मुंबई : आमिर खानच्या गाजलेल्या “तारे जमी पर” चित्रपटातील मुलासारखा ऑटीझम आजार झालेला ब्रिटनमधील एक 11 वर्षांचा मुलगा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. इंग्लंडमधील लिंकनशायर या पवनचक्क्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यात या ऑटीझमग्रस्त बाल शेतकऱ्याने कमाल केली आहे. तो ब्रिटनमधील सर्वात भारी तरुण शेतकरी ठरला आहे. शिवाय, पशुपालनात लिंकनशायर कौंटी राज्यात अव्वल ठरला आहे.
या 11 वर्षाच्या मुलाने लॉकडाऊन काळात शेतकरी होण्याचा निर्धार केला होता. या मुलाचे नाव आहे ज्यो ट्रोफर. त्याला सर्वजण आता “फार्मर ज्यो” म्हणून ओळखतात. कोविड महामारीच्या काळात शेतीत रमलेल्या ज्योने शेतकरी होण्याचे स्वप्न जिद्दीने पूर्ण केले आहे. त्याने वाढदिवसाला आजोबांकडून मिळालेल्या छोट्याशा जागेत काही शेळ्या ठेवल्या आहेत. याशिवाय, दुसऱ्या शेतकऱ्याकडून भाड्याने घेतलेल्या छोट्याशा जमिनीत तो कोंबड्या आणि काही शेळ्या-मेंढ्या पाळतो.
ज्यो ट्रोफर-कुक याच्या आजोबांनी त्याच्या सातव्या वाढदिवसानिमित्त परसबागेतील छोट्याशा तुकड्यात भेट म्हणून त्याच्या नावाने काही फळ व भाजीपाल्याचे बियाणे पेरले. तेव्हापासून त्याच्या मनातही शेतीबद्दल आवडीची बीजे रोवली गेली.
मेंढ्यांची ठेवली गमतीशीर नावे
एका वर्षानंतर, कोविडचा फटका बसल्यानंतर, ज्योने परसबागेत उगवलेल्या फळ-भाज्या घराबाहेरच ट्रॉली लावून विकण्यास सुरुवात केली. यातून मिळालेला पै न पै साठवून त्याने तीन कोंबड्या विकत घेतल्या. परसबागेतच या कोंबड्या पाळल्यानंतर त्यांची अंडी विकून ज्यो ला पैसे मिळू लागले. हे पैसे वाचवून त्याने आपल्या पहिल्या चार मेंढ्या विकत घेतल्या. या मेंढ्यांची नावेही त्याने अतिशय गंमतीशीर ठेवली. फळ-भाजी विक्रीतून आलेल्या शेळ्या म्हणून त्यांची नावे – रुबर्ब, स्ट्रॉबेरी, भोपळा आणि मुळा! रुबर्ब हे एक प्रकारचे छोटेसे लालसर फळ असते ज्याला डोलू किंवा रेवाचीनी असेही म्हणतात.
ज्यो ने विकलेल्या पहिल्या चार मेंढ्या मादी होत्या, ज्यांची किंमत प्रत्येकी 80 पौंड म्हणजे सुमारे 8,000 रुपये मिळाली होती. त्यानंतर त्याने एक नर मेंढा विकत घेतला, ज्याचे नाव ठेवले बेसिल. पुढील वसंत ऋतुत पुन्हा शाळेत जाण्यापूर्वीच ज्योच्या मेंढ्यापासून एका मेंढीला तीन कोकरू झाले. पुढच्या वर्षभरात, सेकंड-हँड छोटा ट्रेलर घेण्यासाठी त्याने कोकरू विकले. पुढे दोन नवीन शेळ्या विकत घेतल्या – पार्सली आणि पार्सनिप. त्यानंतर ज्यो ने गुरांच्या बाजारातून बटरबीन नावाचा बोकड चांगली बोली लावून खरेदी केला.
निर्मल बायो संजीवनी । Bio Sanjivani।
नोव्हेंबर 2021 मध्ये “ख्रिसमस ऑन द फार्म” या टीव्ही शोने फार्मर ज्योला रोझी आणि फ्लॉवर नावाच्या दोन वासरांची भेट दिली, ज्याने ज्यो चांगलाच आश्चर्यचकित झाला. आता तो त्याच्या आजोबांच्या मालकीच्या शेतात मेंढ्या ठेवतो, तर इतर जनावरे शेजारीच एका शेतकऱ्याकडून भाड्याने घेतलेल्या जमिनीत ठेवतो.
ज्यो आता लोकर, अंडी आणि शेती उत्पादने स्थानिक बाजारपेठेत विकतो. प्रजननाच्या काळात मेंढ्यावर लक्ष ठेवून त्यांची काळजी घेण्यासाठी जोने एक खास कॅमेरा घेतला आहे. याशिवाय, या काळात मेंढ्यांना ठेवण्यासाठी एक विशेष बोगदा तयार केला आहे, ज्याला पॉलिटनेल म्हणतात.
ज्योचा सर्व कुटुंबीयांना अभिमान
फार्मर ज्योची आई क्लेअर ट्रोफर सांगते, “लॉकडाऊन काळात सर्वत्र नैराश्य आणि तणावाची स्थिती असताना लहानग्या ज्योला ऑटिझम हा आजार असल्याचे निदान झाले. त्यावेळी ज्योसाठी प्राण्यांना सांभाळणे, फुले, फळे आणि भाजीपाल्यात रमणे, हीच एक प्रकारची “थेरपी” ठरली. त्याला शाळेत व बाहेरही फारसे मित्र नाहीत. तो कुणात फारसा मिसळत नाहीत. आपली भावंडे आणि निसर्ग, प्राणी हेच त्याचे मित्र आहेत. त्याने एव्हढ्या कमी वयात जे काही साध्य केले, त्याचा आम्हा सर्व कुटुंबीयांना अभिमान आहे. एखाद्या पूर्ण वाढ झालेल्या पुरुषांपेक्षा जास्त ज्यो जास्त संवेदनशीलपणे विचार करतो आणि जास्त मेहनत करतो.”
फळ-भाज्या, अंडी, चिकन-मांस आणि मेंढ्या विकून मिळालेल्या नफ्यातून ज्योने लिंकनशायरच्या बिलिंगहे या गावात एका शेतकऱ्याकडून जमीन भाड्याने घेतली. या भाड्याच्या जागेत आता, ज्यो आता 37 मेंढ्या, 12 कोंबड्या आणि दोन गायी पाळत आहे. यातील रोझी गायीचा त्याला विशेष लळा आहे. याशिवाय, राखणदारीसाठी बॉर्डर कॉली जातीचा एक कुत्रा आहे, ज्याचे नाव ज्यो ने स्पुड ठेवले आहे.
माझा जन्म शेतकरी होण्यासाठीच
फार्मर ज्यो सांगतो, “माझा जन्म शेतकरी होण्यासाठीच झाला आहे, मी तेच करतोय आणि करत राहणार.” ज्यो ची 47 वर्षीय आई क्लेअर ट्रोफर सांगते, “ज्यो हा सर्वात दयाळू, प्रेमळ, शांत आणि खूप समर्पित मुलगा आहे.” शेतकऱ्यांच्या घरात जन्माला येणारी बहुतेक मुले नंतर या क्षेत्रात करिअर करत नाही, अशी खंतही ज्यो च्या आईने व्यक्त केली.
11 वर्षीय ज्यो ट्रोफर आता ‘फार्मर ज्यो’ या नावानेच ओळखला जातो. अलीकडेच त्याने लिंकनशायर शोमध्ये पशुधनाचा सर्वात तरुण प्रदर्शक होण्याचा मान मिळवला. याशिवाय, त्याच्या मेंढीला सर्वोत्तम पुरस्कारही लाभला. गेल्या 125 वर्षांपासून लिंकनशायरमध्ये पशुपालकांचा हा प्रसिद्ध शो सुरू आहे. बीबीसी टेलिव्हिजनवर मुलाखत देणारा ज्यो हा सर्वात तरुण शेतकरी ठरला आहे. त्याच्या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तरुण शेतकरी उद्योजक ज्यो आपल्या जनावरांना चारा देण्यासाठी पहाटे चार वाजताच उठतो. त्याला अलीकडेच कोणीतरी लोकर कताईसाठी चाक दान केले आहे. त्याआधारे लोकर काढूनही ज्यो आता ती विकत आहे. या ताज्या लोकरीला मोठी मागणीही आहे. आता त्यासाठी प्री-बुकिंग करावे लागते.
ज्योची आई क्लेअर सांगते,”त्याचे आजोबा शेतकरी असले तरी, मी आणि त्याचे बाबा शेतकरी नाही, म्हणून आता तो शेतकरी म्हणून हे सर्व स्वतः करत आहे. त्याचा आदर्श भावंडांनीही घेतला आहे. तेही आता मागे नाहीत. सहा वर्षांचा एर्नी आणि 5 वर्षांचा स्टॅन दोघेही आता बगीचा, शेती आणि प्राण्यात रमतात. ते दोघे खरोखर ज्योकडे आदर्श म्हणून पाहतात. ते त्याच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. ते तिघेही यावर्षी एका काऊंटी फेअरच्या शो रिंगमध्ये आहेत. आम्हाला ज्यो चा खूप अभिमान आहे. एक दिवस तो नक्कीच स्वतःच्या शेताचा मालक होईल.”