सध्या थंडीच्या महिन्यात देशात सर्वत्र पावसाचा जोर दिसत आहे. दरम्यान, राज्यात आजही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविली आहे. दुसरीकडे, उत्तर भारतात बर्फवृष्टीमुळे कडाक्याची शीतलहर जाणवत आहे.
सध्या अरबी समुद्रावर सौराष्ट्र-कच्छ क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यातच अंदमानात कमी दाबाचे नवे क्षेत्र निर्माण होत असून बुधवार, 29 नोव्हेंबरपासून त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे राज्यात आजही पाऊस बरसण्याचा अंदाज असून ‘आयएमडी’ने तसा अलर्ट जारी केला आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा महाराष्ट्र आणि शेजारील छत्तीसगड, गुजरातसह उत्तर भारतात उत्तराखंड, दिल्ली तसेच देशाच्या इतर काही भागातही आज पावसाची शक्यता आहे.
भात, कांदा पिकाचे नुकसान
गेल्या 24 तासात देशात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 24 तासात हा पाऊस सुरूच राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात, विशेषत: पहाडी भागात पावसाचा अधिक जोर राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज आहे. परिणामी, उत्तर भारतासह देशात थंडीची लाट जाणवेल. दरम्यान, राज्यातील सध्याच्या अवकाळी पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान होत आहे. कांद्यालाही त्याचा फटका बसत आहे. वाढत्या थंडीचा काही रब्बी पिकांना मात्र फायदा होत आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज पावसाची शक्यता
आज राज्यात कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी हलका-मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ-मराठवाड्यात परभणी, वाशिम, हिंगोली, जालना, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातही आज पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई-ठाण्यातही आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेशसह पालघर, नाशिक, पुणे, नगर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ‘आयएमडी’कडून वर्तविण्यात आली आहे.
देशभर थंडीचा कडाका जाणवण्याची शक्यता
वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे रविवारपासून हवामानात बदल होत आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील सिमला व आसपासच्या भागात आजपासून हिमवृष्टीसह पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडमध्येही येत्या 3 दिवसात बर्फवृष्टीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारपासून बर्फवृष्टी कमी होण्याचाही अंदाज आहे. त्यानंतर आकाश निरभ्र राहून स्वच्छ हवामानाची शक्यता आहे. त्यानंतर पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून देशभर थंडीचा कडाका जाणवण्याची शक्यता आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- ‘मिधिली’च्या तडाख्यानंतर बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ!
- सावधान, महाराष्ट्रात आजपासून रविवारपर्यंत तीन दिवस पावसाचे; गुजरात, मध्य प्रदेशातही अवकाळी पावसाची शक्यता