडक्ट रजिस्ट्रेशनची सोय असते. तेही करून घ्यावे. तुमच्या यंत्राचे पुनर्विक्री मूल्यही (रिसेल व्हॅल्यू) खरेदी करताना नक्की जाणून घ्या.
नजीकच्या सेवा केंद्राची उपलब्धता
यंत्रे-उपकरणांमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी नजीकच्या ठिकाणी सेवा केंद्र असणे आवश्यक आहे. त्यामुळे खरेदी करताना त्याचीही खात्री करा. आपल्याला तात्काळ, भागातच दुरुस्ती, सेवा मिळणे कधीही चांगले असते. कृषी उपकरणे खरेदी करताना सुटे भाग खरेदी करण्याची सुलभता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वरच्या मुद्द्यांचा विचार केल्याने शेती उपकरण आणि यंत्र खरेदी करताना फसवणूक होण्याचा धोका कमी होतो आणि आपल्याला चांगल्या कंपनीचे टिकाऊ यंत्र मिळण्यास मदत होते.