भारतात राहणार्या दोन जुळ्या जपानी भगिनींनी भारतात सेंद्रिय उत्पादन व्यवसाय सुरू केला आहे. जपानच्या तुलनेत सामान्य भारतीय शेतकर्यांचे जीवनमान खालावलेले असल्याचे जाणवल्यापासून या बहिणी व्यथित होत्या. त्यातच भारतात येणाऱ्या, राहणाऱ्या जपानी नागरिकांना विषमुक्त, सेंद्रिय अन्न-धान्य मिळत नसल्याचीही समस्या त्यांना उमगली होती. त्यामुळे आजूबाजूच्या शक्य तेव्हढ्या शेतकऱ्यांचे जीवन सुधारता यावे आणि भारतीयांसह जपानी नागरिकांना चांगला कृषी माल मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले. संपर्कातील भारतीय शेतकऱ्यांच्या शेतीतून थेट मिळणार्या सेंद्रिय भाज्यांच्या वितरण आणि विक्रीमध्ये त्या आता अगदी उत्कटतेने गुंतल्या आहेत.
माई आणि असुका हट्टा, या दोघीही चाळिशीत आहेत. जपानमधील चिबा प्रीफेक्चर प्रांतातील या भगिनींनी 2016 मध्ये नवी दिल्लीजवळ सेंद्रिय भाजीपाला आणि कीटकनाशकमुक्त ताजे अन्न विकणारी कंपनी हसोरा सुरू केली. भारतातील जपानी रहिवाशांकडून त्यांना या व्यवसायाची आयडिया मिळाली.
अमेरिकी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण
भारतात सेंद्रिय आणि कीटकनाशकमुक्त भाजीपाला व अन्नधान्य म्हणजेच ऑरगॅनिक ॲग्री प्रोड्यूस मिळत नसल्याचा अनेक स्थायिक व पर्यटक जपानी नागरिकांचा फीडबॅक होता. अमेरिकी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या हट्टा भगिनी 2012 मध्ये नोकरीसाठी भारतात आल्या होत्या. त्यांनाही चांगला कृषी माल न मिळण्याचा अनुभव आला होता. जपानसारख्या शुद्ध उत्पादन प्रक्रियेतून पिकविलेला कृषी माल आपण भारतात देऊ शकलो तर त्याला जपानी ग्राहकाबरोबरच जागरूक भारतीय ग्राहक खरेदीदार उपलब्ध असल्याचे त्यांना लक्षात आले.
चांगल्या अन्नासाठी जास्त रक्कम मोजायला ग्राहक तयार
आता जागरूक भारतीय नागरिकही चांगल्या भाजीपाला, अन्नासाठी जास्त रक्कम मोजायला तयार असतात. जपानी नागरिकांना तर नेहमीच ताजा भाजीपाला हवा असतो. मात्र, अविकसित पायाभूत सुविधांमुळे कापणी केलेल्या भाजीपाला भारतातील स्टोअरच्या शेल्फवर पोहोचण्यासाठी सुमारे पाच दिवस लागतात. ताजे कृषी उत्पादन मिळवण्यात येत असलेल्या अडचणींचा अभ्यास करून हसोरा जन्माला आली.
हसोराने दिल्ली, गुरुग्राम जवळपासच्या भागातील स्थानिक सेंद्रिय भाजीपाला शेतकर्यांशी भागीदारी केली. कापणी केलेल्या दिवशीच किंवा फारतर कापणीच्या 24 तासांच्या आत ताजे उत्पादन त्यांच्या दुकानात विकले जाते. हसोराकडून दिल्लीत होम डिलिव्हरी सेवा देखील प्रदान केली जाते.
भारतात शेतकऱ्यांना मिळतो अल्पसा नफा
भारतात, शेतकरी त्यांच्या उत्पादनाच्या अंतिम किरकोळ किमतीच्या सुमारे 10% ते 20% इतकाच अल्प नफा कमावतात. कारण, कापणी केलेल्या भाज्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधी त्या प्रक्रियेत साधारणपणे पाच ते सात मध्यस्थ गुंतलेले असतात. उदाहरणार्थ, बटाटे शेवटच्या ग्राहकांसाठी प्रति किलो 30 रुपये असतील तर शेतकऱ्याला प्रतिकिलो फारतर 2-3 रुपये नफा मिळतो.
मध्यस्थ, दलालमुक्त मॉडेल शेतकऱ्यांच्या फायद्याचे
उत्पादकांकडून थेट खरेदी केलेला भाजीपाला ग्राहकाला स्वतः थेट विकून हट्टा भगिनी शेतकऱ्यांना नफ्यातील मोठा वाटा देत आहेत. शेतकऱ्याला 30 ते 50% नफा मिळत आहे. शेतकऱ्याला भरपूर नफा मिळवून देणारे मॉडेल भारतात हवे, असे त्यांना वाटते. फार्म टू कस्टमर किंवा फार्म टू प्लेट या मध्यस्थ, दलालमुक्त मॉडेलमधून ते साध्य होईल, असा त्यांना विश्वास आहे.
शेतकरी अन्नदाता, त्याला प्रतिष्ठा मिळायलाच हवी
भारतातील बहुतेक शेतकऱ्यांकडे जमिनीचे क्षेत्र कमी आहे. तिथे यांत्रिक शेती होऊ शकत नाही. त्यामुळे मजुरी, मेहनतीने उत्पादनखर्च वाढतो. शिवाय, लहान व इतरही शेतकऱ्यांचा सामाजिक दर्जा तुलनेने कमी आहे, अशी खंत हट्टा भगिनी व्यक्त करतात. असुका म्हणाली, “मला आणि माईंला भारतातला हा असमान समाज शक्य होईल तेव्हढे बदलण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. या युगात सामाजिक विषमता राहून कशी चालेल? शेतकरी हा अन्नदाता आहे, त्याला योग्य दाम, मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळायलाच हवी. ते सशक्त राष्ट्राचे लक्षण आहे.”
लॉकडाऊनच्या काळातील अवघड आव्हान पेलले
या भगिनींचा व्यवसाय वाढू लागताच भारतामध्ये कोरोना व्हायरसने थैमान सुरू झाले. लॉकडाऊनच्या कडक उपाययोजनांमुळे, हसोराचे मुख्य ग्राहक असलेले बहुतेक जपानी रहिवासी तात्पुरते जपानला परतल्यामुळे हसोराची विक्री घसरली.
असे असले तरी, हट्टा बहिणींनी हिंमत हारली नाही. त्यांनी कोविड साथीत मायदेशी न परतता, आठवडय़ातील सातही दिवस व्यवसाय सुरू ठेवला. त्यावेळी त्या गोष्टीची गरज होती. थोडेसे का होईना पण लोकांना अधिक आनंद देणारे अन्न त्या कठीण परिस्थितीत पुरवता आल्याचे या बहिणींना समाधान आहे.
कोविड साथीनंतर भारतीय नागरिक जागरूक
COVID-19 ने भारतातील लोकांच्या जीवनशैलीत आणि दृष्टिकोनात बदल घडवून आणला. कमीत-कमी मानवी संपर्क असलेल्या, शेतातील ताज्या खाद्यपदार्थांची मागणी वाढली. वाढत्या आरोग्याविषयी जागरूक प्रवृत्तीमुळे सेंद्रिय आणि कीटकनाशकमुक्त पदार्थांसाठी मागणीही वाढली. थेट शेतातूनच भाजीपाला विकण्याचे कितीतरी व्यवसाय त्याकाळात सुरू झाले.
जपानी पदार्थांचा कॅफे
भारतात जपानी पदार्थांमध्ये वापरल्या जाणार्या भाज्यांची मागणीही वाढत आहे. ग्राहकांना अशा खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी हट्टा बहिणींनी त्यांच्या दुकानातच कॅफे एरिया सुरू केला आहे. त्या सांगतात, “आम्हाला एक असा ब्रँड तयार करायचा आहे, जो जपान आणि भारत यांच्यातील सेतू म्हणून काम करेल.”
‘हसोरा’ म्हणजे काय? कंपनीचा लोगो काय सांगतो?
‘हसोरा’ हे नाव ‘ हसना’ म्हणजे ‘ हसणे’ या हिंदी शब्दापासून बनले आहे. हासोरा म्हणजे जपानी भाषेत ‘पाने’ आणि ‘आकाश’. कंपनीसाठी जास्त सकारात्मक ऊर्जेची पेरणी करते. कंपनीच्या लोगोमधील दोन हसऱ्या लहान मुली म्हणजे असुका आणि माई या दोघी जुळ्या बहिणी आहेत. प्रियजनांसोबत चांगले, स्वच्छ आणि सुरक्षित अन्न खाण्याचा अनुभव जीवनाला आनंदी बनवतो, हे लोगोद्वारे सांगितले आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी गोड बातमी; १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी
- नवीन कांदा बाजारात येण्यास उशीर झाल्याने दरात वाढ