मुंबई – राज्याच्या हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झाला असून, कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने आजपासून (२९ जून) संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पुन्हा एकदा जोरदार स्थितीत सक्रिय झाला असून राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा दमदार पुनरागमन केले असून, राज्यभरातील बळीराजाला यामुळे मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
हवामान विभागाने राज्यातील हवामानाच्या सद्यस्थितीचा अंदाज घेत विविध भागांसाठी आज ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत. विशेषतः विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, पुणे, सोलापूर आणि नागपूरसह राज्यातील सुमारे २५ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पावसाची तीव्रता पाहता या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोकण किनारपट्टीवर पावसाची तीव्रता अधिक
राज्याची आर्थिक राजधानी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला असून, उपनगरांमध्येही जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच संपूर्ण किनारपट्टीवर म्हणजेच कोकणात पावसाची तीव्रता आजपासून अधिक वाढणार आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याने सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे, तसेच मच्छिमारांनाही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिकला यलो अलर्ट, खान्देशातही पावसाची शक्यता
उत्तर महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केल्यास, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चारही जिल्ह्यांमध्ये पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला असून, शहर व घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या खान्देशातील पट्ट्यात आज आकाश पूर्णतः ढगाळ राहील आणि दुपारनंतर किंवा संध्याकाळी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील, असा हवामान खात्याचा सुधारित अंदाज आहे. या दमदार पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना आणि शेतीच्या कामांना मोठा वेग मिळण्याची शक्यता आहे.
तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल



















